पवित्र त्रैक्य

ख्रिस्ती, यहुदी आणि मुसलमान सर्व एकाच देवाची उपासना करतात असा दावा करताना लोकांना ऐकणे सर्वसामान्य आहे. खरे नाही. अल्लाची उपासना करणारे लोक, किंवा अब्राहमाच्या देवाची उपासना करण्याचा दावा करणारे यहुदी लोक ह्यांच्या विपरीत, ख्रिस्ती लोक खऱ्या आणि जिवंत देवाची उपासना करतात, जो स्वतःला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तीन व्यक्तींमध्ये प्रकट करतो. असे म्हटले जाते की पवित्र त्रैक्य ही ख्रिस्ती धर्माची सर्वात विशिष्ट शिकवण आहे. जरी अनेक मार्गांनी त्रैक्याची शिकवण आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे, तरीही आपण ह्या शिकवणीवर विश्वास ठेवतो कारण अशा प्रकारे देव आपल्या वचनातून स्वतःला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या नात्याने प्रकट करतो, जो एकच खरा देव आहे.


त्रैक्याच्या सिद्धांतावर चर्चा करणे हा एक कठीण विषय आहे, कारण तो मानवी भाषा आणि तर्कशास्त्राच्या मर्यादेपलिकडचा आहे. ह्या शिकवणीमुळे आपल्यापुढे जरी अडचणी निर्माण होत असल्या, तरी आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि देव त्रैक आहे हे कबूल केले पाहिजे, कारण अशाच प्रकारे देव त्याच्या वचनातून स्वतःला प्रकट करतो. देवत्वातील तीन व्यक्ती दैविक सत्ता, गौरव आणि वैभवात समान आहेत. नव्या करारात तीन व्यक्तींपैकी प्रत्येकाला स्पष्टपणे “देव” म्हटले आहे. आणि त्या प्रत्येकाला समान दैवी गुणधर्म, तसेच समान गौरव आणि वैभव दिलेले आहे जे त्रैक्यातील इतर व्यक्तींना दिलेले आहे.


एकच देव आहे ह्या बाबतीत पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट आहे. अनुवाद ६:४ मध्ये, मोशे घोषित करतो की “हे इस्राएला, ऐक: आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे.” यशया ४४:६ मध्ये आपण वाचतो “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच.” नव्या करारात जरी आपण देवत्वाच्या पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तीन भिन्न व्यक्तींबद्दल शिकतो, तरी तेथेही सगळीकडे आपल्याला दावा आढळून येतो. १ करिंथ. ८:४-६ ह्या वचनांमध्ये, पौल लिहितो, “जगात (देवाची) म्हणून मूर्तीच नाही, आणि एकाखेरीज दुसरा देव नाही. कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले, आणि अशी बरीच ‘दैवते’ व बरेच ‘प्रभू’ आहेतच, तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत; आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहोत.” इतरत्र याकोब लिहितो, “एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात – व थरथर कापतात!” (याकोब २:१९). पवित्र शास्त्र स्फटिकासारखे स्पष्ट आहे, केवळ एकच देव आहे.


तरीही पवित्र शास्त्र अगदी स्पष्टपणे शिकवते की देव एक असला तरी तो पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तीन व्यक्तींमध्ये प्रकट झाला आहे. संपूर्ण नव्या करारात देवत्वाच्या तीन व्यक्तींचा एकत्रित उल्लेख केला आहे. जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाद्वारे येशूचा बाप्तिस्मा होतो, तेव्हा देवाचा आत्मा येशूवर कबुतराच्या रूपात उतरून येत असताना पिता घोषित करतो, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे,” (मत्तय ३:१६-१७). मत्तय २८:१८ मध्ये, येशू आपल्या शिष्यांना आज्ञा देतो की “म्हणून जा आणि सर्व राष्ट्रांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.” मंडळीचे ध्येय म्हणजे जगात जाणे आणि देवत्वाच्या (पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा) तीन व्यक्तींच्या नावाने (एकवचन) बाप्तिस्मा देऊन शिष्य बनवणे हे आहे.


करिंथिकरांना लिहिलेल्या पौलाच्या दुसऱ्या पत्रातील त्याच्या आशीर्वादात, तो त्याच्या वाचकांना त्रैक देवाच्या नावाने आशीर्वाद देतो (२ करिंथ. १३:१४). ” प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.” योहान १४:२६ मध्ये, येशू शिष्यांना सूचित करतो की ” ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्वकाही शिकवील.” मानवी देहातील देव ह्या नात्याने येशू पवित्र आत्मा आणि पिता हे दोघेही समान आहेत असा त्यांचा उल्लेख करतो.


पवित्र शास्त्रातील त्रैक्याचा आणखी एक पुरावा म्हणजे देवत्वाच्या तीन व्यक्तींपैकी प्रत्येकाला समान दैवी गुणधर्म, गौरव आणि वैभव असल्याचे सांगितले आहे. पवित्र शास्त्र शिकवते की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघेही सार्वकालिक आहेत. यशयाच्या मते, देव म्हणतो, ” मी आदी आहे, मी अंत आहे,” (यशया ४४:६) आणि पौल त्यात भर घालतो की देव “सार्वकालिक” आहे (रोम. १६:२६) म्हणजे, त्याला सुरुवात किंवा शेवट नाही. पुत्र असे म्हणत असल्याची योहान नोंद करतो की, “मी’ अल्फा व ओमेगा म्हणजे ‘पहिला व शेवटला,’ आदी व अंत असा आहे” (प्रकटी. २२:१३) आणि मीखा अशी नोंद करतो की “त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.”(मीखा ५:२). इब्री लोकास पत्रामध्ये आपण पवित्र आत्म्याबद्दल “सार्वकालिक आत्मा” असे वाचतो (इब्री. ९:१४). पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा सार्वकालिक आहेत, त्यांना सुरुवात किंवा शेवट नाही.


पवित्र शास्त्र हे देखील सांगते की पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत. पौल म्हणतो, “ज्या देवाने सर्व काही निर्माण केले” (इफिस. ३:९), तर स्तोत्रकर्ता घोषित करतो की “परमेश्वर हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हांला उत्पन्न केले; आम्ही त्याचेच आहोत” (स्तोत्र १००). तसेच, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण पुत्राबद्दल वाचतो, “सर्वकाही त्याच्या (येशूद्वारे) द्वारे झालेआणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही” (योहान १:३). कलस्सै. १:१५-१७ मध्ये, पौल लिहितो की येशू “तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे; कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्वकाही त्याच्या द्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे.” ईयोबमध्ये, आपण पवित्र आत्म्याबद्दल वाचतो, “परमेश्वराच्या आत्म्याने मला बनवले आहे.” उत्पत्ति १:१ मध्ये आपण वाचतो की निर्मितीच्या वेळी “देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.” पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांनी सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत असे म्हटले जाते. आपण पित्याबद्दल जे बोलू शकतो तेच आपण पुत्राबद्दल आणि पवित्र आत्म्याबद्दलही बोलू शकतो.


पवित्र शास्त्रासंबंधी पुराव्याच्या ह्या संक्षिप्त सारांशावरून आपण पाहतो की, म्हणूनच आपण ह्या गोष्टीची पुष्टी केली पाहिजे की एक देव आहे जो तीन भिन्न व्यक्तींमध्ये अस्तित्वात आहे – पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, जे गौरव, वैभव आणि सामर्थ्याने समान आहेत. अशा प्रकारे देव त्याच्या वचनातून स्वतःला प्रकट करतो.

Used with permission from www.monergism.com

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.