येशू ख्रिस्ताचे देवत्व

यहुदी आणि मुसलमान लोकांप्रमाणेच ख्रिस्ती लोक हे एकेश्वरवादी आहेत. परंतु यहुदी आणि मुसलमान लोकांच्या विपरीत, ख्रिस्ती लोक त्रैक्यवादी आहेत. आमचा असा विश्वास आहे की एकच त्रैक देव आहे आणि तो तीन भिन्न व्यक्ती म्हणून प्रकट झाला आहे: पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. जेव्हा पुत्राचा (येशू ख्रिस्त) संबंध येतो, तेव्हा पवित्र शास्त्र सर्वत्र अशी पुष्टी करते की येशू खरा आणि सार्वकालिक देव आहे, तो अनिर्मित, आणि सुरुवात किंवा शेवट नसलेला असा आहे.


ख्रिस्ती धर्मातील येशूचे मध्यवर्ती स्थान पाहता, अर्थातच, कोणीही येशूबद्दल वाईट बोलू इच्छित नाही. ख्रिस्तीतर धर्म बहुतेक वेळा येशूला सहयोगित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे करणे सोपे नाही कारण येशू ख्रिस्ताच्या देवत्वाची शिकवण ख्रिस्ती धर्माला इतर सर्व धर्मांपेक्षा वेगळे करते. जर येशू हा खरा आणि सार्वकालिक देव आहे, तर देवाविषयीची ख्रिस्ती शिकवण जागतिक धर्मांमध्ये अद्वितीय आहे. विडंबना अशी आहे की जवळजवळ सर्व धर्म येशूला संदेष्टा किंवा शिक्षक म्हणून सन्मानित करतात, तरीही ते सर्व येशूबद्दलचा नव्या करारातील मुख्य मुद्दा नाकारतात (अस्पष्टपणे किंवा स्पष्टपणे) – की तो मानवी देहात देव आहे, ज्यावर येशूने स्पष्टपणे विश्वास ठेवला आणि तसे स्वतःबद्दल घोषित केले.


येशू ख्रिस्ताच्या देवत्वाची शिकवण हा आरंभीच्या मंडळीचा आविष्कार नाही हे केवळ पवित्र शास्त्राची पाने तपासल्याने आणि दोन्ही करारांमधील येशूच्या देवत्वाविषयीच्या महत्त्वपूर्ण शिकवणीवरून दिसून येते. येशूच्या देवत्वाच्या पुराव्यांपैकी एक सर्वात सामर्थ्यशाली पुरावा येशूच्या जन्माच्या शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या यशया ७:१४ मधील प्रसिद्ध मशीहा विषयक भविष्यवाणीत सापडतो. “ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.” मशीहाची चमत्कारिक रीतीने गर्भधारणा होईल आणि त्याला “आमच्यासन्निध देव” हे नाव दिले जाईल.” यशया ९:६ मध्ये आपण वाचतो, “कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.” (यशया ९:६). हे वचन देखील येशू ख्रिस्ताच्या संदर्भात आहे.


यशयामधील मशीहाविषयक भविष्यवाण्यांव्यतिरिक्त, आमच्याकडे अनेक मशीहाविषयक स्तोत्रे आहेत (उदा. ८, ८९, ११०), ज्यामध्ये पुत्र अत्याधिक उंच केलेला आणि गौरव आणि वैभवात समान असल्याचे पिता सांगतो. आमच्याकडे नीतिसूत्रे ८:२२-३१ सारखी वचने देखील आहेत, जी “ज्ञानाला” साक्षात रूप देतात (जेव्हा ह्या वचनांची नव्या करारात पूर्णता झाल्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहिले जाते, तेव्हा ती स्पष्टपणे सार्वकालिक पुत्र जो देवाकडून आलेले ज्ञान आहे त्याच्या संदर्भात असल्याचे लक्षात येते.), तसेच मीखा ५:२ ह्या वचनात संदेष्टा बेथलेहेममध्ये जन्माला येणाऱ्याचा (येशूचा) उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे असे सांगतो. येणाऱ्या मशीहाला वारंवार सर्वशक्तिमान देव, अनंतकाळचा पिता, देवाचे ज्ञान, नीतिमान, अत्याधिक उंच केलेला, तरीही एका सर्वसाधारण कुमारीपासून जन्म घेणार असलेला असे संबोधले आहे. ही भविष्यसूचक वचने केवळ एकाच व्यक्तीबद्दल बोलू शकतात: इस्राएलचा येणारा उद्धारकर्ता, येशू ख्रिस्त, जो अब्राहामाचा देव आहे (हा संदर्भ पाहा: योहान ८:५८).


नव्या करारात, येशूला सार्वकालिक आणि पूर्वअस्तित्व असल्याचे म्हटले आहे. योहान १:१ मध्ये आपण वाचतो, “प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.” योहान आणि पौल ह्या दोघांनीही येशूचे वर्णन सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आणि पालनकर्ता असे केले आहे. “सर्वकाही त्याच्या द्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही” (योहान १:३) आणि कलस्सै. १:१६-१७ मध्ये, पौल येशूबद्दल म्हणतो, “कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्वकाही त्याच्या द्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे; तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे.”


नव्या कराराच्या सर्व पानांवर येशूला “देव” म्हणून ओळखले गेले आहे. योहान २०:२८ मध्ये, थोमा येशूसमोर गुडघे टेकतो आणि येशूविषयी कबुली देतो, “माझा प्रभू व माझा देव!” तीत. २:१३ मध्ये, पौल येशूच्या दुसऱ्या आगमनाविषयी बोलतो, ” आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत…” इब्री लोकास पत्रचा लेखक येशूबद्दल लिहितो, ” पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, “हे देवा, तुझे राजासन युगानुयुगाचे आहे; आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे.” (इब्री १:८).


तसेच येशूची अशी काही वैशिष्ट्ये आहेत जी केवळ देवाला लागू होऊ शकतात. येशू हा उपासनेचा उद्देश आहे (मत्तय २८:१६-१७), त्याच्याकडे मृतांना जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे (योहान ५:२१; ११:२५), आणि तो मानवजातीचा अंतिम न्यायाधीश आहे (मत्तय २५:३१-३२). येशूकडे सार्वभौम सामर्थ्य आणि अधिकार आहे (मत्तय २८:१८), तसेच त्याला पापांची क्षमा करण्याचे सामर्थ्य आहे. (मार्क २:५-७). तो स्वतः देव असल्याचा दावा तर करतोच (योहान १४:८-९), शिवाय तो स्वतःला अल्फा आणि ओमेगा म्हणजे “पहिला व शेवटला” म्हणतो – एक दैवी स्व-पद (प्रकटी. २२:१३).


संपूर्ण पवित्र शास्त्रात येशूने स्वतःला खरा आणि सार्वकालिक देव, सर्वशक्तिमान, देवत्वातील दुसरी व्यक्ती, निर्माणकर्ता आणि ज्याची आम्ही उपासना आणि सेवा केली पाहिजे असे प्रकट केले आहे. खरे पाहता, आम्ही देवाबद्दल जे बोलू शकतो, तेच आम्ही येशूबद्दलही बोलू शकतो.

USED WITH PERMISSION FROM WWW.MONERGISM.COM

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.