सुधारित विश्वासामध्ये प्रभुभोजन हे चिन्ह आणि शिक्का (भाकर आणि द्राक्षरस), त्यातून सूचित होणाऱ्या गोष्टी (त्याच्या रक्ताद्वारे क्षमा, “कराराचे रक्त”) आणि त्या दोन्हीतील पवित्र धर्मसंस्कारात्मक ऐक्य (आपल्या प्रभूचे शब्द “हे माझे शरीर आहे”) ह्यांच्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या फरकावर आधारित आहे. हा तीन पदरी फरक थेट येशूने काढलेल्या विधी स्थापनेच्या उद्गगारातून दिसून येतो. “मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, “तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. मी तुम्हांला सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही.” (मत्तय २६:२६-२९).
जेव्हा येशू भाकर हे त्याचे शरीर आणि द्राक्षारस हा त्याचे रक्त आहे अशा अर्थाने बोलतो, तेव्हा आम्ही चिन्ह (भाकर आणि द्राक्षारस) आणि सूचित होणारी वस्तू (ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) ह्यामध्ये गोंधळ न करता त्याच्या शब्दावर विश्वास ठेवतो. तसेच आपण “हे माझ्या शरीराचे प्रतिनिधित्व करते” असे शब्द घालू नयेत, जसा काही लोकांचा विश्वास आहे की प्रभुभोजन विशेषतः एक स्मरणात्मक भोजन आहे आणि भाकर आणि द्राक्षारसाचे सेवन केल्याने काहीही प्राप्त होत नाही. जसे पौल ख्रिस्ताला “खडक” असे संबोधतो (१ करिंथ. १०:४), त्याचप्रमाणे भाकर हे येशूचे शरीर आहे, ह्या कारणास्तव नाही की चिन्ह चमत्कारिकरित्या सूचित होणाऱ्या वस्तूमध्ये बदलले जाते (जसे रोमन कॅथलिक चर्च रूपांतरणाविषयी चूकीच्या पद्धतीने वाद घालते), तर ह्या कारणास्तव की, पवित्र धर्मसंस्कारांची भाषा वापरून ख्रिस्त भाकरीबद्दल (चिन्ह) ती जणूकाही सूचित होणारी वस्तू (त्याचे शरीर) आहे असे बोलू शकतो. चिन्ह आणि सूचित होणारी वस्तू ह्यांच्यात एक खरेखुरे धर्मसंस्कारात्मक ऐक्य अस्तित्वात असल्यामुळे, भाकर खरोखरच ख्रिस्ताचे शरीर आहे असे म्हटले जाऊ शकते, जसे येशू धर्मसंस्कार स्थापित करताना म्हणतो (मत्तय २६:२६ आणि पुढील काही वचने).
कॅल्विन ह्यांचे अनुसरण करून, सुधारित विश्वासाच्या लोकांनी ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाची वास्तविकता लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये ख्रिस्ताचे खरे मानवी स्वरूप आता स्वर्गात त्याच्या परतीची वाट पाहत आहे (प्रे. कृ. १:९-११) आणि पवित्र धर्मसंस्कारातील ख्रिस्ताची प्रत्यक्ष उपस्थिती (१ करिंथ. १०: १६-१७). जरी ख्रिस्त त्याच्या खऱ्या मानवी स्वरूपात स्वर्गात असला, तरी विश्वासणाऱ्याला त्याचे तारणाचे सर्व फायदे मिळतात, कारण, विश्वासाद्वारे, पवित्र आत्म्याने पृथ्वीवरील विश्वासणाऱ्याला स्वर्गातील ख्रिस्ताशी जोडले आहे. त्याचप्रमाणे, ख्रिस्त स्वर्गात असला तरी विश्वासणारा त्याचे खरे शरीर आणि रक्त प्राप्त करू शकतो, कारण तोच पवित्र आत्मा खात्री देतो की ख्रिस्ताबरोबर अगोदरच संयुक्त झालेले लोक जेव्हा विश्वासाने भाकर व द्राक्षारस सेवन करतात तेव्हा त्यांना त्याचे खरे शरीर आणि रक्त प्राप्त होते (१ करिंथ. १०:१६-१७; ११:२३-२९).
म्हणून, सेवन करण्याची पद्धत शारीरिक नाही तर आध्यात्मिक आहे. आम्ही तोंडावाटे नाही तर, खऱ्या अर्थाने ख्रिस्ताला विश्वासाने स्वीकारतो. (योहान ६:६३ येथे लागू होऊ शकते). प्रतिष्ठापनेच्या शब्दात सांगायचे झाले तर, ख्रिस्ताचे शरीर आपल्यासाठी खाली आणले जात नाही, तर ल्युथरन मंडळीच्या म्हणण्याप्रमाणे, “ख्रिस्तामध्ये, ख्रिस्तासोबत आणि ख्रिस्ताच्या अधिपत्याखाली” वेदीवर नियुक्त केले जाते. त्यामुळे, विश्वासणारा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाच्या उजवीकडे बसलेल्या ख्रिस्ताला सेवन करू शकतो कारण आपल्याला जे अभिवचन देण्यात आले आहे ते आपल्याला मिळेल ह्याची पवित्र आत्मा खात्री देतो. स्वीकार करण्याची पद्धत विश्वास आहे, कारण अभिवचनात सांगितलेल्या गोष्टी ज्याला मिळतात तो आत्मा आहे, शरीर नाही, तर तोंडात केवळ पवित्र केलेली भाकर आणि द्राक्षारस जातो. तरीसुद्धा, जेव्हा आपण पवित्र केलेल्या भाकरीचे आणि द्राक्षारसाचे सेवन करतो तेव्हा विश्वासाद्वारे, पवित्र आत्मा खात्री देतो की आपल्याला ख्रिस्ताचे खरे शरीर आणि रक्त प्राप्त होईल जे स्वर्गात आहे कारण आपण त्याच्याशी संयुक्त झालेलो आहोत. ऑगस्टीन अगदी बरोबर बोलतात जेव्हा ते म्हणतात की “तू विश्वास ठेवलास म्हणजे तू सेवन केलेस.”
प्रभूभोजनाच्या विधीमध्ये लोक विश्वासाने ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करत असताना ख्रिस्त त्या विधीमध्ये उपस्थित असतो, हाच प्रभूभोजनाच्या संदर्भातील पवित्र शास्त्राच्या शिकवणीचा आणि सुधारित विश्वासाच्या सिद्धांताचा गाभा आहे. परंतु ह्यामध्ये एक एस्कॅटोलॉजीसंबंधीचा (ईश्वरविज्ञानशास्त्राचा अस भाग जो मृत्यू, न्याय आणि आत्म्याचे आणि मानवजातीचे अंतिम नशीब याच्याशी संबंधित आहे). पैलू देखील आहे (प्रकटी. १९:६-९), कारण प्रभूभोजनाच्या पृथ्वीवरील विधीमध्ये भविष्यात होणार असणाऱ्या लग्नाच्या मोठ्या जेवणावळीची अपेक्षा सामावलेली आहे. ह्यामध्ये एक करारात्मक पैलू देखील आहे, प्रभूभोजनाच्या प्रत्येक विधीच्या वेळी, देव स्वत: पापी लोकांसाठी शाप सहन करून त्यांचे तारण करण्यासाठी त्याच्या कराराच्या शपथेची पुनःस्थापना करतो. निर्गम २४ मध्ये नमूद केलेल्या घटनेच्या उदाहरणाप्रमाणे येशू ख्रिस्त अजूनही पापी लोकांसोबत मेजावरील सहभागीतेचा आनंद घेतो आणि १ करिंथ. ११:२३-३२ सारख्या शास्त्रभागांप्रमाणे कालांतराने प्रेशितीय युगात स्थापन झालेल्या ख्रिस्ती मंडळयांमध्ये त्याला मूर्त स्वरूप आलेले आपल्याला दिसून येते.
शब्द आणि धर्मसंस्कार ह्यांना जोडण्याच्या पवित्रशास्त्रातील पद्धतीसोबतच, धर्मसंस्कारांच्या स्थापनेच्या शब्दांमध्ये “प्रत्यक्ष उपस्थिती” साठी वापरली जाणारी पवित्र शास्त्रातील भाषा विचारात घेता (प्रे. कृ. २:४२; १ करिंथ. ११; प्रे. कृ. २०:७), प्रभूभोजनात सहभागी होण्यासाठी आपण पात्र आहोत कि नाही ह्याचे पूर्णपणे मानवी मुल्यांकन करणे कठीण आहे. काही प्रश्न आपल्याला सतावतात. “माझा पुरेसा विश्वास आहे का?” “मी माझ्या पापांची पुरेशी कबुली दिली आहे का आणि माझे अंतःकरण शुद्ध केले आहे का?” अपरिहार्यपणे, ह्या आत्मपरीक्षण प्रक्रियेचे स्वरूप ह्या वस्तुस्थितीचे अवमूल्यन करते की प्रभूभोजनाचे सार हे एक आध्यात्मिक आहार आणि कराराचे भोजन आहे, ज्यामध्ये देव त्याच्या कराराच्या शपथेची पुनःस्थापना करतो. विश्वासणाऱ्यांसाठी धर्मसंस्कार प्रभावी बनवणारे पाद्री किंवा पाळक नाहीत, तर पवित्र आत्मा वचनाद्वारे कार्य करतो. देव खरा सक्रिय पक्ष आहे (अगदी “स्मरण करणारा” देखील नाही), आणि म्हणूनच आपण प्रभुभोजन तसेच भाकर आणि द्राक्षारस हे त्यातील घटक, हे देवाकडून मिळालेले कृपेचे दान – जणू काही स्वर्गातील मान्ना आहे – जो देवाने स्थापित केलेल्या चिन्हांद्वारे, कृपेच्या कराराच्या आशीर्वादांची वास्तविकता आम्हाला अनुभवता यावी ह्यासाठी देवाने आम्हाला दिला आहे अशा दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. म्हणून, प्रभुभोजन हे ख्रिस्ती जीवनातील एक किरकोळ घटना नाही, तर आपल्या पवित्रीकरणाचा आणि देवाशी अधिक समरूप होण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे ह्या दृष्टीने आम्ही त्याच्याकडे पाहिले पाहिजे.
ह्या भोजनात, येशू अजूनही पश्चात्तापी जकातदारांना आणि पापी लोकांना त्याच्यासोबत भोजन करण्यास आमंत्रित करतो. प्रभूच्या मेजावर, आपला कृपाळू देव शुभवर्तमानाच्या वचनाची पुष्टी करतो आणि पवित्र भाकर आणि द्राक्षारस खाऊन, देव आमचा विश्वास बळकट करतो, आपले पोषण करतो, त्याचा करार पुनःस्थापित करतो आणि आपल्याला ह्या गोष्टीची आठवण करून देतो की आम्ही त्याचे आहोत. येशू असे करतो कारण तो स्वर्गातून उतरलेली आपली जिवंत भाकर आहे.

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.