येशू एक संदेष्टा, याजक आणि राजा

निदान फार चांगले नाही: आपण अज्ञानी, दोषी आणि भ्रष्ट आहोत. परंतु रोगनिदान अधिक वाईट आहे. आपण शापाखाली आहोत आणि आपल्याला निश्चित मृत्यूला सामोरे जावे लागेल. पतित पापी ह्या नात्याने आपल्या पापांच्या तीन पदरी परिणामामुळे आपली अंतःकरणे अंधकारमय झाली आहेत (रोम. १:२१) आणि आपले विचार सतत वाईट असतात (उत्पत्ति ६:५). आपली मने पापाने ग्रासलेली आहेत आणि देवाच्या गोष्टींबद्दल अज्ञानी आहेत (इफिस. ४:१७-१८). आम्ही आमच्या अपराधाच्या प्रचंड बोजाखाली कण्हत आहोत – आम्ही अनेकदा केलेल्या देवाच्या नियमशास्त्राच्या उल्लंघनांबद्दलचा दंड म्हणून. आपण केवळ आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध पाप केले आहे असा विचार करून आपण स्वतःला फसवू शकतो; हे खरे नाही हे दावीदाला माहीत होते. “तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे” (स्तोत्र. ५१:४). परंतु आपण आपल्या वारशाने मिळालेल्या पापी स्थितीच्या विनाशकारी भ्रष्टतेमुळे ग्रस्त झालो आहोत, जी गर्भधारणेच्या क्षणापासून आपल्या प्रत्येक अवयवाला दुषित करते. स्तोत्रकर्त्याने घोषित केल्याप्रमाणे पापात जन्मलेले असल्यामुळे (स्तोत्र. ५१:५), आपल्यामध्ये काहीही चांगले वसत नाही (स्तोत्र. १४:१-३), आपली शरीरे, जी असामान्यपणे आणि आश्चर्यकारकपणे घडवली गेली आहेत (स्तोत्र. १३९:१४), ती आपल्या अंतःकरणात दडलेली दुष्टता कृतीत आणण्याची साधने बनतात (रोम. ६:१३). वाईट बातमी खूप वाईट आहे. पापामुळे आपण अज्ञानी, दोषी आणि भ्रष्ट होतो आणि आपली स्थिती दयनीय होते.
परंतु ह्या रोगासाठी एक वैभवशाली आणि चमत्कारिक इलाज आहे: शुभवर्तमानातील चांगली बातमी अशी आहे की, “माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे” (मत्तय १९:२६). जॉन कॅल्विन ह्यांनीच ख्रिस्ताचे तथाकथित “तीन पदरी कार्य” सुप्रसिद्ध केले. त्यानंतरच्या सुधारित परंपरेत अनेकांनी वापरलेले, तीन पदरी कार्य येशू ख्रिस्ताला संदेष्टा, याजक आणि राजा म्हणून सादर करते, ज्याने त्याच्या तारणाच्या कार्यात जुन्या करारातील सर्व अभिषिक्त कार्ये पूर्ण केली. कॅल्विन ह्यांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे, ख्रिस्ताचे तीन पदरी कार्य हे आपल्या प्रभूच्या तारणाच्या कार्याचे स्पष्टीकरण देण्याचा एक उत्तम मार्ग आहे, ज्याने योजनेनुसार आपले अज्ञान, आपले अपराध आणि आपल्या भ्रष्टतेवर मात केली आणि ते अजूनही आपल्याला प्रकाश, तारण आणि आशा प्रदान करते.
येशू ज्या भविष्यसूचक कार्यामध्ये मानवजातीसाठी देवाचे प्रतिनिधित्व करतो त्यापासून आपण सुरवात करतो. येशू हा जगाचा प्रकाश आहे (योहान १:४-५), जो आपल्याला देव पिता प्रकट करण्यासाठी येतो (योहान १४:९). मोशेने एका महान संदेष्ट्याविषयी भाकीत केले होते की, “तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरता उभा करील, त्याचे तुम्ही ऐका” (अनुवाद १८:१५). आणि पहिल्या मंडळीची स्थापना होताच हा शास्त्रभाग आपल्या प्रभूला लागू केला (प्रे. कृ. ३:२२-२३). येशू असा संदेष्टा असल्याबद्दल स्वतःविषयी बोलतो (लूक १३:३३), आणि आपला प्रभु स्पष्टपणे त्याच्या पित्याने त्याला जे सांगायला सांगितले आहे तेच सांगितल्याचा दावा करतो (योहान १२:४९; १४:१०, २४; १५:१५; १७:८, २०). येशू भविष्याबद्दल बोलतो (मत्तय २४:३-३५), आणि इतर सर्वांपेक्षा वेगळे आणि आश्चर्यकारक अधिकाराने बोलतो (मत्त ७:२९). खरोखरच, आपल्या प्रभूच्या शब्दांना देवाच्या सामर्थ्याने पाठिंबा दिला आहे, कारण त्याची पराक्रमी कृत्ये त्याच्या संदेशाच्या सत्यतेची पुष्टी करतात (मत्तय २१:११, ४६; लूक ७:१६; २४:१९; योहान ३:२; ४:१९; ७:४०; ९:१७). योहान ६:१४ मध्ये आपल्याला सांगितले आहे की “तेव्हा येशूने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, ‘जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय!’”
ख्रिस्ताच्या याजकीय कार्याने नव्या करारात एक प्रमुख स्थान व्यापलेले आहे आणि त्यात केवळ कार्याचीच चर्चा नाही तर पापी लोकांना त्यांच्या पापातून मुक्त करण्यासाठी ख्रिस्ताच्या बलिदानाच्या मृत्यूचा देखील समावेश आहे. इब्री. ५:१ आणि पुढील काही वचने ह्या नव्या करारातील मुख्य शास्त्रभागात, खर्‍या याजकाची वैशिष्ट्ये मांडली आहेत, “प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांमधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरता नेमलेला असतो, ह्यासाठी की, त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावीत” (व. १). दुसरे, असा याजक देवाने नियुक्त केलेला असतो (व. ४). तिसरा, प्रमुख याजक “पापांसाठी दाने व यज्ञ” अर्पण करतो (व. १). ह्याव्यतिरिक्त, याजक लोकांसाठी मध्यस्थी करतो (इब्री. ७:२५), त्यांना देवाच्या नावाने आशीर्वाद देतो (लूक ९:२२). स्पष्टपणे, येशू ख्रिस्त हा मुख्य याजक आहे. हे वचन येशूला लागू करणारा इब्री लोकास पत्राचा लेखक हा नव्या करारातील एकमेव लेखक असला तरी, तो येशूचा याजक म्हणून वारंवार उल्लेख करतो.
ख्रिस्ताच्या राजा म्हणून केलेल्या कार्याबद्दल, पवित्र शास्त्र घोषित करते की “परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे.” (स्तोत्र. १०३:१९). ख्रिस्त ह्या सध्याच्या युगात त्याच्या राजाधिकाराचे पूर्ण प्रकटीकरण त्याचे एक हजार वर्षांचे राज्य येईपर्यत थांबवून ठेवतो असा युक्तिवाद काही लोक करत असले तरी, सध्याच्या काळात देखील येशू सर्व गोष्टींवर पूर्ण प्रभुत्व गाजवत आहे. येशू राजांचा राजा आहे आणि त्याचे राज्य कृपेचे आणि सामर्थ्याचे राज्य आहे. त्याच्या स्वर्गारोहणात, येशू ख्रिस्त त्याच्या पित्याच्या उजवीकडे वर चढून गेला आहे आणि आताही सार्वभौम प्रभू (देशीय राज्य) म्हणून सर्व सृष्टीवर आणि कराराचा मध्यस्थ म्हणून त्याच्या मंडळीवर राज्य (ख्रिस्ताचे राज्य) करतो.
नव्या करारात वारंवार ख्रिस्ताला “मंडळीचा प्रमुख” म्हणून संबोधले आहे (इफिस. १:२२; ४:१५;५:२३; कलस्सै. १:१८; २:१९). ख्रिस्ताचा त्याच्या मंडळीवरील राज्याचा ख्रिस्त आणि मंडळी ह्यांच्यात निर्माण झालेल्या गूढ संयोगाशी जवळचा संबंध आहे, ज्याचे वर्णन पवित्र शास्त्रात त्याचे शरीर असे केले आहे (१ करिंथ. १२:२७). ख्रिस्ताचे राज्य हे एक आध्यात्मिक राज्य आहे, म्हणून त्याला ध्वज नाही, जागतिक मुख्यालय नाही आणि आकर्षक लोगो देखील नाही. परंतु जेथे ख्रिस्ताचे लोक देवाच्या वचनाची घोषणा ऐकण्यासाठी आणि पवित्र संस्कार स्वीकारण्यासाठी एकत्र जमतात तेथे ते उपस्थित असते (रोम. १४:१७). हे राज्य अशा एका राज्यासारखे आहे ज्याला नव्या करारात वारंवार “देवाचे राज्य” असे म्हटले आहे. हे राज्य जय मिळवणारे राज्य आहे (मत्तय १२:२८), परंतु सांस्कृतिक, आर्थिक किंवा राजकीय संस्थांशी त्याचा काही संबंध नाही (योहान १८:३६). दुष्टांना ह्या राज्याचा वारसा मिळणार नाही (गलाती. ५:२१), ज्यांच्याकडे जग “सर्वात लहानांपैकी एक” अशा दृष्टीकोनातून पाहते, जी बाप्तिस्म्याद्वारे अगोदरच मंडळीचे सभासद झाली आहेत अशी आपली स्वतःची मुले का असेनात. (लूक १८:१६). ते एक वैभवशाली राज्य आहे (१ थेस्सलनी. २:१२), आणि लोक काहीही म्हणत असले तरी ते सध्याचे वास्तव आहे (मत्तय ३:२). विश्वासांगीकारात घोषित केल्याप्रमाणे ह्या राज्याला “अंत नाही” (हा संदर्भ पाहा: २ पेत्र. १:११).
संदेष्टा, याजक आणि राजा ह्या तिहेरी कार्याद्वारे , येशू आपले अज्ञान दूर करतो, तो आपले अपराध दूर करतो आणि तो आपल्याला आपल्या भ्रष्टतेपासून मुक्त करतो. कृपेच्या कराराचा एकमेव मध्यस्थ ह्या नात्याने येशूच्या दृष्टीने काय महत्वाचे होते ह्याची काही वैशिष्टे आपल्याला येथे आढळतात.

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.