केवळ देवाला सर्व गौरव (सोली डियो ग्लोरिया)

तर,  सर्व गोष्टीं लक्षात घेतां, आपल्याला खरे सुख कोठे लाभते?  जमवलेले धन आणि मालमत्ता ह्यांत आपल्याला सुख मिळते का? आपल्या व्यक्तिगत यशप्राप्तीत आपल्याला ते मिळते का? किंवा, आपल्या पापाची सखोलता आणि सुवार्तेच्या गौरवी गोष्टी पूर्णपणे जाणून  घेतल्यानंतर, आपल्या पापांपासून आपल्याला तारण्यासाठी देवाने करून ठेवलेल्या  गौरवशाली तरतुदीतून आपल्याला खरे सुख मिळते का?   केवळ देवालाच सर्व गौरव हे असे घोषवाक्य आहे की ते इतर सर्व घोषवाक्यांचा सारांश देते. जेव्हा सर्व गौरव देवालाच असे आपण जाहीरपणे मानतो, तेव्हा आपण सर्व गौरव, वैभव, आणि सन्मान केवळ देवाला देत असतो. कारण ही गुणवैशिष्ट्ये न्याय्य रीतीने  त्याचीच आहेत — हे मान सन्मान न्याय्य रीतीने पोपांना, किंवा संतांना, किंवा पाप्यांना  बहाल करता येत नाहीत. जेव्हा आपण सर्व गौरव देवाला  हे कबूल करतो (मान्य करतो), तेव्हा आपण देवाने येशू ख्रिस्तात आपल्यासाठी जे सर्व काही केले आहे त्याबद्दल त्याचे आभार मानत असतो.  आपल्याला आपल्या सर्व पापांपासून ज्या एकमेव व्यक्तीने तारले, फक्त त्यालाच आपण तो सन्मान देत असतो.

जेव्हा मार्टिन लूथरने  प्रायश्चित्ताच्या रोमन चर्चच्या सिद्धांताला आव्हान दिले, तेव्हा आतापर्यंत दाबून ठेवलेली सारी ताकद त्याने मोकळी सोडली आणि संपूर्ण युरोपला हादरून सोडले.  जेव्हा लूथरला हे आढळले की “प्रायश्चित करा” ह्या क्रियापदाच्या लॅटिन भाषांतराचा  ग्रीक भाषेतील नव्या  करारात खरा अर्थ “पश्चाताप” (तुमचे मन बदलणे) असा आहे, तेव्हा लूथरला सर्वप्रथम हे समजले की  सुवार्तेमध्ये आपण काही करायचे असते असे काहीच सांगितले नाही.  आज प्रॉटेस्टन्ट लोक जे गृहीत धरतात ते लुथरला अधिकाधिक स्पष्टपणे दिसून येऊ लागले.  देवाने आपल्याकरिता त्याच्या पुत्राच्या व्यक्तित्वातून जे केले आहे त्याविषयीच सुवार्ता सारे  सांगते. आपण गरजवंत भिकाऱ्यांसारखे  देवापुढे येतो आणि ख्रिस्त सढळपणे आपल्याला जे लाभ देतो ते विनम्रपणे ग्रहण करतो.  

जेव्हा लूथरने केवळ कृपेने दोष निवारण/तारण, केवळ विश्वासाद्वारे, केवळ ख्रिस्तामुळे/ख्रिस्ताप्रित्यर्थ, हा  सिद्धांत स्पष्टपणे विशद केला  तेव्हा धडपडणाऱ्या पापी लोकांना त्याने असे मार्गदर्शन केले की ख्रिस्तामध्ये  देवाने दिलेली कृपा पूर्णपणे झाकोळून टाकणाऱ्या,  प्रायश्चित आणि धर्मोपदेशक वर्गाच्या  डावपेचांच्या मानव निर्मित यंत्रणेद्वारे कृपेचे वाटप करण्याच्या चर्चच्या ताकदीत नव्हे,  तर एका कृपाळू देवाने करून ठेवलेल्या तारणदायी कामात त्यांच्या आत्म्यांकरिता शांती मिळवण्यासाठी त्यांनी झटले पाहिजे.   ह्याने पापी लोकांना चर्चपासून स्वतंत्र केले एवढेच नव्हे तर  धर्म सुधारणेच्या जीवनाचा प्रत्येक पैलू बदलून गेला.

प्रॉटेस्टंट धर्म सुधारणेने युरोपभर मूळ धरले आणि नंतर नव्या जगात ती पसरली तसे देवाच्या लोकांना कळू लागले की  पापांपासून सुटका मिळाल्यानंतर, ते जीवनातील सर्व गोष्टीं करण्यासाठी स्वतंत्र झाले होते, भय किंवा दास्यत्व भावनेतून नव्हे तर देवाला सर्व सन्मान आणि स्तुती देण्यासाठी.  ख्रिस्ताच्या आशीर्वादाने, जीवन देखील देवासमोर जगायचे होते.  कोणत्याही (कॅथॉलिक) धर्मगुरूने त्यात ढवळाढवळ करू नये. कोणतेही नवस इत्यादींची गरज नव्हती.  महान मुख्य याजक जो ख्रिस्त त्याच्या मध्यस्थीमुळे, प्रत्येक विश्वासणारा आता देवापुढे जाण्यासाठी समान प्रवेश-सुविधा मिळालेला एक याजक   होता.  प्रत्येक विश्वासणारा आता त्याचा स्वतःचा  पेशा आणि व्यवसाय करायला मोकळा होता,  मग ते मुलांचे संगोपन असो, पादत्राणे बनवणे असो, किंवा जमिनीची मशागत असो — सर्व काही ह्या जाणीवेने की ख्रिस्तामध्ये, देव त्यांच्या दैनंदिन परिश्रमात त्यांना आशीर्वाद देतो.  कृतज्ञ अंतःकरण अपरिहार्यपणे आपली स्तुती आणि उपासना देवाला सादर करते.  केवळ देवाला गौरव असो.

सर्व प्रॉटेस्टंट जगतात  केवळ देवाला सर्व गौरव (सोली डिओ ग्लोरिया) ही कृतज्ञतेची एक अभिव्यक्ती बनली ह्याचे आश्चर्य वाटायला नको.  जे. एस. बाख   आणि जी. एफ. हान्डेल ह्या संगीतकारांनी त्यांच्या महत्वाच्या संगीत रचनांमध्ये एसडीजी ही आद्याक्षरे घातली.  सार्वजनिक इमारती आणि प्रॉटेस्टंट घरें व वैयक्तिक चीजवस्तूंवर हे प्रशंसा निवेदन दाखवलेले असे आणि तसेच प्रॉटेस्टंट चर्चेसवर देखील.  एका विमोचनप्राप्त पापी मनुष्याला  शेक्सपिअरचे  हे शब्द  मान्य करावेच लागतात.  “एखाद्या कृतघ्न व्यक्तीच्या ओठावर कृपा हा शब्द धर्मनिंदाच असतो.”

म्हणून, जेव्हा जेव्हा आपण देवापुढे आपली जटील परिस्थिती विचारात घेतो, आणि मग देवाने आपल्याला आपल्या पापापासून  तारण्यासाठी जे सारे काही केले आहे ते आठवतो, तेव्हा भावना आपल्या अंतःकरणात का उचंबळून येणार  नाहीत आणि  केवळ देवाला सर्व गौरव (सोली डिओ ग्लोरिया)ही कबुली पुन्हा एकदा करायची इच्छा आपल्याला का होणार नाही?  केवळ देवाला सर्व गौरव.

Used with permission from www.monergism.org

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.