ख्रिस्ताचा मृत्यू

पवित्र शास्त्रात जसजसा तारणाचा इतिहास उलगडत जातो, तसतसे देवाच्या तारण करण्याच्या उद्देशाच्या कथेला अनेक आश्चर्यकारक वळणे येतात. एक देवदूत एका तरुण कुमारिकेला सांगतो की खूप प्रतीक्षा केल्यानंतर देवाचा वचनदत्त तारणारा आपल्या लोकांचे तारण करण्यासाठी त्यांची भेट घ्यायला येणार आहे ह्या घटनेने नव्या कराराची सुरुवात होते. येशू मरीयेपासून जन्म घेतो, तो वाढत जाऊन तरुण पुरुष होतो आणि योहानाकडून बाप्तिस्मा घेतल्यानंतर त्याची सार्वजनिक सेवा सुरू करतो (मत्तय ३). आपल्याला मत्तयाच्या शुभवर्तमानात वाचायला मिळते की, “नंतर येशू यहूदी लोकांच्या सभास्थानांत सुवार्तेची घोषणा करत व राज्याची सुवार्ता गाजवत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत गालीलभर फिरला.” (मत्तय ४:२३).
अखेरीस, येशूची सार्वजनिक सेवा त्याला यरुशलेमला घेऊन येते, कारण येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले होते की, “मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्र्यांच्या हाती धरून देण्यात येईल; ते त्याला मरणदंड ठरवतील” (मत्तय २०:१८). बाप्तिस्मा करणारा योहान येशूला पहिल्यांदा भेटला तेव्हा तो त्याच्याबद्दल म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” (योहान १:२९). इस्राएलचा मशीहा आणि कराराचा मध्यस्थ म्हणून येशू आला आणि त्याने संदेष्टा, याजक आणि राजा ह्या अभिषिक्त पदांची पूर्तता केल्यानंतरही, जरी यशया संदेष्ट्याने त्याच्या मृत्यूचे भाकीत केले होते (यशया ५२:१३-५३:१२) आणि अशी भविष्यवाणी केली होती की देवाचा मशीहा एक दुःखसहन करणारा सेवक असेल, तरी त्याच्या मृत्यूची आवश्यकता काहीशी आश्चर्यकारक वाटते. झावळ्याच्या रविवारी जेव्हा येशूने जयघोषात यरुशलेममध्ये प्रवेश केला तेव्हा सर्वांना असे वाटले की बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो देशाचे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी इस्राएलच्या सिंहासनावर त्याचे स्थान घेईल. पण शुक्रवारी दुपारपर्यंत, रोमी वधस्तंभावर टांगलेल्या स्थितीत येशूला वेदनादायक मरण आले. आमच्या तारणाच्या कथेला इतके अंधकारमय आणि पूर्वसूचीत वळण का लागले? येशूला मरण्याची गरज का पडली?
संपूर्ण नव्या करारात, पवित्र शास्त्राचे लेखक येशू का मरण पावला आणि त्याच्या मृत्यूचे आपल्यासाठी काय महत्व आहे हे आपल्याला सांगतात. सर्वप्रथम, येशूचा मृत्यू “आपल्या पापांसाठी” (“पर्यायी प्रायश्चित्त”) आहे आणि त्याचा मृत्यू परिणामकारकरित्या आणि प्रत्यक्षात देवाचा क्रोध त्याच्या लोकांवरून दूर करतो, कारण येशू देवाचा क्रोध स्वतःवर घेतो (“समाधान”). तेव्हा मूलभूत अर्थाने, येशूचा मृत्यू आपल्या पापांच्या अपराधासाठी परिपूर्ण मोबदला देऊन देवाच्या पवित्र न्यायाचे समाधान करतो.
आपण जेव्हा पवित्र शास्त्रातील लेखकांनी येशूच्या मृत्यूचे स्पष्टीकरण करण्यासाठी वापरलेल्या संज्ञा पाहतो तेव्हा त्याच्या मृत्यूचा अर्थ आणि हेतू स्पष्ट होतो. ज्याच्या ऐवजी येशू मरण पावला त्या पाप्याचा पर्याय म्हणून येशू मरण पावला. मार्क १०:४५ मध्ये आपण वाचतो, ” कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे.” इफिसकरांना लिहिलेल्या त्याच्या पत्रात, पौल अशी नोंद करतो की “ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले” (इफिस. ५:२). योहान १०:१४-१८, येशू त्याच्या मृत्यूबद्दल पुढील शब्दांत बोलतो: “मी उत्तम मेंढपाळ आहे; जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. …. मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.” येशू स्वतःच्या मृत्यूचे वर्णन “त्याच्या मेंढरांसाठी” असे करतो.
नव्या करारात आपल्याला आणखी एक संज्ञा आढळते की येशूचा मृत्यू आपल्या पापांसाठी “प्रायश्चित” आहे, एक असा यज्ञ जो, ज्यांच्यासाठी तो आपला प्राण अर्पण करतो, त्यांच्यासाठी देवाचा क्रोध प्रभावीपणे दूर करतो. पौल ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल “त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास” असे बोलतो (रोम. ३:२५). योहान येशूबद्दल म्हणतो की त्याचा मृत्यू एक प्रायश्चित्त आहे आणि त्याचा मृत्यू आपल्याला पापी लोकांवरील देवाची प्रीती दाखवून देतो. “प्रीती म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्याआमच्यावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले” (१ योहान ४:१०).
वचनांच्या आणखी एका संग्रहात, येशूचा मृत्यू एक असे साधन म्हणून मांडण्यात आला आहे ज्याद्वारे पापी लोक ज्या पवित्र देवापासून दूर गेले आहेत त्याच्याशी त्यांचा समेट होतो. पौल रोममधील ख्रिस्ती लोकांना सांगतो, “कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत” (रोम. ५:१०). करिंथकरांना लिहिलेल्या त्याच्या दुसर्‍या पत्रात, पौल पुढे म्हणतो, “ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वत:बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली; म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वत:बरोबर जगाचा समेट करत होता; आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.” (२ करिंथ. ५:१८-१९).
इतरत्र, पौलने ख्रिस्ताच्या मृत्यूचे वर्णन तारणाच्या संदर्भात केले आहे – रोमी जगात गुलामांना स्वतंत्र करण्यासाठी त्यांना विकत घेण्यासाठी दिलेले मोल: “आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’ असा शास्त्रलेख आहे” (गलती. ३:१३). पेत्राने येशूच्या मृत्यूचे वर्णन अगदी अशाच प्रकारे केले आहे – “कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, ‘सोने व रुपे’ अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात” (१ पेत्र. १:१८-१९).
आपण तारणाच्या इतिहासातील शापाविषयी विचार करत असताना, येशूचा मृत्यू हा जरी विस्मयचकित करणारा वाटत असला तरी जेव्हा आपण काळजीपूर्वक पाहतो तेव्हा आपल्याला दिसून येते की हा मृत्यू खऱ्या अर्थाने तारणाचा “लाल रंगाचा धागा” आहे. आपल्या पापांसाठी आपला प्रभू मरण पावणार आहे ही भविष्यवाणी संपूर्ण जुन्या करारामध्ये केली गेली होती आणि नव्या करारात त्या मृत्यूचे संपूर्ण वर्णन आणि काळजीपूर्वक स्पष्टीकरण करण्यात आले आहे. वधस्तंभाचा अर्थ स्पष्ट आहे. “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे” (योहान ३:१६).

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.