चाल्सेडोनचा विश्वासांगीकार, इ. स. ४५१
चाल्सेडोनच्या विश्वव्यापी परिषदेने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीत्वासंबंधी आणि स्वभावासंबंधी असलेल्या विवादांचे निराकरण केले आणि दैवी व्यक्तीत्वाच्या ऐक्याबाबतची सत्ये आणि ख्रिस्ताच्या दैवी आणि मानवी स्वभावांतील एकीकरण आणि वेगळेपणा एका विश्वासांगीकाराद्वारे स्थापित केला.
त्याने विशेषतः नेस्टोरियनवादातील त्रुटीचा निषेध केला, एक असा सिद्धांत की देहधारी ख्रिस्तामध्ये दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या, एक मानवी आणि एक दैवी. हा सिद्धांत ख्रिस्तामधील दैवी आणि मानवी व्यक्तिंचे ऐक्य नाकारतो; अपोलिनेरियनवादातील चूक, जो ख्रिस्त पूर्ण मानवी स्वभावाचा असल्याचे नाकारतो; आणि युटिचियनवाद म्हणून ओळखली जाणारी चूक, ज्यामध्ये आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दैवी आणि मानवी स्वभावातील द्विविधता आणि फरक नाकारला आहे.
ख्रिस्ताच्या व्यक्ती आणि स्वभावाविषयी चाल्सेडोन येथे जो विश्वासांगीकार स्थापित केला गेला तो त्या काळापासून सार्वत्रिक मंडळीचा विश्वासांगीकार म्हणून वापरला जातो.
विश्वासांगीकार
तेव्हा, आम्ही, पवित्र पूर्वजांचे अनुसरण करून, सर्वजण एकमताने लोकांना एकुलता एक पुत्र, आपला प्रभु येशू ख्रिस्त, जो देवत्वात परिपूर्ण आणि मनुष्यत्वातही परिपूर्ण आहे असा विश्वास ठेवण्यास शिकवतो; पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य, एक बुद्धीसंपन्न आत्मा आणि शरीर; देवत्वानुसार पित्याशी एकतत्व आणि देहानुसार स्वरुपात फरक असूनही शारीरिक किंवा स्वाभाविक साम्य असलेला; सर्व गोष्टींमध्ये आपल्यासारखा, पापविरहीत; सर्व युगांपूर्वी देवत्वानुसार पित्यापासून जन्मास आलेला, आणि या अलीकडच्या दिवसांमध्ये, आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी, देवाची आई, कुमारी मरीया हिजपासून जन्मलेला, देहस्वभावानुसार; तोच एक ख्रिस्त, पुत्र, प्रभु, एकुलता एक, त्याच्यात दोन स्वभाव आहेत हे मान्य करून, संभ्रम निर्माण न करता, बदल न करता, मतभेद न करता, वेगळे न करता; स्वभावांमधील वेगळेपणाचा ऐक्यावर कोणताही परीणाम होऊ न देता, त्याऐवजी प्रत्येक स्वभावातील गुणधर्म कोणत्याही प्रकारे लुप्त न झालेला, एका व्यक्तीत्वात आणि एका अस्तित्वात समरूप आहे, दोन व्याक्तित्वांमध्ये विभाजित किंवा विभागलेला नाही, तर एक आणि एकच पुत्र, आणि एकुलता एक, देव जो शब्द, प्रभु येशू ख्रिस्त; जसे सुरुवातीपासूनच्या संदेष्ट्यांनी त्याच्याबद्दल घोषित केले आहे, आणि प्रभु येशू ख्रिस्ताने स्वतः आम्हाला शिकवले आहे, आणि पवित्र पूर्वजांच्या विश्वासांगीकाराने आम्हाला सुपूर्द केले आहे.