आपला प्रभू येशू स्वर्गात जाण्यापूर्वी त्याने आपल्या शिष्यांना पुढील आज्ञा दिली: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे” (मत्तय २८:१९-२०). ह्या महान आज्ञेतील शब्दांवर आधारित, आता जगात जाणे, सुवार्ता सांगणे आणि सर्व राष्ट्रांना शिष्य करणे हे ख्रिस्ताच्या मंडळीचे कार्य आहे. आम्ही शिष्य कसे बनवू शकतो? लोकांना त्रैक देवाच्या नावाने बाप्तिस्मा देऊन.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्या लोकांना आज सर्वसाधारणपणे पवित्र धर्मसंस्कार आणि विशेषतः बाप्तिस्म्याबद्दल फारसे स्वारस्य नसते, मात्र, जी व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते, परंतु बाप्तिस्मा घेत नाही अशा व्यक्तीला नवा करार ओळखत नाही. वधस्तंभावरील चोर, ज्याला बाप्तिस्मा घेणे शक्य नव्हते, ह्याला अपवाद असला (लूक २३:४०-४३), तरी एखाद्याला आपला विश्वास प्रकट करण्याचे बाह्य चिन्ह आणि शिक्का म्हणून बाप्तिस्मा घेणे आवश्यक आहे ह्याबद्दल नवा करार अगदी स्पष्ट आहे. येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना बाप्तिस्मा देऊन राष्ट्रांना शिष्य करण्याची आज्ञा आपल्या महान आज्ञेत येशूने त्याच्या शिष्यांना तर दिलीच आहे, शिवाय पेत्राने पेन्टिकॉस्टच्या दिवशी केलेल्या उपदेशाचा शेवट ह्या आज्ञेने होतो, – “पश्‍चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे” (प्रे. कृ. २:३८-३९). प्रेषितांची कृत्येच्या संपूर्ण पुस्तकात, घरातील प्रमुखांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने त्यांचा बाप्तिस्मा झाल्याचे दिसून येते, पण त्या व्यक्तीने त्याच्या मुलांसह कुटुंबातील सर्वांना बाप्तिस्मा घेण्यासाठी सादर केल्याचेही दिसून येते (हे सर्दर्भ पाहा: प्रे. कृ. १६:१४-१५, ३१-३३; प्रे. कृ. १८:८).
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा बाप्तिस्मा का होतो ह्याची अनेक महत्त्वाची कारणे आहेत. पहिले, बाप्तिस्मा हे नव्या कराराचे चिन्ह आणि शिक्का आहे, आणि सुंता जे जुन्या कराराचे चिन्ह आणि शिक्का होते, त्याची जागा बाप्तिस्मा घेतो (उत्पत्ति १७:१-१४; कलस्सै. २:११-१२). परंतु कराराचे चिन्ह सुंता ते बाप्तिस्मा असे बदलत असले तरी, त्यातून सूचित होणारी गोष्ट बदलत नाही – देव, आपला देव होण्याचे आणि आपण त्याचे लोक होण्याचे देवाच्या कराराचे अभिवचन (प्रे. कृ. २:३९; गलती. ३:१४). म्हणूनच सुधारित ख्रिस्ती लोकांचा असा दावा आहे की विश्वासणाऱ्यांच्या मुलांनी बाप्तिस्मा घ्यावा, कारण विश्वासणाऱ्यांची मुले देखील त्यांच्या पालकांसह कृपेच्या कराराचे सदस्य आहेत (१ करिंथ. ७:१४). आमची मुले जर खरोखरच कृपेच्या कराराची सदस्य असतील तर त्या कराराचे चिन्ह आणि शिक्का त्यांना कसा नाकारता येईल? देवाच्या राज्याचे सदस्य म्हणून मुलांबद्दलच्या येशूच्या वृत्तीशी हे जुळते (लूक १८:१५-१७), आणि त्यावरून नव्या करारात उल्लेख असलेल्या सर्व कुटुंबाच्या बाप्तिस्माचे स्पष्टीकरण देखील होते (हे संदर्भ पाहा: प्रे. कृ. १६:१५, 33; १ करिंथ. १:१६).
दुसरे, बाप्तिस्म्यामध्ये, येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाशी आपण जोडले जातो. रोम. ६:३-५ मध्ये, पौल लिहितो, “आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो; ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ.” त्याचप्रकारे गलती. ३:२७-२८ मध्ये, पौल बाप्तिस्म्याला आपल्या ख्रिस्तासोबतच्या नात्याशी जोडतो. “कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात” बाप्तिस्मा घेणे म्हणजे ख्रिस्ताला परिधान करणे, आणि बाप्तिस्मा आपल्याला येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाशी जोडतो.
तिसरे, आपण चिन्ह (पाणी) आणि चिन्हांकित वस्तू (पापाची क्षमा) ह्यांच्यात फरक केला पाहिजे. पवित्र शास्त्र बाप्तिस्म्याला “नव्या जन्माचे स्नान” (तीत. ३:५) आणि “पापाच्या क्षमेशी” संबंधित (प्रे. कृ. २:३८ आणि पुढील वचने; २२:१६) असे संबोधते आणि बाप्तिस्म्याचे पाणी हे नव्या जन्माचे साधन नाही असे देखील शिकवते. पवित्र शास्त्रात सगळीकडे पाणी जे केवळ एक चिन्ह आहे आणि ते कुठल्याही प्रकारे किंवा एखाद्या जादूने देवाला कृती करण्यास भाग पाडत नसल्याने, पाण्याला नव्हे, तर नव्या जन्माचे संपूर्ण श्रेय पवित्र आत्म्याच्या सार्वभौम कार्याला दिले जाते. (योहान ३:३-८; तीत. ३:५; १ करिंथ. २:१४). असे म्हटल्यानंतर, आम्ही बाप्तिस्मा हा केवळ एक बाह्य चिन्ह आहे असे समजू नये किंवा बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीमध्ये काही महत्वाचे घडते किंवा त्याच्यावर शिक्का मारला जातो ही गोष्ट नाकारू नये, ह्यासाठी आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. विश्वासाने देवाच्या कराराच्या वचनाचा दावा करून, आम्ही आमच्या संपूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवतो की बाप्तिस्मा घेतलेल्या प्रौढ मनुष्याचा किंवा विश्वासणाऱ्यांच्या मुलाचा खरोखरच नवा जन्म झाला आहे आणि पापांच्या क्षमेसाठी ख्रिस्ताच्या रक्ताने ती व्यक्ती धुतली गेली आहे.
बाप्तिस्म्यामध्ये पवित्र शास्त्र आपल्याला कोणते अभिवचन देते ह्याचा एक उत्तम सारांश, सुधारित ख्रिस्ती मंडळीमध्ये वापरल्या जाणार्‍या बाप्तिस्म्याच्या फॉर्ममधील शब्दांमध्ये आढळतो. हे शब्द आम्ही नुकतेच विचारात घेतलेल्या अभिवचनांचा योग्य सारांश आहेत.
देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा ह्याच्या नावाने आपला बाप्तिस्मा होतो. कारण आपण जेव्हा पित्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतो, तेव्हा देव जो बाप आपल्याविषयी अशी साक्ष देतो आणि आपल्यावर शिक्कामोर्तब करतो की तो आपल्याशी कृपेचा सार्वकालिक करार करत आहे आणि आपल्याला त्याचे मुल आणि वारस म्हणून दत्तक घेत आहे, आणि म्हणून आपल्याला प्रत्येक चांगली गोष्ट पुरवणार आहे आणि वाईट गोष्टी दूर करणार आहे किंवा त्या आपल्या हिताच्या करणार आहे.
आणि जेव्हा आपण पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा घेतो, तेव्हा पुत्र आपल्यावर शिक्का मारतो की त्याने आपल्याला आपल्या सर्व पापांपासून त्याच्या रक्ताने धुतले आहे, आपल्याला त्याच्या मृत्यूच्या आणि पुनरुत्थानाच्या सहभागीतेत सामील केले आहे, जेणेकरून आपण आपल्या पापांपासून मुक्त झालो आहोत आणि देवासमोर नीतिमान ठरवले गेलो आहोत.
त्याचप्रमाणे, जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतो, तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला ह्या पवित्र विधीसंस्काराद्वारे आश्वासन देतो की तो आपल्यामध्ये वास करेल, आणि आपल्याला ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव होण्यासाठी पवित्र करेल, आपल्याला ख्रिस्तामध्ये असलेले सर्वकाही पुरवेल, म्हणजे , आपली पापे धुतली जाणे आणि जोपर्यंत आपण अखेरीस सार्वकालिक जीवनात निवडलेल्या लोकांच्या सभेमध्ये निष्कलंक असे सादर केले जात नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचे दररोज नवीकरण करणे ह्या गोष्टी तो आपल्याला पुरवेल.

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.