दहा आज्ञा आज देखील ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनाशी संबंधित(प्रसंगोचित) अशा आहेत का? अगदी ह्याच मुद्द्यावर ख्रिस्ती वर्तुळांत बरीच चर्चा सुरु आहे हे उघडच दिसते. पण आपल्या हे लक्षात आहे की ख्रिस्त म्हणाला की तो नियमशास्त्र रद्द करण्यासाठी आला नाही तर ते पूर्ण करायला आला आहे (मत्तय ५:१७), आणि दहा आज्ञांतून जे नैतिक नियम सोदाहरण दाखवण्यात आले आहेत ते विशेषेकरून मनात ठेवून त्याने हे म्हटले (मत्तय ५:२१, २७). हे नियमशास्त्र आपण जितके अधिक चांगले समजू तितकेच आपण आपल्या तारकावर प्रीती करू आणि त्याची सेवा करू. दहा आज्ञा आपल्याला ख्रिस्तांविषयी काही तरी शिकवतात. (लूक २४:२७).
पहिली गोष्ट, ख्रिस्ती लोकांसाठी, दहा आज्ञा आपल्यासाठी ख्रिस्ताने केलेल्या प्रायश्चित्ताची व्याप्ती उलगडून दाखवतात. बायबल हे शिकवते की प्रभू येशू आपल्या पापांकरिता मेला (१ करिंथ १५:३). आपण देवाच्या नियमशास्त्राकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला असे वाटू शकेल की आपण फारशी पापें केलीच नाहीत, आणि मग ख्रिस्ताच्या मरणाची खरेच इतकी काही गरज नव्हती असा खोटा विश्वास धरू. पण, जेव्हा आपल्याला नियमशास्त्राचा पूर्ण गर्भितार्थ कळून येतो (मत्तय ५:१७-४८), तेव्हा वधस्तंभावर ख्रिस्ताने आपल्यासाठी जे सोसले ते अधिक स्पष्टपणे समजते. (रोम ३:२०, २५). आपले दोष ज्या दंडास पात्र होते तो पूर्ण दंड भोगून, ख्रिस्त आपल्या पापांसाठी मेला. म्हणून, आपण जितक्या अधिक स्पष्टपणे दहा आज्ञा समजून घेऊ, तितकेच ख्रिस्ताच्या मरणाद्वारे मिळालेल्या आपल्या मुक्तीकरिता आपण अधिक खरेपणाने देवाला कृतज्ञ बनून राहू.
दुसरी गोष्ट, आपण देवाचे नियमशास्त्र जितके अधिक जाणू, तितकेच अधिक स्पष्टपणे आपल्याला ख्रिस्ताच्या परिपूर्ण आज्ञापालनाचा आवाका दिसून येईल. बायबल आपल्याला ही खात्री देते की जरी प्रभू येशू “नियमशास्त्राधीन असा जन्मला” होता (गलती ४:४), तरी त्याने “सर्व धर्माचरण पूर्णपणे केले” (मत्तय ३:१५), आणि “त्याने पाप केले नाही” (१ पेत्र २:२२). तुम्ही दहा आज्ञांची परिपूर्णता विचारात घेतां तेव्हा ख्रिस्त हा परिपूर्ण नियमशास्त्र पाळणारा होता हेही विचारात घ्या. देवाच्या पवित्र नियमशास्त्रानुसार जीवन जगलेला असा एकच तो आहे. आपल्या प्रभू येशूची प्रत्येक कृती परिपूर्णपणे त्या नियमशास्त्रानुसार होती: आपल्या प्रभू येशूला आलेला कोणताही विचार कधीही देवाच्या नियमशास्त्राविरुद्ध नव्हता; बोललेला त्याचा प्रत्येक शब्द हा देवाचा परिपूर्ण शब्द होता. ख्रिस्ताची परिपूर्णता ही अशी होती.
तिसरी गोष्ट, नियमशास्त्र आपल्याला जे परिपूर्ण नीतिमत्व बहाल करण्यात आले आहे ते शिकवते. (रोम ५:१८-१९). जर आपण तारणदायी विश्वासाने त्याच्याशी जोडले गेले आहोत तर आपण संपूर्ण नियमशास्त्र पाळले आहे असे देव मानतो. अशा रीतीने, आपल्याला ख्रिस्तामध्ये जे परिपूर्ण नीतिमत्व आहे ते देवाचे नियमशास्त्र आपल्याला दाखवते. आपण आपला विश्वास प्रभू येशूवर ठेवल्यानंतर, नियमशास्त्राविरुद्ध आपण केलेली गैरकृत्यें त्याच्यावर ठेवण्यात येतात — आणि तो त्याचे दुःखसहन आणि मरणाने त्या पापांकरिता प्रायश्चित्त करतो. पण त्याच्यावरील विश्वासाने नियमशास्त्राचे त्याने केलेले परिपूर्ण आज्ञापालन सुद्धा आपल्याला बहाल केले जाते — इतक्या परिपूर्णपणे की आपण ख्रिस्ताच्या परिपूर्णतेची वस्त्रें घातलेले असे देव आपल्याला पाहतो! “तू देवासमोर नीतिमान कसा आहेस?” ह्या प्रश्नाच्या उत्तरांत हायडेलबर्ग कॅटेकिझम सुंदर रीतीने हे म्हणते : “देव, माझी काहीही गुणवत्ता नसतांना,पण केवळ कृपेने, ख्रिस्ताचे परिपूर्ण समाधान, नीतिमत्व आणि पावित्र्य मला देतो आणि बहाल करतो, आणि असे की जणूकाही माझ्या हिशेबी कधीही कोणतेही पाप नव्हते, किंवा मी कधीही कोणतेही पाप केले नव्हते: होय, जणूकाही ख्रिस्ताने माझ्यासाठी जे आज्ञापालन मिळवले होते ते पूर्णपणे मीच मिळवले होते” (प्रश्न ६०).
चौथी गोष्ट, नियमशास्त्र ख्रिस्ताचे नैतिक सौंदर्य आपणामध्ये घडवले जात असण्याविषयी शिकवते —त्यांच्या पवित्रीकरणात ख्रिस्ती लोकांनी राहण्याचे ध्येय ठरवून त्या करिता झटले पाहिजे. पौल हे शिकवतो की दहा आज्ञा प्रीतीचा अर्थ काय आहे ह्यावर प्रकाश टाकतात, आणि जेव्हा आपण एकमेकांवर खरीखुरी प्रीती करतो तेव्हा त्या पूर्णपणे पाळल्या जातात. (रोम १३:८-१०).मग, थोडक्याच वचनांनंतर, तो लिहितो, “तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.” म्हणून, जेव्हा विश्वासाने त्याच्याकडे दृष्टी लावत आणि देवाच्या नियमशास्त्राचे अधिकाधिक पालन करत आपण त्याच्यासारखे अधिक होत जातो, तेव्हा आपण येशूला अधिकाधिक प्रमाणात परिधान करतो.
जेव्हा तुम्ही दहा आज्ञा ऐकता, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी विचार करा. नियमशास्त्राचे तुम्ही केलेल्या उल्लंघनांचा आणि ख्रिस्ताने त्यांच्याकरिता कसे प्रायश्चित्त केले त्याचा विचार करा. त्यामुळे त्याच्याप्रत तुमचे हृदय कृतज्ञ होईल! ख्रिस्त दहा आज्ञांनुसार जीवन जगला आणि त्याने त्याचे नीतिमत्व विश्वासाने तुम्हाला दिले त्यातील त्याच्या परिपूर्णतेचा विचार करा. आणि पवित्र आत्म्याद्वारे तो तुमच्या अंतःकरणात वस्ती करतो तेव्हा तो तुम्हांमध्ये जे पावित्र्य प्रत्यक्षपणे घडवतो त्याचा विचार करा. ह्याने तुम्हाला कळेल की ख्रिस्तच तुमचे सर्व काही आहे!