पवित्र शास्त्राची सुरवात उत्पत्ति १:१ मधील एका उल्लेखनीय विधानाने होते – “प्रारंभी देवाने . . .”
हे साधे विधान फार अर्थभरीत आहे. ख्रिस्ती विश्वासातील काही सर्वात मूलभूत सत्ये ह्या छोट्या घोषणेमध्ये आढळतात आणि त्यांचा योग्य विचार करणे महत्त्वाचे आहे.हा शास्त्रभाग आपल्याला जी पहिली गोष्ट सांगतो ती म्हणजे कोणतीही गोष्ट निर्माण होण्यापूर्वी, देव आधीपासूनच होता. खरे पाहता, देव नेहमीच अस्तित्वात होता, त्याला सुरुवात किंवा अंत नाही. केवळ एकटा देव अनिर्मित असल्यामुळे आपण त्याला सार्वकालिक म्हणतो. देव काळाच्या आधी अस्तित्वात आहे, आणि तो आपल्याप्रमाणे क्षणांच्या (वेळेच्या) अनुक्रमाला बांधील नाही.
उत्पत्ती १ च्या पुढील वचनांमध्ये जसजसा निर्मितीचा वृतांत आपल्या पुढे येतो, तसेतसे आपल्याला शिकायला मिळते की सार्वकालिक देवाने सर्व काही निर्माण केले आहे. आता जे काही अस्तित्वात आहे, ते केवळ देवाने निर्माण केल्यामुळेच अस्तित्वात आहे. सार्वकालिक पदार्थ अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. प्लॅटोने आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारची मानसिक (किंवा कल्पनांची) कोणतीही सार्वकालिक क्षेत्रे अस्तित्वात नाहीत. बहुतेक समकालीन विज्ञानात शिकवल्याप्रमाणे पदार्थ कोणत्याही प्रकारे कायमस्वरूपी कंप पावत नाही – सतत आकुंचन किंवा सतत प्रसारण पावत राहत नाही – ज्याने सर्वकाही निर्माण केले आणि जो प्रारंभ झाला त्याच्या अगोदरपासून अस्तित्वात होता तो केवळ देवच सार्वकालिक आहे. ही गोष्ट असे सूचित करते की देवाच्या इच्छेशिवाय काहीही अस्तित्त्वात आले नाही आणि सर्व निर्मित वस्तू (आकाश, पृथ्वी, मानव आणि देवदूत) अनिवार्यपणे आकस्मिक आहेत आणि त्यांच्या अस्तित्वासाठी देवावर अवलंबून आहेत.
काळ आणि स्थान ह्या दोन्हींच्या बंधनात असलेल्या त्याने निर्माण केलेल्या प्राणीमात्रांप्रमाणे, देवाला मर्यादा नाहीत. कारण देव ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीत मूलतः आपल्यापेक्षा वेगळा आहे, तो त्याने निर्माण केलेल्या गोष्टींपेक्षा वेगळा असला पाहिजे आणि तो कोणत्याही अर्थाने निर्माण केलेल्या गोष्टींवर अवलंबून असू शकत नाही. आपल्याला जशा गरजा आहेत तशा देवाला नाहीत. आपल्याप्रमाणे देवाला कोणतीही अंगे नाहीत. निर्मिती ह्या नात्याने आपल्याला ज्या प्रकारच्या आवडी किंवा भावना आहेत तशा त्याला नाहीत. हा असा देव आहे जो सूर्य आणि ताऱ्यांना आदेश देतो, जो निर्जीव पदार्थांना जीवन देतो (जसे त्याने आदामाला जमिनीवरील मातीपासून बनवले – उत्पत्ति २:७), आणि ज्याचे मृत्यूवर प्रभुत्व आहे. हा देव त्याने निर्माण केलेल्या प्राणीमात्रांपेक्षा फार श्रेष्ठ आहे.
देवाचे हे “अन्यत्व” – देव आणि त्याच्या प्राणीमात्रांमधील अंतर – निर्माता-प्राणीमात्र ह्यांच्यातील भेद म्हणून ओळखले जाते. हा फरक ख्रिस्ती ईश्वरविज्ञानशास्त्रातील सर्वात मूलभूत मुद्द्यांपैकी एक आहे आणि ख्रिस्ती विश्वासाच्या इतर कोणत्याही पैलूंबद्दल अर्थपूर्णपणे बोलण्यापूर्वी तो आपल्याला स्पष्टपणे समजणे आवश्यक आहे.
काळ आणि स्थळ ह्या दोन्हींच्या बंधनात असलेले आणि पापाने प्रतिकूल रुपाने प्रभावित झालेले मर्यादित प्राणी, जो देव दिसत नाही किंवा त्याचे निरीक्षण करता येत नाही, त्याला खऱ्या अर्थाने कसे ओळखू शकतील किंवा त्याच्याबद्दल कोणतीही गोष्टी योग्यरीतीने कशी समजू शकतील? ह्या दुविधेचे उत्तर असे आहे की जोपर्यंत देव त्याच्या प्राणीमात्रांनी ओळखावे आणि जाणून घ्यावे अशा पद्धतीने स्वत:ला प्रकट करण्याचे ठरवत नाही तोपर्यंत अशा अमर्याद देवाला त्याचे मर्यादित प्राणी ओळखू किंवा जाणू शकत नाहीत. देव जेव्हा स्वतःला प्रकट करण्यासाठी आपल्या जवळ येतो (दृढता) तेव्हा देव निसर्ग (सर्वसामान्य प्रकटीकरण) आणि पवित्र शास्त्र (विशेष प्रकटीकरण) ह्या दोन मध्यमांद्वारे नेमके हेच करतो.
प्राणीमात्र ह्या नात्याने, आपण आपल्या जीवनासाठी आणि श्वासासाठी नेहमीच देवावर अवलंबून असणार आहोत. परंतु जर आपल्याला त्याच्याबद्दल काही अर्थपूर्ण ज्ञान हवे असेल तर आपण त्याच्या आत्म-साक्षात्कारावर देखील अवलंबून आहोत. ह्या वस्तुस्थितीची जाणीव होणे ही आध्यात्मिक गोष्टींच्या योग्य आकलनाची सुरुवात आहे. आणि म्हणूनच ज्याद्वारे देव स्वतःला प्रकट करतो त्या दोन गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करून म्हणजेच जे निर्माण केले गेले आहे (नैसर्गिक गोष्टी) आणि त्याच्या वचनात (पवित्र शास्त्रात) स्वतःच्या सर्वोच्च प्रकटीकरणाद्वारे त्याने जे प्रकट केले आहे त्यावरून आपण देव कोण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Used with permission from www.monergism.com