ख्रिस्त-केंद्रित विवाहाचे घटक

वैवाहिक जीवन हे कठोर परिश्रमांचे जीवन आहे. तो चाळीस किंवा पन्नास तासांचा कामाचा आठवडा नसून दर आठवड्याला १६८ तास, दरवर्षी ३६५ दिवस, “मृत्यूने आपला वियोग होईपर्यंत” अविरत चालू असलेले हे काम आहे. एकही दिवस सुट्टी नाही किंवा सुट्टी टाकून फिरायला जाता येत नाही किंवा आजारपणाची रजा घेता येत नाहीत. परंतु कठोर परिश्रम म्हणजे दुःख किंवा आनंदाचा अभाव किंवा केवळ कष्ट असा होत नाही. कठोर परिश्रम म्हणजे, मला असे म्हणायचे आहे की वैवाहिक जीवनातील आपल्या नातेसंबंधातील बारीकसारीक गोष्टींकडे आम्ही लक्ष दिले पाहिजे, आपण आपल्या जोडीदाराची त्यागपूर्वक सेवा करायला शिकले पाहिजे आणि आपण स्वतःला अशा घटकांना वाहून घेतले पाहिजे जे वैवाहिक नातेसंबंध वाढवतील, मजबूत करतील आणि त्यात सुधारणा करतील.
पण काही लोक वैवाहिक नातेसंबंधांच्या बाबतीत बेफिकीर असतात. काहीतरी चांगले घडेल अशी आशा बाळगत किंवा पाठीवर पॅराशूट बांधून (अवघड परिस्थितीत वैवाहिक संबंधातून बाहेर पडण्याच्या तयारीत) विवाहाच्यावेळी वचने देतात. येशू ख्रिस्त आणि त्याची वधू प्रतिबिंबित करणारे वैवाहिक जीवन जगण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसतो (इफिस. ५). तरीही, हे अगदी लक्षणीय आहे की जेव्हा पौल येशूच्या त्याच्या मंडळीशी त्याची वधू म्हणून असलेल्या नातेसंबंधाचे वर्णन करतो, तेव्हा तो वैवाहिक जीवनाविषयीची गोष्ट आणि त्याबद्दलच्या सूचना त्यात समाविष्ट करतो. तो आपल्याला जे सांगतो ते की: वैवाहिक संबंध हे तुमच्याबद्दल नाहीत; तुमच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही करण्यासाठी नाहीत; तर ते ख्रिस्ताच्या रक्तरंजित मृत्यूने तारण प्राप्त झालेल्या, ज्यांच्यामध्ये त्याचा आत्मा वसती करतो आणि जे ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून एकत्र राहतात अशा एका पापी पुरुषाने आणि एका पापी स्त्रीने केलेल्या येशू ख्रिस्ताच्या गौरवाविषयी आहेत.
मग अशा प्रकारचे जीवन कसे असावे? ख्रिस्त-केंद्रित वैवाहिक जीवनातील नऊ घटकांचा आता आपण विचार करणार आहोत.
१. ख्रिस्त-केंद्रित वैवाहिक जीवनात पती-पत्नी दोघेही मिळून येशू ख्रिस्ताची भक्ती करतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, एक जोडपे विवाह करू शकतात, त्यांचे नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेऊ शकतात, एकमेकांची काळजी घेण्यास शिकू शकतात आणि एक चांगले नातेसंबंध ठेवू शकतात. पण ते ख्रिस्त-केंद्रित जीवन नाही. “केंद्रित” ह्या शब्दाची व्याख्या करण्यासाठी आणि त्याला सामर्थ्य देण्यासाठी “ख्रिस्त” ह्या हे नाव त्या शब्दाचे विशेषण म्हणून वापरा म्हणजे तो सूर्य आहे आणि पती-पत्नी त्याच्या भोवती भ्रमण करतात असा अर्थ होईल. त्यांचे संपूर्ण विश्व येशू ख्रिस्ताशी असलेल्या त्यांच्या नात्यात आपले अस्तित्व आणि उद्देश शोधते. प्रत्यक्षात ह्याचा अर्थ असा होतो की पती-पत्नी त्यांच्या ख्रिस्ती वाटचालीत एकत्र वाढण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा पालकत्व किंवा नोकरी किंवा शाळा किंवा विस्तारित कौटुंबिक समस्यांमुळे सातत्य कठीण होते तेव्हा ते कठीण काळात किंवा अशा प्रसंगी एकमेकांना मदत करतात. ते खऱ्या अर्थाने एका लोखंडाने दुसऱ्या लोखंडाला धार केल्याप्रमाणे जीवन जगतात.
२. ख्रिस्त-केंद्रित वैवाहिक जीवनात एकमेकांची काळजी घेणे हे वैशिष्ट्य असते. येशू ख्रिस्तला तो देह धारण केलेला देव आहे, आणि तो वधस्तंभ आणि कबरेद्वारे पुन्हा पित्याकडे परत जाणार आहे हे माहित असूनही त्याने शेवटच्या रात्रीच्या भोजनापूर्वी त्याच्या शिष्यांचे पाय धुण्याद्वारे स्वतःला लीन आणि नम्र केले (योहान १३) . पेत्राने त्याचे पाय धुण्याच्या बाबतीत आक्षेप घेतला ह्यात आश्चर्य नाही! येशूने त्याचे घाणेरडे पाय धुवावेत ह्यासाठी तो अयोग्य आहे असे त्याला वाटले, तरीही येशूने आग्रह धरला. विवाह ही ख्रिस्ताला-प्रतिबिंबित करण्याच्या सेवेची प्रयोगशाळा आहे. स्वार्थीपणा, आळशीपणा आणि सुस्ती ह्या गोष्टी वैवाहिक संबंधांमध्ये बाधा आणतात. नम्रपणे केलेली सेवा आपल्या जोडीदारावर खरे प्रेम असल्याचे दाखवून देते.
३. ख्रिस्त-केंद्रित वैवाहिक जीवनात नम्रतेचे पालन केले जाते. येशूने घोषित केले, “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे” (मत्तय ११:२९). वधस्तंभावर नजर ठेवल्याने नम्र जीवन जगता येते. स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यात गुंतून राहण्याऐवजी, वैवाहिक जीवनात नम्रता दुसर्‍याच्या अधीन होते, बोलण्यात व्यत्यय आणण्याऐवजी लक्षपूर्वक ऐकते, सेवा करण्याचे मार्ग शोधते आणि अपमान झाल्यास त्वरित क्षमा करण्यास तयार असते.
४. ख्रिस्त-केंद्रित वैवाहिक जीवनात क्षमाशीलपणा असतो. दोन पापी जरी ख्रिस्ताद्वारे तारण प्राप्त झालेले असले तरी विवाहाने जोडले गेलेले असताना, त्यांच्या जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा शब्द, दृष्टीकोन, कृती, मौन आणि वधस्तंभ अपमानीत झाल्यासारखे वाटतात. द्वेष वाढू दिला तर वैवाहिक जीवन पुढे सरकू शकत नाही. ते पुढे जाणारच नाही! आपल्याला ख्रिस्ती मंडळीमध्ये दयाळू, कोमल मनाचे आणि एकमेकांना क्षमा करण्यारे होण्यास सांगितले गेले असेल, तर वैवाहिक जीवनात आपण किती अधिक तसे असले पाहिजे (इफिस. ४:३२)!
५. ख्रिस्त-केंद्रित वैवाहिक जीवन त्यागमय प्रीतीत जगले जाते. येशूने जेव्हा मंडळीसाठी त्यागमय मरणात स्वतःला अर्पण केले तेव्हा त्याने हा नमुना स्थापित केला (इफिस. ५:२५). पण ह्याचा अर्थ पत्नीसाठी केवळ स्वतःचा प्राण अर्पण करणे असा होत नाही. काहीजण त्यांच्या पत्नींसाठी मरण्यास तयार असतात पण ते त्यांच्यासाठी निस्वार्थपणे जगत नाहीत. त्यागमय प्रेमाचा उद्देश आपल्या जोडीदारासाठी सर्वोत्तम काय आहे हे पाहण्याचा असतो. येशूची त्यागमय प्रीती मंडळीला “तिच्या सर्व वैभवात, डाग किंवा सुरकुत्या किंवा तसे काहीही नसलेली” अशी स्वतःला सादर करण्याच्या उद्देशाने होती (इफिस. ५:२७). तुम्हीही जाऊन तसेच करा.
६. ख्रिस्त-केंद्रित वैवाहिक जीवन संवाद साधते. प्रेषित योहानाने ख्रिस्ती लोकांना ख्रिस्तासोबतच एकमेकांशी देखील सहभागीता करण्यावर भर दिला (१ योहान १:३). सहभागीता करण्यासाठी किंवा एकमेकांसोबत जीवन जगण्यासाठी संवाद साधणे आवश्यक आहे. आणि संवादामध्ये एकमेकांशी जीवनात जोडले गेलेले दोन-श्रोते आणि दोन-वक्ते सतात. बहुसंख्य लोक संवाद साधण्यात अयशस्वी ठरतात, जणू काही त्यांच्या पत्नींशी प्रेमळपणे आणि हळुवारपणे बोलण्यात पुरुषार्थ नाही असे त्यांना वाटते. खरे पाहता, जो आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकायला आणि तिच्याशी बोलायला शिकतो आणि असा गोड सहवास आणि संवाद साधण्यासाठी वेळ देतो तो खरा पुरुष आहे. तर मित्रांनो, खऱ्या पुरुषांसारखे वागा!
७. ख्रिस्त-केंद्रित वैवाहिक जीवनामुळे आत्मीयता वाढते. आपण ख्रिस्तासोबत तसे करत नाही का? आपण येशू ख्रिस्ताच्या कृपेत आणि ज्ञानात वाढण्याचा प्रयत्न करतो. इफिस येथील मंडळीसाठी पौलाची हीच प्रार्थना आहे की त्यांची येशूशी आत्मीयता वाढावी. (इफिस. ५:१४-१९). देवाने केवळ विवाहासाठी पती-पत्नीच्या बाबतीत सलगीचे संबंध दिले आहेत. (उत्पत्ती २:२४; इब्री. १३:४). आपण एकमेकांची सेवा केल्याने येशूचे जितके गौरव होते तितकेच गौरव आपल्या वैवाहिक जीवनात आत्मीयतेच्या झालेल्या वाढीमुळे होते.
८. ख्रिस्त-केंद्रित वैवाहिक जीवन एकमेकांसोबत ख्रिस्ताच्या आशेत जगले जाते. मुले, घरे, कारस्, व्यवसाय, मोठी सुट्टी, बँक खाती ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, जेव्हा आपण ख्रिस्ताशी जोडलेले असतो तेव्हा आपली आशा त्याच्यावर आणि त्याच्या अभिवचनांवर स्थिर असते. आपण कदाचित आपली मुले ज्याप्रकारचे जीवन जगत आहेत त्याविषयी किंवा आपण नोकरी गमावली आहे त्याविषयी, किंवा आपल्या बँकेच्या खात्यात फारच थोडे पैसे उरले असल्यामुळे निराश झालेले असू. पण आपण ख्रिस्तामध्ये कधीही निराश होणार नाही (रोम. १०:११; १ योहान ३:३). अत्यंत कठीण काळातही त्याची आशा आपल्याला टिकवून ठेवते. देवाने त्याच्या रहस्यमय इच्छेची अशी रचना केली आहे आणि तिचा असा खुलासा केला आहे की, त्यावरून आपल्याला “ख्रिस्त तुमच्यामध्ये, गौरवाची आशा आहे” हे कळावे (कलस्सै. १:२४-२७). पती-पत्नी एकत्र मिळून, जीवनातील सर्व ऐहिक गोष्टींपेक्षा ख्रिस्तावरील त्यांची आशा अधिक जपण्यास शिकतात.
९. ख्रिस्त-केंद्रित वैवाहिक जीवनाचे लक्ष मंडळीकडे वेढलेले असते. ख्रिस्त मंडळीचे तारण करण्यासाठी मरण पावला (प्रे. कृ. २०:२८), तर ख्रिस्त-केंद्रित विवाह मंडळीला त्यांच्या जीवनातील एक किरकोळ भाग मानू शकत नाही. आपल्याला जबाबदार धरण्यासाठी, ख्रिस्तामध्ये आपली वाढ होण्यास मदत व्हवी ह्यासाठी, प्रीतीमय सेवेत आपल्याला एकमेकांशी जोडण्यासाठी, आपल्याला मिळालेली दाने आणि सेवाकार्य विकसित करण्यासाठी, एकत्रितपणे उपासना करण्यासाठी, त्यागपूर्वक एकत्र राहण्यास शिकण्यासाठी, जीवन आणि धार्मिकतेबद्दलची आपली समज वाढवण्यासाठी आणि ख्रिस्ताला भेटण्यासाठी आपल्याला तयार करण्यासाठी आपल्याला मंडळीची आवश्यकता आहे.. देवाच्या अर्थव्यवस्थेत मंडळी विवाहाला सर्वोच्च स्थान देत असल्याने (आम्हाला असे सांगितले जात नाही की येशू विवाहासाठी मरण पावला), तर आपण पती-पत्नी म्हणून आपण ख्रिस्ताच्या शरीरासोबत (मंडळीसोबत) एकत्र राहणे आवश्यक आहे.

ख्रिस्त-केंद्रित जीवनात तुम्ही आणखी काही घटकांची भर घालू शकता. आपण पाहिलेले हे नऊ घटक दिव्याचे बटन चालू करण्याइतके पटकन घडत नाहीत. त्यासाठी कठोर परिश्रम, शुभवर्तमानानुसार जीवन जगणे, आत्म्यावर विसंबून राहणे आणि सर्व गोष्टींमध्ये, विशेषतः वैवाहिक जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचे गौरव करण्याची उत्कट इच्छा बाळगणे ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. ख्रिस्ताला आपल्या वैवाहिक जीवनाचा केंद्रबिंदू बनवून जीवनात सखोल समाधान प्राप्त करून घेऊया.

जिवंत आशा चर्च
जिवंत आशा चर्च