पवित्र आत्म्याचे व्यक्तीत्व आणि कार्य

आपण अनेकदा लोक पवित्र आत्म्याबद्दल पुलिंगी “तो” नव्हे तर नपुसकलिंगी “ते” असे बोलताना ऐकतो. असे घडण्याचे एक कारण म्हणजे पवित्र आत्म्याच्या कार्याचे स्वरूप येशू ख्रिस्ताला गौरव देणे हे आहे, स्वतःला नाही. म्हणूनच जे.आय. पॅकर पवित्र आत्म्याला “त्रैक्यातील लाजाळू सदस्य” असे म्हणतात. पण आत्म्याच्या ह्या स्वयंभू भूमिकेचा अर्थ असा नाही की पवित्र आत्मा व्यक्ती नाही आणि देव नाही. त्रैक्याच्या इतर सदस्यांप्रमा णेच आत्म्यामध्ये समान दैवी गुणधर्म आहेत. जसे आपण पित्याला देव म्हणून, पुत्राला देव म्हणून ओळखतो, तसेच आपण पवित्र आत्म्याला देव म्हणून ओळखले पाहिजे. तो पवित्र त्रैक्यातील तिसरी व्यक्ती आहे.


पवित्र शास्त्रात येशूच्या देवत्वाविषयी जितके पुरावे आहेत तितके पवित्र आत्म्याच्या देवत्वाविषयी जरी नसले, तरी जे पुरावे आहेत ते स्पष्ट किंवा निर्णायक नाहीत असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. पवित्र आत्मा हा देव आहे ह्या पवित्र शास्त्राच्या थेट प्रतिपादनापासून आपण सुरुवात करतो. प्रे. कृ. ५:३-४ मध्ये, आपण हनन्या आणि सप्पीरा ह्यांची गोष्ट वाचतो, विशेषत: त्यांनी केलेली फसवणूक आणि त्यांच्यावर लावण्यात आलेला आरोप ह्याविषयी. “तू मनुष्यांशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.” पवित्र आत्म्याशी खोटे बोलणे (जसे त्यांनी केले) म्हणजे देवाशी खोटे बोलणे होय. १ करिंथ. ३:१६ मध्ये, पौल आपल्याला सांगतो की जो आत्मा आपल्यामध्ये राहतो तो देवाचा आत्मा आहे. तो १ करिंथ. ६:१९ मध्ये हाच मुद्दा मांडतो. काहीही म्हणा, पौलाच्या ह्या दोन्ही टिप्पण्या पवित्र आत्म्याच्या देवत्वाविषयी अप्रत्यक्षरित्या बोलतात.


जुन्या करारात पवित्र आत्म्याच्या देवत्वाचा महत्त्वपूर्ण पुरावा आढळतो. यशया ६३:१० मध्ये, यशया देवाच्या आत्म्याबद्दल बोलतो, तसेच स्तोत्रकर्ता स्तोत्र ९५:९ मध्ये हेच सांगतो. इब्री. ३:७-९ मध्ये इब्री लोकास पत्राचा लेखक स्तोत्र ९५ मध्ये देवाने बोललेल्या शब्दांचे श्रेय पवित्र आत्म्याला देतो. “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली, … चाळीस वर्षे.” जुन्या करारातील संदेष्ट्यांनी जे श्रेय देवाला दिले तेच श्रेय इब्री लोकास पत्राचा लेखक पवित्र आत्म्याला देतो.


संपूर्ण पवित्र शास्त्रात, पवित्र आत्म्याला दैवी गुणधर्म असल्याचे म्हटले आहे. उत्पत्ति १:१-२ मध्ये आपण वाचतो की “देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.” योहान आणि पौल जसे निर्मितीच्या कार्याचे श्रेय पुत्राला (जो खरा आणि सार्वकालिक देव आहे) दिले आहे, त्याचप्रमाणे, मोशेने देखील निर्मितीच्या कार्याचे श्रेय पवित्र आत्म्याला दिले आहे. स्तोत्र ३३:६ मध्ये, स्तोत्रकर्ता म्हणतो की पवित्र आत्मा (रुआक, देवाचा श्वास) सर्व गोष्टी निर्माण करतो. जसा पुत्र सार्वकालिक आहे, तसाच पवित्र आत्मा देखील आहे, जो सर्व गोष्टी निर्माण होण्यापूर्वी देवासोबत होता.


ईयोब ३३:४ मध्ये आपण वाचतो, “देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्वसमर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे.” जसे पिता आणि पुत्र आपल्याला जीवन देतात, तसेच पवित्र आत्मा देखील देतो. परंतु पवित्र आत्मा आपल्याला केवळ जीवन आणि श्वास देतो असे नाही तर तो आपल्याला नवा जन्म देखील देतो, जे फक्त देवालाच शक्य आहे (योहान ३:५). जोपर्यंत देवाचा आत्मा आपल्याला अनंतकाळचे जीवन देत नाही तोपर्यंत आपण देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.
तसेच आपल्याकडे आत्म्याला लागू केलेल्या दैवी गुणधर्मांची संपूर्ण यादी आहे. तो सर्वज्ञ आहे (स्तोत्र १३९:७-१० मध्ये, स्तोत्रकर्ता म्हणतो की पवित्र आत्मा सर्वत्र उपस्थित आहे). १ करिंथ. २:११ मध्ये, पौल म्हणतो की आत्मा सर्व गोष्टींचा, अगदी देवाच्या सखोल गोष्टींचा शोध घेतो. देव सर्वव्यापी आहे. पवित्र आत्मा सर्वव्यापी आहे. म्हणून, पवित्र आत्मा देव आहे. पवित्र आत्मा सर्वशक्तिमान आहे हे देखील पवित्र शास्त्र शिकवते. यशया ११:२ मध्ये, केवळ देवाकडे जे सामर्थ्य आहे, ते पवित्र आत्म्याकडे असल्याचे म्हटले आहे. पवित्र आत्मा खरोखरच सर्वशक्तिमान आहे, कारण देव सर्वशक्तिमान आहे.


पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याच्या इतर दैवी गुणांचाही उल्लेख आहे. पवित्र आत्मा आपल्या पवित्रीकरणाचा रचनाकार आहे (१ पेत्र. १:२), तो आपल्यावर तारणाच्या दिवसासाठी शिक्का मारतो (इफिस. १:१३-१४), आणि हे सुनिश्चित करतो की देवाने आपल्यामध्ये जे कार्य सुरू केले आहे ते सिद्धीस जाईल. (इफिस. ४:३०). संदेष्टे आणि प्रेषित जे बोलले ते पवित्र आत्म्याद्वारे बोलले (१ पेत्र. १:११) आणि पेत्र घोषित करतो “कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” (१ पेत्र. १:२१). शेवटी, अशी काही वचने आहेत जी विश्वासणाऱ्यांना येशू ख्रिस्ताशी जोडण्यासाठी आत्म्याच्या कार्याबद्दल बोलतात, न घाबरता देवाजवळ जाण्यास त्यांना सक्षम करतात. पवित्र आत्म्याचे वर्णन पौलाने “प्रार्थनेचा आत्मा” असे केले आहे (रोम. ८:१५-१६). तो असा आत्माच आहे जो आपल्याला ख्रिस्ताशी जोडतो आणि आपल्याला देवाचा धावा करण्यास सक्षम करतो. ख्रिस्ताच्या तारणाचे लाभ आपल्याला मिळतील ह्याची खात्री करणे हे आत्म्याचे कार्य आहे.


पवित्र शास्त्रासंबंधीची इतकी माहिती आणि पवित्र शास्त्रातील देवाविषयीचा सध्याच्या काळातील गोंधळ लक्षात घेता, पवित्र आत्मा हा देव असल्याकारणाने (पिता आणि पुत्रासह) आम्ही देवाची उपासना एकात्मतेने आणि देवत्वाची उपासना त्रैक्यात करणे महत्वाचे आहे. कारण देव एक आहे, तरीही प्रत्येक व्यक्ती देव असलेल्या अशा तीन भिन्न व्यक्तींमध्ये प्रकट झाला आहे.
आत्मा हा पवित्र त्रैक्यातील तिसरी व्यक्ती आहे आणि तो खरा आणि सार्वकालिक देव आहे, म्हणून आपण पिता आणि पुत्राप्रमाणेच धन्य पवित्र आत्म्याचे स्तवन, उपासना आणि सेवा केली पाहिजे. कारण, आपला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा झाला आहे (मत्तय २८:९). प्रेषितीय आशीर्वाद हा पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने दिला जातो. म्हणून, आपण सर्व मान, महिमा आणि गौरव पवित्र आत्म्याला दिला पाहिजे, जसा तो आपण देवत्वाच्या इतर सदस्यांना देतो. आम्ही पवित्र आत्म्याची प्रार्थना करतो, आम्ही पवित्र आत्म्याची उपासना करतो, आम्ही धन्य पवित्र आत्म्याचे स्तवन करतो.

USED WITH PERMISSION FROM WWW.MONERGISM COM

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.