देवाने दिलेले समाधान/तृप्ती

फिल. ४:११बमधे पौल लिहितो, “कारण ज्या स्थितीत मी असेन तित तृप्त राहण्यास शिकलो आहे. हे ख्रिस्ती व्यक्तीचे आगळेवेगळे असे पाचारण आणि अद्भुत विशेषाधिकार नाही का, म्हणजे, जीवनात खरे समाधान असणे आणि ते दाखवणे ? उदाहरणार्थ, इब्री १३:५, १ तिमथ्य ६:६, फिलिप ४:६-७, आणि स्तोत्र ३७:४ पहा. जीवनातील ख्रिस्ती समाधान तुम्ही जाणता का आणि तुमच्यातून ते समाधान प्रज्वलित होते का?

कोणी एकाने म्हटले आहे तसे, ख्रिस्ती समाधान केवळ “देवाने केलेल्या तरतुदीला बिलगून राहणे” एवढेच नाही, पण अधिक मूलभूतपणे, सर्व पुरवणाऱ्या देवाला बिलगून राहणे आहे. विल्हेमस ब्रॅकेल ह्या विषयावरील त्याच्या उपयुक्त अध्यायात असे निवेदन करतो की समाधान/तृप्ती हा “स्वतःला समाधानी ठेवण्याचा मानसिक निर्धार नसतो, तर जीवाचा कल किंवा प्रवृत्ती असते…..विश्वास जेवढा अधिक मजबूत असेल, तेवढेच देवाच्या इच्छेनुरूप अधिक मोठे समाधान देखील असेल.” अनुकूल परिस्थितीं आणि पुष्कळ मालमत्तां मिळवण्यात समाधान/तृप्ती मिळत नाही, पण ख्रिस्ताशी संयुक्त राहून आणि त्याच्या सहभागितेत, प्रभूसमोर त्याच्या आज्ञापालनात आणि सेवेत राहून केवळ त्रैक देवातच ते मिळते. (स्तोत्र २३).

उत्पत्ती ३मध्ये सांगितली आहे आणि तेव्हापासून इतिहासात सतत ज्याची पुनरावृत्ती झाली आहे ती सैतानाची लबाडी ही आहे की समाधान/तृप्ती देवाला बाजूला करून किंवा त्याच्याविना मिळू शकते. तुम्ही स्वतः सैतानाची ही लबाडी कधी अनुभवली आहे का? हे अधार्मिक जग अगणित प्रकारच्या असंतुष्टता व विरून जाणाऱ्या स्वप्नांचे क्लेश अनुभवत आहे, देवासमोर बंडखोरी आणि अविश्वासात राहत आहे. (यशया ५७:२०-२१). विश्वासणाऱ्या ख्रिस्ती लोकांनी, कुरकुरींनी मातलेल्या आपल्या अस्वस्थ जगाला शांतीपूर्ण संतुष्टपणाचे विनम्र फळ दाखवले पाहिजे. (फिलिप २:१४-१५). तुम्ही अंधारमय व कठीण परिस्थितीत देखील तुमचा प्रकाश संतुष्टपणाच्या डौलाने चमकू देता का?

आपण खरेपणाने व सतत, पाप्यांचा तारक, जो ख्रिस्त त्याच्यावर आत्म्याने घडवून आणलेला पश्चाताप व विश्वासाने आपली दृष्टी लावून ठेवतो आणि अशा रीतीने येशू कृपेने केवढा परिपूर्ण आणि कृपाळू तारक आहे आहे हे आपल्याला आढळते त्यानुसार ख्रिस्ती संतुष्टपणा अनुभवला जातो. (कलसे २:९-१०). ब्रॅकेल म्हणतो तसे, “जर सर्व काही पुरवणारा तुमचे तारण आहे, तर मग तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची काही गरज असणार आहे का? तुम्हाला तो हजार विश्वांहून अधिक फायद्याचा नाही का? ……..म्हणून, धार्मिक लोकांसारखे बोला आणि आचरण करा. परमेश्वर माझा वतनभाग आहे असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन. (विलाप ३:२४).

जर्माया बरोजने “द रेअर जुवेल ऑफ ख्रिश्चन कंटेन्टमेंट” ह्या त्याच्या अभिजात पुस्तकात असेच लिहिले आहे की “दुसऱ्या ख्रिस्ती व्यक्तीपासून बळ मिळाल्याने, स्वतामधून बाहेर निघून येशू ख्रिस्ताकडे जाण्याने, त्याच्या विश्वासानुसार खिस्ताने कृती केल्याने आणि येशू ख्रिस्ताचे बळ त्याच्या स्वतःच्या जिवात आणण्याने आणि त्यामुळे देव जे काही त्याच्यावर येऊ देतो ते सहन करायची येशू ख्रिस्ताकडून कुवत मिळाल्याने, ख्रिस्ती व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत समाधान आढळते.

तुम्ही हे ठामपणे म्हणून दाखवून देऊ शकता का की ख्रिस्ताकडे दृष्टी लावून आणि त्याच्यामध्ये व पवित्र आत्म्याच्या कार्याने त्याच्या वचनामध्ये राहत असतांना, कोणत्याही परिस्थितीत असमाधानी होण्याचे काहीही कारण मिळत नाही, उलट ते केवळ खऱ्या आणि वाढत्या समाधानासाठी उपयुक्त ठरते. तो उत्तम मेंढपाळ त्याच्या लोकांना “माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे” ही कबुली स्वर्गाचे राज्य येण्याच्या अपेक्षेने व आपल्या त्रैक देवाची स्तुती आणि मान सन्मानासाठी करत राहावी असे सांगतो. तुमच्या घरी, शाळेत, चर्चमध्ये, आणि नोकरी करता त्या ठिकाणी तुम्ही हे पवित्र, हर्षभरित समाधान व्यक्त करत आहात का? ख्रिस्ती समाधानीपणा बाळगून आणि तो दाखवून तुमच्या जीवनातील कोणत्या क्षेत्रांत तुम्ही वाढू शकता?

असमाधानीपणा पासून समाधानीपणा कडे नेण्यासाठी, तारणारा आपल्याला साद घालतो, “तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन ……….मी त्याला गव्हाचे सत्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन” (स्तोत्र ८१:१०ब, १६).

जो देव त्याच्या लोकांना निरंतर आणि सार्वकालिक समाधानात घेऊन जाईल त्याची स्तुती करा! आमचा तारक देव, ज्याच्यापासून खऱ्या खुऱ्या समाधानासह सर्व आशिर्वादांचा ओघ उपजतो त्याला सर्व मान सन्मान द्या! १ तिमथ्य ६:६मध्ये पौल जे म्हणतो त्याच्यावर विचार करा: “संतोषसंहित असलेली सुभक्ती तर मोठाच लाभ आहे”. ख्रिस्ती समाधानीपणाची देणगी आणि पारितोषिक लाभावे म्हणून ख्रिस्ताच्या शाळेत तुमची नावनोंदणी झाली आहे का? “तो सर्व सांत्वनदाता देव” (२ करिंथ १:३)येशू ख्रिस्तामध्ये आणि त्यांच्याद्वारे आणखी अधिक विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अजूनही उभा आहे. “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे; तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे” (२ करिंथ ८:९)

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.