पालकांची कर्तव्ये

मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे,
म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.
नीति २२:६

मला असे वाटते की बहुतेक विश्वासणारे ख्रिस्ती लोक ह्या वचनाशी परिचित असतील. त्याची वाणी कदाचित तुमच्या कानाला एखाद्या जुन्या गाण्यासारखी परिचित असेल. बहुधा तुम्ही ते ऐकले असेल, किंवा त्याबद्दल वाचले असेल, त्याबद्दल कदाचित तुम्ही बोलला असाल किंवा त्याचा संदर्भ दिला असेल. बरोबर ना?
पण, शेवटी, या वचनाच्या तात्पर्याला किती कमी महत्व दिले जाते! त्यात असलेली शिकवण क्वचितच परिचित असते, त्यातून जी कर्तव्ये आपल्यासमोर ठेवली जातात ती क्वचितच आचरणात आणली जातात.
वाचकहो, मी खरे बोलत आहे ना?
हा विषय नवीन आहे असे म्हणता येणार नाही. जग जुने आहे, आणि आपल्याला मदत करण्यासाठी आपल्याकडे जवळजवळ सहा हजार वर्षांचा अनुभव आहे. आपण अशा काळात जगत आहोत जिथे प्रत्येक ठिकाणी शिक्षणाचा प्रचंड उत्साह आहे. सर्व ठिकाणी नवीन शाळा विकसित होत असल्याबद्दल आपण ऐकतो. आम्हाला नवीन प्रणालींबद्दल आणि तरुणांसाठी प्रत्येक प्रकारच्या आणि वर्णनाच्या नवीन पुस्तकांबद्दल सांगितले जाते. आणि तरीही या सर्व गोष्टींसाठी, बहुसंख्य मुलांना त्यांनी ज्या मार्गाने जायला हवे ते त्यांना स्पष्टपणे शिकवले जात नाही, कारण जेव्हा ते विशिष्ठ राजकीय शक्ती असलेल्या सामाजिक गटात लहानाचे मोठे होतात तेव्हा ते देवाबरोबर चालत नाहीत.
आता या स्थितीचा हिशोब कसा घ्यायचा? अगदी साधे सत्य हे आहे की, वरील वचनातील प्रभूची आज्ञा पाळली जात नाही; आणि म्हणून त्यात दिलेले प्रभूचे अभिवचन पूर्ण होत नाही.
वाचकांनो, या गोष्टींवरून अंतःकरणाचा खोलवर शोध घेण्याची गरज आपल्या लक्षात येऊ शकते. तेव्हा मुलांच्या योग्य शिक्षणाबद्दलचा पाळकांचा संदेश ऐका. माझ्यावर विश्वास ठेवा, हा विषय असा आहे की जो प्रत्येक सद्सद्विवेकबुद्धीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, “या बाबतीत मी जे करू शकतो ते मी करत आहे का?”
हा एक असा विषय आहे ज्याबद्दल जवळजवळ सर्वजण चिंतीत आहेत. क्वचितच एखादे असे कुटुंब असेल ज्याला या गोष्टीची चिंता नसेल. पालक, परिचारिका, शिक्षक, गॉडफादर, गॉडमदर, काका, काकू, भाऊ, बहिणी, – सर्वांना त्यात रस आहे. माझ्या मते, काही पालकांना त्यांच्या कुटुंबाच्या व्यवस्थापनात प्रभावित करणार नाहीत किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत त्यांना सूचना किंवा सल्ला देणार नाहीत असे फार कमी लोक सापडतील. मला अशी शंका आहे की आपण सर्वजण या बाबतीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काहीतरी करू शकतो आणि हे लक्षात ठेवण्यासाठी मी सर्वांना प्रेरित करू इच्छितो.
हा एक असा विषय देखील आहे, ज्याबाबतीत सर्व संबंधित लोक आपले कर्तव्य पार पाडण्यात कमी पडण्याचा मोठा धोका आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यामध्ये लोक त्यांच्या शेजाऱ्यांचे दोष त्यांच्या स्वतःच्या दोषांपेक्षा अधिक स्पष्टपणे पाहू शकतात. ते अनेकदा त्यांच्या मुलांची वाढ त्याच पद्धतीने करतात जिच्याविषयी त्यांनी त्यांच्या मित्रांना ती पद्धत असुरक्षित असल्याचा सल्ला दिला होता. त्यांना इतर लोकांच्या कुटुंबातील कुसळे दिसतात पण ते स्वतःच्या कुटुंबातील मुसळांकडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यांच्या दाराबाहेर झालेल्या चुका शोधण्यात ते गरुडासारखे चटकन सावज टिपणारे असतात, पण स्वतःच्या घरात रोजच्या रोज होणाऱ्या जीवघेण्या चुकांबद्दल वटवाघुळासारखे आंधळे असतात. आपल्या भावाच्या घरात काय चालले आहे हे त्यांना माहित असते, पण स्वतःच्या घरातले लोक काय करत आहेत हे त्यांना माहित नसते. आपण यापैकी कोणत्याही एखाद्या श्रेणीत बसत असलो, तर आपल्याला आपली विचारसरणी तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. हे देखील, आपण लक्षात ठेवणे चांगले होईल. [टीप: एक पाळक या नात्याने, मला अशी टिप्पणी केल्याशिवाय राहवत नाही की असा कोणताही विषय नाही ज्याबद्दल लोक त्यांच्या मुलांबद्दल इतके निग्रही असल्याचे दिसून येते. समजूतदार ख्रिस्ती पालक स्वतःची मुले चूक आहेत किंवा दोषास पात्र आहेत हे लवकर कबूल करत नाहीत याचे मला कधीकधी फार आश्चर्य वाटते. असे पुष्कळ लोक आहेत ज्यांच्याशी मी त्यांच्या मुलांच्या चुकांपेक्षा त्यांच्या स्वतःच्या चुकांबद्दल बोलणे अधिक पसंत करेन.]
चला आता मला योग्य प्रशिक्षणाबद्दल काही सूचना तुमच्यासमोर ठेऊ द्या. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा तुमच्या मुलांना आशीर्वाद देवो आणि तुम्हा सर्वांशी योग्य शब्द बोलण्याची क्षमता त्यांना देवो. ते बेधडक बोलणारे आणि सालस मनाचे आहेत म्हणून त्यांना नाकारू नका; त्यांच्यामध्ये काही नाविण्य नाही म्हणून त्यांचा तिरस्कार करू नका. या गोष्टीची खात्री बाळगा की, जर तुम्हाला तुमच्या मुलांना स्वर्गासाठी प्रशिक्षित करायचे असेल, तर ह्या इशाऱ्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
. पहिला, तुम्हाला तुमच्या मुलांना योग्य रीतीने प्रशिक्षित करायचे असेल, तर त्यांना ज्या मार्गाने जाण्याची इच्छा आहे त्या मार्गाने नव्हे, तर त्यांनी ज्या मार्गाने गेले पाहिजे त्या मार्गाने जण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करा.
हे लक्षात ठेवा की मुलांचा जन्मतःच दुष्टतेकडे कल असतो आणि म्हणून जर तुम्ही त्यांना स्वतःसाठी निवड करू दिली तर ते चुकीची निवड करतील हे निश्चित आहे.
एक आई हे सांगू शकत नाही की तिचे कोमल अर्भक मोठे झाल्यावर कसे होईल, – उंच होईल कि बुटके होईल, अशक्त कि सशक्त, शहाणे कि मूर्ख होईल: ते यापैकी काहीही होऊ शकते किंवा होऊ शकत नाही – हे सर्व अनिश्चित आहे. पण एक गोष्ट आई खात्रीने सांगू शकते: त्याचे हृदय भ्रष्ट आणि पापी असेल. आपल्याकडून चूक होणे स्वाभाविक आहे. “मूर्खता,” शलमोन म्हणतो, “बालकाच्या हृदयात जखडलेली असते” (नीति. २२:१५). “मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते” (नीति. २९:१५). आपली अंतःकरणे आपण ज्या जमिनीवर चालतो त्याप्रमाणे असतात; तिची मशागत करू नका, आणि ती खात्रीने तण उगवेल.
मग, जर तुम्हाला तुमच्या मुलाशी हुशारीने वागायचे असेल, तर तुम्ही त्याला त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार वागू देऊ नका. त्याच्यासाठी विचार करा, त्याच्यासाठी परीक्षक व्हा, त्याच्यासाठी कृती करा, जसे तुम्ही एखाद्या दुर्बल आणि आंधळ्यासाठी कराल; पण काहीही करून, त्याला त्याच्या स्वतःच्या चुकीच्या आवडीनिवडीच्या आणि प्रवृत्तीच्या स्वाधीन करू नका. त्याच्या आवडीनिवडी आणि इच्छांचा सल्ला घेतला जाऊ नये. जसे त्याच्या शरीरासाठी काय चांगले आहे हे त्याला अद्याप कळत नाही तसेच त्याच्या मनासाठी आणि आत्म्यासाठी काय चांगले आहे हे देखील त्याला कळत नाही. त्याने काय खावे, काय प्यावे आणि कोणते कपडे घालावेत हे तुम्ही त्याला ठरवू देऊ नका. सुसंगत रहा, आणि त्याच्या मनाशी त्याच पद्धतीने व्यवहार करा. त्याला वाटेल त्या मार्गाने नव्हे, तर पवित्र शास्त्रानुसार आणि योग्य मार्गाने प्रशिक्षित करा.
तुम्ही ख्रिस्ती प्रशिक्षणाच्या या पहिल्या तत्त्वाशी सहमत होऊ शकत नसाल, तर तुमचे पुढे वाचणे व्यर्थ आहे. स्वेच्छा ही जवळजवळ पहिली अशी गोष्ट आहे जी मुलाच्या मनात येते; आणि त्याचा प्रतिकार करणे हे तुमचे पहिले पाऊल असले पाहिजे.
२. तुमच्या मुलाला अगदी हळुवारपणे, आपुलकीने आणि संयमाने प्रशिक्षित करा.
तुम्ही त्याला बिधडवावे असे मला म्हणायचे नाही, तर तुमचे त्याच्यावर प्रेम आहे हे त्याला समजू द्या, असे माझे म्हणणे आहे.
प्रेम हा एक चांदीचा असा धागा असला पाहिजे जो तुमच्या सर्व आचरणातून ओवलेला दिसून आला पाहिजे. दयाळूपणा, नम्रता, सहनशीलता, धीर, संयम, सहानुभूती, बालिशपणामध्ये आणि आनंदामध्ये सहभागी होण्यास तयार असा, – हे असे धागे आहेत ज्याद्वारे लहान मुलाला सर्वात सहजपणे मार्गदर्शन केले जाऊ शकते, – तुम्हाला त्याचे मन जिंकायचे असेल तर तुम्ही ह्या सूचनांचे पालन केले पाहिजे.
असे फार कमी लोक सापडतील, अगदी प्रौढांमध्ये देखील, ज्यांना दूर लोटण्यापेक्षा जवळ करणे जास्त अवघड असते. बळजबरीला विरोध करण्याची वृत्ती आपल्या सर्वांमध्ये आहे; सक्तीच्या आज्ञाधारकपणाच्या कल्पनेकडे आपण पाठ फिरवतो आणि आपली मान ताठ करतो. आम्ही घोड्याला प्रशिक्षित करणाऱ्याच्या हातातल्या तरुण घोड्यांसारखे आहोत: त्यांना दयाळूपणे हाताळले तरच त्यांना चांगल्याप्रकारे प्रशिक्षित केले जाऊ शकते, आणि हळूहळू तुम्ही त्यांना सहज मार्गदर्शन करू शकाल; त्यांच्यावर जबरदस्ती करा किंवा त्यांना हिंसकपणे वागवा, आणि तुम्हाला त्यांच्यावर ताबा मिळवण्यासाठी बरेच महिने लागतील.
आपल्या मुलांची मने आपल्याच साच्यात ओतली जातात. कडकपणा आणि कठोरपणाची वागणूक मिळाल्यास ते नाउमेद होतात आणि त्यांच्या पूर्वीच्या सवयींकडे परत जातात. ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत राहत नाहीत आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा मार्ग शोधता शोधता तुम्ही थकून जाता. परंतु तुम्हाला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे हे त्यांना समजू द्या, – त्यांनी सुखी व्हावे आणि त्यांचे भले व्हावे अशी तुमची इच्छा असते – तुम्ही जर त्यांना शिक्षा करता तर ती त्यांच्या भल्यासाठीच करता आणि पेलिकन पक्षासारखे तुम्ही त्यांच्या आत्म्याचे पोषण करण्यासाठी तुमच्या हृदयातील रक्त देखील द्यायला तयार व्हाल; मी म्हणेन की, त्यांना या गोष्टी समजू द्या आणि ते लवकरच तुमचे होतील. परंतु त्यांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर त्यांना प्रेमळपणे आकर्षित केले पाहिजे.
आणि नक्कीच प्रयोजन स्वतःच आपल्याला हा धडा शिकवेल. मुले कमकुवत आणि कोमल असतात, आणि म्हणून, त्यांना धीराने आणि कनवाळूपणे वागवले पाहिजे. आपण त्यांना नाजूकपणे हाताळले पाहिजे, एका नाजूक यंत्रांप्रमाणे, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही चांगले करण्याऐवजी आमच्या हातून अधिक नुकसानच होईल. ते नुकत्याच उगवलेल्या रोपट्यासारखे असतात, आणि त्यांना हळुवारपणे पाणी घालण्याची गरज असते – नियमितपणे, पण एका वेळी थोडे थोडे.
आपण एकाच वेळी सर्व गोष्टींची अपेक्षा करू नये. मुले कशी आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि ती सहन करू शकतील अशा पद्धतीने त्यांना शिकवले पाहिजे. त्यांची मने धातूच्या गोळ्यासारखी असतात – ती एकाच वेळी घडवली आणि उपयोगी बनवाली जाऊ शकणार नाहीत, तर एकापाठोपाठ एक असे हलके वार करून आपल्याला त्यांना घडवावे लागेल. त्यांची समजशक्ती अरुंद तोंडाच्या भांड्यांसारखी असते: आपण ज्ञानाचा द्राक्षरस हळूहळू ओतला पाहिजे, नाहीतर त्यातील बराचसा द्राक्षरस सांडून जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. “एक एक ओळ, आणि एका नीतिनियमानंतर दुसरा, असे थोडे थोडे शिकवणे” हा आपला नियम असला पाहिजे. धार देण्याचा दगड हळूहळू आपले काम करतो, परंतु वारंवार घासल्यामुळे सुरीला चांगली धार येते. मुलाला प्रशिक्षण देण्यासाठी संयमाची अतिशय आवश्यकता आहे, आणि संयमाने वागल्याशिवाय आपण काहीही साध्य करू शकणार नाही.
संयमाला आणि प्रेमाला दुसरा काहीही पर्याय नाही. एखादे पाळक येशूमध्ये आहे तसे सत्य बोलू शकतील, स्पष्टपणे, ठासून, बिनतोडपणे; पण त्यांच्या बोलण्यात प्रेम नसेल, तर फारज थोडे आत्मे जिंकले जातील. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना आज्ञा करून, धमकावून, शिक्षा करून, वादविवाद करून त्यांचे कर्तव्य काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला – पण तुमच्या या उपायांमध्ये आपुलकी नसेल तर तुमचे सर्व श्रम व्यर्थ ठरतील.
प्रेम हे यशस्वी प्रशिक्षणाचे एक मोठे रहस्य आहे. राग आणि कठोरपणा भीती निर्माण करू शकतो, परंतु त्यामुळे आपण जे सांगत आहोत ते बरोबर आहे हे मुलाला पटणार नाही; आणि जर तो तुमच्याकडे सारखा रागाने पाहत असेल तर लवकरच तुमचा आदर करणे देखील थांबवू शकतो. शौल योनाथानाशी (१ शमुवेल २०:३०) ज्या प्रकारे बोलला तसे आपल्या मुलाशी बोलणाऱ्या बापाने, मुलाच्या मनावरील आपला प्रभाव जास्तवेळ टिकून राहील अशी अपेक्षा करू नये.
आपल्या मुलाच्या ममतेवर पकड ठेवण्याचा झटून प्रयत्न करा. तुमच्या मुलांना तुमची भीती वाटणे ही धोकादायक गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या मुलाशी मोकळेपणाने बोलू शकत नसाल किंवा तुम्हा दोघांमध्ये दडपण असेल तर यापेक्षा कोणतीही गोष्ट अधिक वाईट नाही; आणि भीतीमुळे अशी परिस्थिती निर्माण होते. भीतीमुळे मोकळेपणा राहत नाही; – भीतीमुळे गोष्टी लपवून ठेवल्या जातात; – भीती दांभिकपणाचे बीज पेरते आणि अनेक खोट्या गोष्टींना कारणीभूत ठरते. कलस्सैकर लोकांना प्रेषित पौलाने जे सांगितले ती सत्याची खाण आहे: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.” (कलस्सै. ३:२१). या वचनात दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.
३. मुलांची मने कायम तुमच्याकडे वळवून त्यांना प्रशिक्षित करा आणि हे करण्यासाठी, बरेच काही तुमच्यावर अवलंबून आहे.
कृपा हे सर्व तत्त्वांपैकी सर्वात शक्तिशाली तत्व आहे. फार वर्षांपासून पाप करीत असलेल्या माणसाच्या अंतःकरणात जेव्हा कृपा प्रवेश करते, तेव्हा ती किती मोठी क्रांती घडवून आणते ते पाहा, — ती सैतानाचे किल्ले कशी उध्वस्त करते, — डोंगर कसे भुईसपाट करते, दऱ्या कशा भरून काढते, — वाकड्या गोष्टी कशा सरळ करते — आणि एक संपूर्ण नवा मनुष्य कसा निर्माण करते ते पाहा….खरोखर कृपेला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
निसर्ग देखील खूप शक्तिशाली आहे. देवाच्या राज्याच्या गोष्टींशी तो कसा संघर्ष करतो ते पाहा — अधिक पवित्र होण्याच्या प्रत्येक प्रयत्नाविरुद्ध तो कसा लढा देतो, — आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत तो आपल्यामध्ये अखंड युद्ध कसे चालू ठेवतो ते पाहा. निसर्ग खरोखर खूप शक्तिशाली आहे.
परंतु निसर्ग आणि कृपेनंतर, निःसंशयपणे, शिक्षणापेक्षा अधिक शक्तिशाली काहीही नाही. देवाच्या अधिपत्याखाली, आमच्याकडे आमच्या सुरुवातीच्या सवयींशिवाय (मी त्यांना तसे म्हटले तर) दुसरे काहीही नाही. प्रशिक्षणाने आपण जे आहोत तसे बनतो. आपले पात्र त्या साच्याचे रूप घेते ज्यामध्ये आपली सुरवातीची वर्षे ओतली जातात. [टीप: “ज्याला प्रत्येक ठिकाणी शिक्षणाचा लोकांच्या मतांवर आणि विचार करण्याच्या सवयींवर होणारा परिणाम स्पष्टपणे लक्षात येत नाही त्याने फार कमी जीवन पाहिले आहे, मुले पाळणाघरात जे शिकतात तेच पुढे जाऊन स्वतःच्या जीवनातून प्रदर्शित करतात.” – सीसिल.]
ज्या व्यक्ती आमचे पालनपोषण करतात त्यांच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. त्यांच्याकडून आपल्याला एक रंग, एक चव, एक पूर्वग्रह मिळतो जो आयुष्यभर कमी-अधिक प्रमाणात आपल्याला चिकटून राहतो. आम्ही आमचा सांभाळ करणाऱ्या बाईची आणि आपल्या आईची भाषा शिकतो, आणि अजाणतेपणे ती बोलायला शिकतो, आणि त्याच वेळी निर्विवादपणे आम्ही त्यांचे शिष्टाचार, पद्धती आणि मानसिकता देखील आत्मसात करतो. आपल्या लहानपणी आपल्यावर झालेल्या संस्कारांचे आपण किती ऋणी आहोत, तसेच आपल्यातील किती गोष्टीं आपल्या लहानपणी आपल्या सभोवती असलेल्या लोकांकडून आपण आत्मसात केल्या आहेत हे केवळ काळच आपल्याला दाखवून देऊ शकतो असे मला वाटते.
एक अतिशय विद्वान इंग्रज, मिस्टर लॉक, असे म्हणतात: “आम्ही ज्या लोकांना भेटतो, ते हे चांगले आहेत कि वाईट आहेत, उपयोगी आहेत कि निरुपयोगी आहेत हे नव्वद टक्के त्यांच्या शिक्षणावर अवलंबून असते.”
आणि ही सर्व देवाच्या दयेने केलेली व्यवस्था आहे. ओलसर चिकणमातीला जसा आकार देता येतो तसे मन तो तुमच्या मुलांना देतो. तो त्यांना जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर तुम्ही जे सांगता त्यावर विश्वास ठेवण्याची आणि तुम्ही त्यांना जे सल्ले देता ते गृहीत धरण्याची आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दापेक्षा तुमच्या शब्दावर अधिक विश्वास ठेवण्याची वृत्ती देतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, त्यांचे कल्याण करण्याची सुवर्णसंधी तो तुम्हाला देतो. त्या संधीकडे दुर्लक्ष करून ती वाया जाणार नाही याकडे लक्ष द्या. त्यांना तुम्ही एकदा घसरू दिले तर ते कायमचे तुमच्या हाताबाहेर जातील.
पालक आपल्या मुलांसाठी काहीही करू शकत नाहीत, आपण त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, त्यांच्यावर कृपा होईल अशी अपेक्षा करून आपण शांत रहावे अशा दयनीय भ्रमात काहीजण पडले आहेत, पण तुम्ही मात्र त्यापासून सावध रहा. ह्या व्यक्ती बलामासारखे त्यांच्या मुलांना शुभेच्छा देतात, – त्यांना नीतिमान मनुष्यासारखा मृत्यू यावा अशी ते इच्छा करतात, पण त्यांनी नीतिमान जीवन जगावे यासाठी ते काहीही करत नाहीत. त्यांच्याकडे काहीही नसते पण ते पुष्कळ इच्छा करतात. आणि अशी विचारसरणी पाहून सैतान आनंदित होतो, ज्याप्रमाणे तो नेहमीच अशा कोणत्याही गोष्टीमुळे आनंदित होतो, ज्यामध्ये आळशीपणा माफ केला जातो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास प्रोत्साहित केले जाते.
मला हे माहित आहे की तुम्ही तुमच्या मुलाचे परिवर्तन करू शकत नाही. मला हे चांगले माहित आहे की ज्यांचा नवा जन्म झाला आहे ते मनुष्याच्या इच्छेने नव्हे तर देवाच्या इच्छेने जन्मले आहेत. पण मला हे देखील माहित आहे की, देव स्पष्टपणे म्हणतो, “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे,” आणि त्याने मनुष्याला अशी कोणतीही आज्ञा दिलेली नाही, जी पाळण्यासाठी त्याला तो कृपा पुरवणार नाही. आणि मला हे देखील माहित आहे की, शांत उभे राहून वाद घालणे हे आपले कर्तव्य नसून, तत्परतेने आज्ञापालन करणे हे आहे. आपण तत्परता दाखवल्यास आपल्याला देव भेटेल. आज्ञापालनाच्या मार्गाने गेल्याने देव आशीर्वाद देतो. जसे काना गावातील लग्नाच्या मेजवानीत नोकरांनी त्यांना जसे सांगण्यात आले तसे केले, तसेच आपणही केले पाहिजे, पाण्याचे रांजण पाण्याने भरले पाहिजेत आणि त्या पाण्याचा द्राक्षरस करण्यासाठी देवावर अवलंबून राहिले पाहिजे.
४. तुमच्या मुलाच्या आत्म्याबद्दल अगोदर विचार केला पाहिजे – हा विचार सतत डोळ्यासमोर ठेवून त्यांना प्रशिक्षण द्या.
ही छोटी मुले तुमच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान आहेत यात शंका नाही; पण तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत असाल, तर नेहमी त्यांच्या आत्म्याबद्दल विचार करा. त्यांच्या सार्वकालिक उत्कर्षाशिवाय तुम्हाला इतर कोणतीही गोष्ट अधिक महत्वाची वाटू नये. त्यांच्यातील जो भाग कधीही मरणार नाही त्याच्याशिवाय इतर कोणताही भाग तुम्हाला अधिक प्रिय वाटू नये. जग त्याच्या सर्व वैभवासह एक दिवस लयास जाणार आहे; एका चर्मपत्राच्या गुंडाळीसारखा स्वर्ग गुंडाळला जाणार आहे; सूर्य आपला प्रकाश देणे बंद करणार आहे. पण त्या लहानग्यांमध्ये जो आत्मा वास करतो, ज्यांच्यावर तुमचे खूप प्रेम आहे, ते या सर्व गोष्टींपेक्षा अधिक काळ जगणार आहेत, पण ते आनंदात जगतील की दुःखात जगतील हे तुमच्यावर अवलंबून आहे.
तुम्ही तुमच्या मुलांसाठी जे काही करता त्यामध्ये हा विचार तुमच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा असला पाहिजे. त्यांच्या बाबतीत तुम्ही जी पावले उचलता, तुमची त्यांच्याबाबतीतील प्रत्येक योजना, आणि एखादी विशिष्ठ कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही केलेली व्यवस्था, “या गोष्टींचा त्यांच्या आत्म्यांवर काय परिणाम होईल” ह्या महत्वाच्या प्रश्नाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.
आत्म्यावर प्रीती करणे हा सर्व प्रीतीचा आत्मा आहे. तुमच्या मुलांना सर्वकाही पुरवण्यासाठी त्यांना केवळ या जगावर अवलंबून रहायचे आहे, आणि या जीवनातच त्यांना सर्व आनंद मिळणार आहे असे समजून त्यांचे फाजील लाड करू नका – असे करणे म्हणजे खरे प्रेम नव्हे, तर तो निर्दयपणा आहे. त्याला पृथ्वीवरील एखाद्या प्राण्यासारखे वागवण्यासारखे हे कृत्य आहे, एक कुत्रा मदतीसाठी केवळ एकाच जगाकडे पाहू शकतो, आणि मेल्यानंतर त्याला कोणतेही भवितव्य नसते. तुमच्या मुलाच्या जीवनाचा प्रमुख शेवट त्याच्या आत्म्याचे तारण हा आहे हे जे सत्य त्याने लहानपणापासून शिकले पाहिजे ते त्याच्यापासून लपवून ठेवण्यासारखे हे कृत्य आहे.
एका खऱ्या ख्रिस्ती मनुष्याला त्याच्या मुलांना स्वर्गासाठी प्रशिक्षित करायचे असेल तर तो रितीभातींचा गुलाम नसावा. या जगाच्या प्रथा आहेत म्हणून केवळ त्याप्रमाणेच करण्यात; केवळ प्रचलित आहे म्हणून त्यांना एका विशिष्ठ पद्धतीने शिकवण्यात किंवा प्रशिक्षित करण्यात; केवळ इतर सर्वजण वाचतात म्हणून त्यांना शंकास्पद प्रकारची पुस्तके वाचू देण्यात; केवळ आजकाल बहुतेकांना अशा सवई असतात म्हणून त्यांना संशयास्पद प्रवृत्तीच्या सवई लागू देण्यात त्याने समाधान मानू नये. मुलांना प्रशिक्षित करताना त्यांच्या आत्म्यांचा विचार नेहमी त्याच्या डोळ्यासमोर असायला हवा. त्याच्या शिक्षणाला अचाट आणि विचित्र म्हटले गेले तरी त्याची त्याला लाज वाटू नये. त्याचे शिक्षण तसे असले तर काय झाले? वेळ थोडा आहे – या जगाची प्रथा लयास जात आहे. ज्याने आपल्या मुलांना जगासाठी तयार न करता स्वर्गासाठी तयार केले आहे, – मनुष्यासाठी नव्हे तर देवासाठी – तर अशा पालाकालाच शेवटी शहाणे म्हटले जाईल.
५. तुमच्या मुलाला पवित्र शास्त्रातील ज्ञान शिकवा.
मी हे मान्य करतो की तुम्ही तुमच्या मुलांमध्ये पवित्र शास्त्राची आवड निर्माण करू शकत नाही. वचनामध्ये आनंद घेणारे हृदय केवळ पवित्र आत्माच आपल्याला देऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या मुलांना पवित्र शास्त्राची ओळख करून देऊ शकता; आणि त्यांना त्या आशीर्वादित पुस्तकाची ओळख फार लवकर किंवा फार चांगली होणार नाही याबद्दल खात्री बाळगा.
पवित्र शास्त्राचे विस्तृत ज्ञान हे धर्माबद्दलच्या सर्व स्पष्ट मतांचा पाया आहे. जो त्यामध्ये चांगल्याप्रकारे
मुळावलेला आहे, तो नवीन शिकवणीच्या वाऱ्याच्या झोताने इतके तिकडे वाहवत जाणार नाही. शिक्षणाची कोणतीही पद्धत जी पवित्र शास्त्राच्या ज्ञानाला प्रथम स्थान देत नाही, ती असुरक्षित आणि चुकीची आहे.
तुम्ही ह्याविषयी आत्ताच काळजी घेणे गरजेचे आहे, कारण सैतान सगळीकडे फिरत आहे, आणि जगात चुकीच्या गोष्टी भरपूर आहेत. काही चूका आपल्यापैकी काही जणांमध्ये देखील दिसून येतात जे येशू ख्रिस्ताऐवजी चर्चला अधिक सन्मान देतात. असे काहीजण आहेत जे धर्मसंस्कारांद्वारे तारण होते किंवा धर्मसंस्कार हे सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्याचा पासपोर्ट आहेत असे मानतात. तसेच असेही काही लोक आहेत जे पवित्र शास्त्रापेक्षा कॅटेकिझमला (प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांचा सारांश) अधिक महत्व देतात, किंवा पवित्र शास्त्रातील सत्यांऐवजी निंदनीय गोष्टींच्या पुस्तकांनी त्यांची मने भरतात. पण तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करत असाल, तर त्यांच्या आत्म्यांना प्रशिक्षित करण्यासाठी साधे पवित्र शास्त्रच सर्वकाही असू द्या; आणि बाकी सर्व पुस्तकांना दुय्यम स्थान द्या. त्यांना कॅटेकिझमविषयी चांगले ज्ञान आहे यात फारसे स्वारस्य दाखवू नका, तर पवित्र शास्त्राचे त्यांचे ज्ञान चांगले आहे यात स्वारस्य दाखवा. माझ्यावर विश्वास ठेवा की, अशा प्रकारच्या शिक्षणाचा देव सन्मान करेल. देवाविषयी स्तोत्रकर्ता म्हणतो, “तू आपल्या संपूर्ण नावांहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस.” आणि मला असे वाटते की, लोकांमध्ये त्याचे वचन सन्मानीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तो विशेष आशीर्वाद देतो.
तुमची मुले पवित्र शास्त्र आदरपूर्वक वाचतात कि नाही याकडे लक्ष द्या. त्यांना त्याकडे मनुष्याचे वचन म्हणून नव्हे, तर ते जे खऱ्या अर्थाने स्वतः पवित्र आत्म्याने लिहिलेले, पूर्णपणे सत्य, पूर्णपणे उपयुक्त, आपल्याला तारणाबद्दल जागरूक करण्यास सक्षम आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिलेले देवाचे वचन आहे ह्या दृष्टीने पहायला शिकवा.

ते नियमितपणे वाचतात कि नाही याकडे लक्ष द्या. ते त्यांच्या आत्म्याचे दैनंदिन अन्न आहे असे समजण्यास त्यांना शिकवा – त्यांच्या आत्म्याच्या दैनंदिन आरोग्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट. मला माहीत आहे की तुम्ही हे एका रूपरेषेत राहून करण्यापेक्षा अधिक काही करू शकत नाही; परंतु केवळ एक रूपरेषा देखील अप्रत्यक्षपणे किती पापांपासून त्यांना रोखू शकेल हे सांगता येणार नाही.

ते सर्वकाही पूर्णपणे वाचतात कि नाही याकडे लक्ष द्या. कोणतीही शिकवण त्यांच्या पुढे आणण्यात तुम्हाला संकोच वाटण्याचे काही कारण नाही. ख्रिस्ती धर्माचे सिद्धांत मुलांना समजणार नाहीत असे अनुमान लावण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. आपल्याला वाटते त्यापेक्षा मुलांना पवित्र शास्त्र पुष्कळच चांगले समजते.

त्यांना पाप, त्याचा अपराधीपणा, त्याचे परिणाम, त्याचा प्रभाव, त्याची भयानकता याबद्दल सांगा: तुम्हाला असे दिसून येईल की यातील बरेच काही त्यांना समजते. त्यांना येशू ख्रिस्त आणि आपल्या तारणासाठी त्याने केलेल्या कार्याबद्दल सांगा, – त्याने केलेले प्रायश्चित्त, वधस्तंभ, त्याने सांडलेले रक्त, त्याने केलेले अर्पण, त्याने केलेली मध्यस्थी
याबद्दल सांगा: तुमच्या असे लक्षात येईल की, या सगळ्यात त्यांना समजणार नाही असे काही नाही.

मनुष्याच्या अंतःकरणातील पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल त्यांना सांगा; तो कसा बदल घडवून आणतो, नवीकरण करतो, पवित्रीकरण करतो, शुद्धीकरण करतो: आणि तुम्हाला लवकरच दिसून येईल की, यातील बहुतेक गोष्टींबद्दल ते तुमच्याशी सहमत होतील. थोडक्यात, गौरवी शुभवर्तमानाची लांबी-रुंदी एक लहान मूल किती प्रमाणात मोजू शकते याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही. आपल्याला वाटते त्यापेक्षा त्यांना बऱ्याच जास्त गोष्टी समजू शकतात. [लक्षात घ्या: मुलाला धार्मिक शिक्षण देण्यास सुरवात करण्याच्या वयाबद्दल बोलायचे झाले तर, त्यासाठी कोणताही सर्वसाधारण नियम करता येत नाही. काही मुलांना इतर मुलांपेक्षा लवकर समजू लागते. आपण क्वचितच फार लवकर सुरवात करतो. अगदी तीन वर्षाचे असताना एखादे मूल काय करू शकते याची आश्चर्यकारक उदाहरणे रेकॉर्डवर आहेत.]

त्यांची मने शास्त्रवचनांनी भरून टाका. वचनाला त्यांच्यामध्ये समृद्धपणे वस्ती करू द्या. ते लहान असतानाच त्यांना पवित्र शास्त्र द्या, संपूर्ण पवित्र शास्त्र.

६. त्यांना प्रार्थनेची सवय लावा.
प्रार्थना हा खऱ्या धर्माचा प्राण आहे. मनुष्याचा नवा जन्म झाल्याचा हा पहिला पुरावा आहे. “पाहा,” शौलाला प्रभु म्हणाला, ज्या दिवशी त्याने हनन्याला त्याच्याकडे पाठवले, “पाहा, तो प्रार्थना करत आहे” (प्रे.कृ. ९:११). त्याने प्रार्थना करण्यास सुरुवात केली होती, आणि तो पुरेसा पुरावा होता.

ज्या दिवशी प्रभूच्या लोकांमध्ये आणि जगामध्ये वेगळेपणा निर्माण होण्यास सुरुवात झाली तेव्हापासून प्रार्थना ही त्यांची एक वेगळी खूण निर्माण झाली. “त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले.” (उत्पत्ति ४:२६).

प्रार्थना हे आता सर्व ख्रिस्ती लोकांचे वैशिष्ठ आहे. ते प्रार्थना करतात – कारण ते देवाला त्यांच्या गरजा, भावना, इच्छा, त्यांची भीती सांगतात; आणि ते जे बोलतात त्याला अर्थ असतो. एक नाममात्र ख्रिस्ती मनुष्य कदाचित पुन्हा पुन्हा प्रार्थना करेल आणि चांगल्या प्रार्थना देखील करू शकेल, पण त्याच्यापुढे तो जाऊ शकत नाही.
प्रार्थना हा माणसाच्या आत्म्याचा निर्णायक टप्पा आहे. आम्ही गुढग्यावर आल्याशिवाय आमची सेवा निरुपयोगी आहे आणि आपले श्रम व्यर्थ आहेत. तोपर्यंत आम्हांला तुमच्याबद्दल काही आशा नाही.

प्रार्थना हे आध्यात्मिक समृद्धीचे एक मोठे रहस्य आहे. जेव्हा तुमचे देवासोबत अगदी खाजगी संभाषण होते, तेव्हा तुमचा आत्मा पावसानंतरच्या गवतासारखा वाढतो; जेव्हा संभाषण थोडेसे असते, तेव्हा सर्व काही ठप्प होते, अशावेळी तुम्ही केवळ तुमचा आत्मा जिवंत ठेवू शकता. मला एक वाढ होत असलेला ख्रिस्ती मनुष्य दाखवा, एक पुढे जाणारा ख्रिस्ती, एक मजबूत ख्रिस्ती, एक भरभराट होणारा ख्रिस्ती, आणि तो त्याच्या प्रभूशी वारंवार बोलत असणार याची खात्री बाळगा. तो पुष्कळ मागतो, आणि त्याला पुष्कळ मिळते. तो येशूला सर्व काही सांगतो आणि म्हणून त्याला नेहमी कसे वागावे हे माहित असते.

प्रार्थना हे देवाने आपल्या हातात ठेवलेले सर्वात शक्तिशाली इंजिन आहे. प्रत्येक संकटात वापरण्यासाठी हे सर्वोत्तम शस्त्र आहे आणि प्रत्येक संकटात खात्रीशीर उपाय आहे. ही अशी गुरुकिल्ली आहे जी वचनांच्या खजिन्याचे कुलूप उघडते आणि गरजेच्या वेळी कृपा आणि मदतीचा हात पुढे करते. ही अशी एक चांदीची तुतारी आहे जी देव आपल्याला आपल्या सर्व आवश्यकतांनुसार वाजवण्याची आज्ञा देतो आणि जशी एक प्रेमळ आई आपल्या मुलाच्या हाकेला ओ देते तसे त्याने नेहमी आपली प्रार्थना ऐकण्याचे अभिवचन दिले आहे.

देवाजवळ जाण्यासाठी प्रार्थना हे सर्वात सोपे साधन आहे ज्याचा उपयोग मनुष्य करू शकतो. हे सर्वांच्या आवाक्यात आहे – आजारी, वृद्ध, अशक्त, पक्षाघाती, अंध, गरीब, अशिक्षित – सर्वजण प्रार्थना करू शकतात. स्मरणशक्ती हवी आहे, शिकण्याची इच्छा आहे, पुस्तकांची गरज आहे आणि शिकण्यासाठी शिष्यवृत्ती हवी आहे, अशी विनंती केल्याने तुमचा काही तोटा होणार नाही. जोपर्यंत तुमच्या आत्म्याची स्थिती सांगण्यासाठी तुमच्याकडे जीभ आहे, तोपर्यंत तुम्ही प्रार्थना करू शकता आणि तुम्ही ती केली पाहिजे. “तुम्ही मागत नाही, म्हणून तुम्हांला प्राप्त होत नाही.” (याकोब ४:२), या शब्दांमुळे न्यायाच्या दिवशी अनेकांवर भयंकर न्यायदंड येणार आहे.

पालकांनो, जर तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करत असाल, तर त्यांना प्रार्थनेची सवय लावण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते करा. त्यांना प्रार्थनेची सुरुवात कशी करवी ते दाखवा. काय मागितले पाहिजे ते त्यांना सांगा. त्यांना धीर धरण्यासाठी प्रोत्साहन द्या. प्रार्थना करण्याबद्दल जर ते बेफिकीर झाले आणि त्याबद्दल त्यांनी आळशीपणा केला तर त्यांना आठवण करून द्या. त्यांनी कधीही परमेश्वराचे नाव घेतले नाही तर त्यात तुमचा दोष असू नये.

हे लक्षात ठेवा की, हे धर्मातील पहिले पाऊल आहे जे लहान मूल उचलू शकते. ते वाचायला शिकायच्या खूप आधी, तुम्ही त्याला त्याच्या आईच्या बाजूला गुडघे टेकायला शिकवू शकता आणि प्रार्थना आणि स्तुतीचे साधे शब्द तुमच्या मागे त्याला म्हणायला शिकवू शकता. आणि कोणत्याही हाती घेतलेल्या उपक्रमातील पहिली पायरी ज्याप्रमाणे नेहमीच सर्वात महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे तुमची मुले कशा पद्धतीने प्रार्थना करतात, याकडे तुम्ही जवळून लक्ष देणे आवश्यक आहे. यावर किती गोष्टी अवलंबून आहेत हे फार कमी लोकांना समजते. त्यांनी घाईघाईने, निष्काळजीपणे आणि बेफिकीरपणे प्रार्थना करू नये यासाठी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्ही या गोष्टी नोकर किंवा सांभाळ करणाऱ्या बाईवर सोपवून देण्यापासून सावध राहिले पाहिजे किंवा त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नसताना ते प्रार्थना करतील यावर फारसा विश्वास ठेऊ नका. जी आई आपल्या मुलाच्या दैनंदिन जीवनातील या सर्वात महत्वाच्या भागाकडे स्वतः लक्ष देत नाही तिचे मी फारसे कौतुक करणार नाही. तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या लक्ष देऊन जर कोणती सवय तुमच्या मुलांना लावू शकत असाल तर ती प्रार्थनेची सवय आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, जर तुम्ही तुमच्या मुलांना स्वतःची प्रार्थना करताना कधीही पाहिले नाही, तर त्यासाठी तुम्ही दोषी आहात. ईयोबाच्या ग्रंथात वर्णन केलेल्या शहामृगीपेक्षा तुम्ही थोडे शहाणे आहात, “ती आपली अंडी जमिनीच्या हवाली करते, ती धुळीत उबवते. ती कोणाच्या पायाखाली चिरडतील, किंवा कोणी वनपशू ती तुडवील, ह्याचे तिला भान नसते. ती आपल्या पिलांशी अशी निर्दयतेने वागते की जशी काय ती तिची नव्हतच; आपले श्रम निष्फळ झाले तरी ती निश्‍चिंत राहते.” (ईयोब ३९:१४-१६).

सर्व सवयींपैकी प्रार्थना ही अशी सवय आहे, जी सर्वात जास्त काळ आपल्या आठवणीत राहते. केस पांढरे झालेले अनेक लोक त्यांची आई त्यांच्या लहानपणी कशी प्रार्थना करत असे हे तुम्हाला सांगू शकतील. ते कदाचित बाकीच्या गोष्टी विसरले असतील पण ही गोष्ट मात्र त्यांच्या चांगली लक्षात राहील. त्यांना कोणत्या चर्चमध्ये उपासनेसाठी नेण्यात आले होते, उपदेश करणारे पाळक कोण होते, त्याच्याबरोबर खेळणारे त्यांचे मित्र कोण होते, – या सर्व गोष्टी, कदाचित, ते विसरले असतील, आणि त्यांची कोणतीही छाप त्यांच्यावर कायमची पडलेली नसेल. पण तुम्हाला बऱ्याचदा हे लक्षात येईल की त्याने केलेल्या पहिल्या प्रार्थनेच्या बाबतीत ही गोष्ट अगदी वेगळी आहे. त्याने कोठे गुडघे टेकले होते, त्याला काय म्हणायला शिकवले होते आणि तो प्रार्थना करत असताना त्याची आई त्याच्याकडे कसे लक्ष देत होती हे देखील तो अनेकदा तुम्हाला सांगू शकेल. जणूकाही या सर्व गोष्टी कालच घडल्या आहेत अशा त्या त्याच्या अंतर्चक्षुंसमोर अगदी ताज्यातवान्या होऊन येतील.

वाचकहो, जर तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करत असाल, तर मी तुम्हाला विनंती करतो की, प्रार्थना करण्याच्या सवयीचे बी पेरण्याचा हा काळ त्यांच्यामध्ये सुधारणा झाल्याशिवाय वाया जाऊ देऊ नका. तुम्हाला तुमच्या मुलांना एखादे प्रशिक्षण द्यायचेच असेल तर, त्यांना किमान प्रार्थनेची सवय तरी नक्कीच लावा.

७. त्यांना सार्वजनिक कृपेची साधने तत्परतेने आणि नियमितपणे वापरण्याची सवय लावा.

देवाच्या घरी जाणे आणि मंडळीच्या प्रार्थनेत सामील होणे या कर्तव्यांबाबत आणि विशेषाधिकारांबाबत त्यांना सांगा. जेथे जेथे प्रभूचे लोक एकत्र जमतात, तेथे तेथे प्रभु येशू एका विशिष्ट पद्धतीने उपस्थित असतो आणि जे स्वत: अनुपस्थित राहतात त्यांनी प्रेषित थोमाप्रमाणे आशीर्वाद गमावण्याची अपेक्षा केली पाहिजे हे त्यांना सांगा. ज्या वचनावर उपदेश केला जातो ते लक्षपूर्वक ऐकणे महत्वाचे आहे, तसेच ते मनुष्यांच्या आत्म्यांचे परिवर्तन, पवित्रीकरण आणि उभारणी करण्यासाठी देवाने लावून दिलेला नियम आहे हे त्यांना सांगा. प्रेषित पौल आपल्याला “कित्येकांच्या चालीप्रमाणे एकत्र जमणे” सोडू नका (इब्री. १०:२५); तसेच एकमेकांना बोध करा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसे एकमेकांना उत्तेजन द्या, अशी आज्ञा देतो.

प्रभूभोजनाच्या वेळी केवळ वयस्कर लोक पुढे येतात आणि तरुण-तरुणी मागेच राहतात हे मंडळीमधील अतिशय दुःखद दृश्य आहे असे मी म्हणेन. पण याहीपेक्षा दुःखद दृश्य हे आहे की शब्बाथ शाळेला हजर राहणे बंधनकारक असल्यामुळे तिथे उपस्थित राहणाऱ्या मुलांशिवाय, मंदिरात कोणीही मुले दिसत नाहीत. यापैकी एकही अपराध तुम्हाला लागू होऊ देऊ नका. शाळेला जाणाऱ्या मुलांव्यतिरिक्त प्रत्येक धर्मक्षेत्रात अनेक मुले आणि मुली असतात, आणि तुम्ही त्यांचे पालक आणि मित्र या नात्याने त्यांना तुमच्या सोबत चर्चला आणणे ही तुमची जबाबदारी आहे.

चर्चला न येण्याबद्दल निरर्थक सबबी सांगण्याची सवय त्यांना लागू देऊ नका. त्यांना स्पष्टपणे समजावून सांगा की जोपर्यंत ते तुमच्या छायाछत्राखाली आहेत तोपर्यंत प्रत्येकाने प्रभूवारी प्रभूच्या घराचा सन्मान करणे हा तुमच्या घरचा नियम आहे आणि तुम्ही शब्बाथ मोडणाऱ्याला त्याच्या स्वतःच्या आत्म्याचा खुनी मानता.

तुमची मुले तुमच्यासोबत चर्चला येतात तेव्हा शक्य असल्यास त्यांना तुमच्या जवळ बसवा. चर्चला जाणे ही एक गोष्ट आहे, पण चर्चमध्ये चांगले वागणे ही दुसरी गोष्ट आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, त्यांनी चर्चमध्ये चांगले वागावे यासाठी त्यांना तुमच्या डोळ्यासमोर ठेवण्याइतका सुरक्षित दुसरा कोणताही उपाय नाही.
तरुणांची मने सहज भरकटू शकतात आणि त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते, आणि याला आळा घालण्यासाठी शक्यतोपरी सर्व साधनांचा वापर केला पाहिजे. त्यांना एकटे चर्चला पाठवणे मला बरे वाटत नाही कारण ते आठवड्याभरात शिकणार नाहीत इतक्या वाईट गोष्टी प्रभूवारी रस्त्येने जाताना वाईट संगतीत पडल्याने शिकण्याची शक्यता असते. तसेच चर्चमध्ये “तरुणांचा कॉर्नर” ही गोष्ट पाहणे मला अजिबात आवडत नाही. त्या ठिकाणी त्यांना अनेकदा भक्तीकडे दुर्लक्ष करणे आणि तिचा अनादर करणे अशा सवयी लागू शकतात, आणि अशा सवयी मोडण्याचा जर यदाकदाचित प्रयत्न केलाच तर त्या मोडायला अनेक वर्षे लागतील. मला जे पहायला आवडते ते म्हणजे एकत्र बसलेले एक संपूर्ण कुटुंब, एकमेकांच्या शेजारी बसलेले वृद्ध आणि तरुण, – पुरुष, स्त्रिया आणि मुले, त्यांच्या कुटुंबांसोबत देवाची सेवा करताना.

पण असे काही लोक आहेत जे म्हणतात की मुलांना चर्चला जाण्याचा आग्रह करणे निरुपयोगी आहे … कारण त्यांना काही समजत नाही …

अशा तर्कवितर्कांकडे तुम्ही लक्ष देऊ नये असे मी तुम्हाला सांगेन. मला जुन्या करारात अशी कोणतीही शिकवण आढळत नाही. जेव्हा मोशे फारो समोर गेला (निर्गम १०:९), तेव्हा मला असे दिसते की तो म्हणतो, ““आम्ही आमचे तरुण व म्हातारे ह्यांच्यासह जाऊ; आमचे मुलगे, आमच्या मुली …..ह्या सर्वांना घेऊन आम्ही जाणार; कारण परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हांला उत्सव करायचा आहे.” जेव्हा यहोशवाने नियमशास्त्र वाचले (यहो. ८:३५), तेव्हा मला असे दिसून येते की, “इस्राएलाच्या सबंध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरे ह्यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या; त्यांतला एकही शब्द त्याने गाळला नाही.”
निर्गम ३४:२३ म्हणते, “वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी इस्राएलाचा देव प्रभू परमेश्वर ह्याच्यासमोर हजर व्हावे.” आणि मी जेव्हा नव्या कराराकडे वळतो तेव्हा जुन्या कराराप्रमाणेच तिथे मुले सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याचा उल्लेख केल्याचे मला दिसून येते. जेव्हा पौल शेवटच्या वेळी सोर येथे शिष्यांचा निरोप घेत होता, तेव्हा त्याठिकाणी असे म्हटलेले मला आढळले (प्रे.कृ. २१:५), “तेव्हा स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला नगराबाहेर पोहचवले. तेथे समुद्राच्या किनार्‍यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली.”

शमुवेलाने, त्याच्या बालपणाच्या दिवसांत, परमेश्वराला खरोखर ओळखण्यापूर्वी काही काळ परमेश्वराची सेवा केली असे दिसते. “शमुवेल अद्याप परमेश्वराला ओळखत नव्हता, किंवा परमेश्वराचा शब्द त्याला अद्याप प्रकट झाला नव्हता” (१ शमु. ३:७). “प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या; परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले.” (योहान १२:१६).
असे जेंव्हा लिहिले गेले तेंव्हा येशू जे बोलला ते स्वतः प्रेषितांना देखील समजले नव्हते असे दिसते.

पालकांनो, या उदाहरणांनी तुमच्या मनाला दिलासा द्या. तुमच्या मुलांना आता कृपेच्या साधनांची पूर्ण किंमत समजत नाही म्हणून त्यांना कमी लेखू नका. फक्त त्यांना चर्चमध्ये नियमित हजेरी लावण्याची सवय लावा. हे त्यांच्या मनात एक सर्वोच्च, पवित्र आणि गंभीर कर्तव्य म्हणून बिंबवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कालांतराने ते तुमच्या कृतीबद्दल तुमची प्रशंसा करतील.

८. त्यांना विश्वास ठेवण्याची सवय लावा.

मला असे म्हणायचे आहे की, तुम्ही त्यांना जे सांगता त्यावर विश्वास ठेवण्याचे प्रशिक्षण तुम्ही त्यांना दिले पाहिजे. त्यांनी तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकावे आणि त्यांच्या मतांपेक्षा तुमची मते अधिक चांगली आहेत असा आदर त्यांच्या मनात निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी एखादी गोष्ट वाईट आहे असे म्हणता, तेव्हा ती वाईटच असली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट त्यांच्यासाठी चांगली आहे असे म्हणता, तेव्हा ती चांगलीच असली पाहिजे असा विचार करण्याची सवय तुम्ही त्यांना लावली पाहिजे; थोडक्यात, तुमचे ज्ञान, त्यांच्या स्वतःच्या ज्ञानापेक्षा अधिक चांगले आहे आणि ते तुमच्या शब्दावर पूर्णपणे विसंबून राहू शकतात. ज्या गोष्टी त्यांना आता समजत नाहीत त्या कदाचित भविष्यात त्यांना समजतील, तसेच तुमच्या त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्यामागे काही कारणे आणि त्यांच्या अशीर्वादित जीवनासाठी काही आवश्यक गोष्टी आहेत असा विचार करण्यास त्यांना शिकवा.

एका खऱ्या विश्वासू अंतःकरणाच्या आशीर्वादितपणाचे वर्णन कोण करू शकेल? किंवा अधिक खरे म्हणजे, अविश्वासामुळे जग भोगत असलेल्या दुःखाचे वर्णन कोण करू शकेल? अविश्वासाने हव्वेला निषिद्ध फळ खाण्यास भाग पाडले, – तिच्या मनात देवाच्या “तुम्ही नक्कीच मराल” ह्या वचनाच्या सत्याबद्दल शंका निर्माण झाली. अविश्वासामुळे जुन्या जगाने नोहाचा इशारा नाकारला आणि त्यामुळे त्याचा पापात नाश झाला. अविश्वासाने इस्राएलला वाळवंटात रेंगाळत ठेवले, – अविश्वास ही आडकाठी होती जिने त्यांना वचनदत्त देशात प्रवेश करण्यापासून रोखले. अविश्वासाने यहूदी लोकांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले, – त्यांना दररोज मोशे आणि संदेष्ट्यांनी दिलेली शिकवण वाचून दाखवली जात असतानाही त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. आणि या क्षणापर्यंत अविश्वास हे माणसाच्या हृदयावर राज्य करणारे पाप आहे, – देवाच्या अभिवचनांवर अविश्वास, – देवाच्या इशाऱ्यांवर अविश्वास, – आपण पापी आहोत यावर अविश्वास, – आपण धोकादायक परिस्थितीत आहोत यावर अविश्वास, – आपल्या दुष्ट अंतःकरणाबद्दलच्या अभिमानाच्या आणि जगिकपणाच्या विरुद्ध असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर अविश्वास. वाचकहो, तुम्ही तुमच्या मुलांना कोणतीही तक्रार न करता विश्वास ठेवण्याची सवय लावली नाही, तर तुमच्या प्रशिक्षणाचा काही फायदा होणार नाही – त्यांच्या पालकांच्या शब्दावर विश्वास, त्यांचे पालक जे म्हणतात ते योग्यच असले पाहिजे असा आत्मविश्वास.

मी काही लोकांनी असे म्हणताना ऐकले आहे की, तुमच्या मुलांना ज्या गोष्टी समजत नाहीत त्या गोष्टींची तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करू नये: त्यांनी ज्या गोष्टी कराव्यात अशी तुमची अपेक्षा आहे त्या त्यांना समजावून सांगितल्या पाहिजेत आणि त्यामागची कारणेही त्यांना सांगितली पाहिजेत. अशा समजुतीविरुद्ध मी तुम्हाला गंभीर इशारा देतो. माझे असे स्पष्ट मत आहे की, ते एक चुकीचे आणि भ्रष्ट झालेले तत्व आहे. आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीत गूढ निर्माण करणे हे मूर्खपणाचे आहे यात शंका नाही, आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मुलांना समजावून सांगणे चांगले असते, जेणेकरून त्यांना समजेल की ते समंजस आणि शहाणे आहेत. पण आपण सांगितलेली कोणतीही गोष्ट त्यांनी विश्वासाने स्वीकारू नये आणि त्यांच्या कमकुवत आणि अपूर्ण समजशक्तीने, प्रत्येक पावलागणित “का” आणि “कोणत्या कारणासाठी” अशा शंकांचे निरसन केले गेले पाहिजे अशी त्यांची समजून करून देणे – ही खरोखरच एक भयंकर चूक आहे आणि तिचा त्यांच्या मनावर सर्वात वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.

तुम्हाला योग्य वाटत असले तर तुम्ही तुमच्या मुलांशी विचारविनिमय करू शकता, पण हे लक्षात ठेवायला विसरू नका (जर तुम्ही खरोखरच त्याच्यावर प्रेम करत असाल तर) की शेवटी तो एक लहान मुलगा आहे, — की तो लहान मुलासारखा विचार करतो, त्याची समजशक्ती एका लहान मुलाची समजशक्ती आहे आणि म्हणून लगेच प्रत्येक गोष्टीचे कारण जाणून घेण्याची अपेक्षा त्याने करू नये.

त्याच्यासमोर इसहाकाचे उदाहरण ठेवा, ज्या दिवशी अब्राहाम त्याला मोरिया पर्वतावर अर्पण करण्यासाठी घेऊन गेला (उत्पत्ति २२). त्याने आपल्या वडिलांना तो एकच प्रश्न विचारला, ” होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?” आणि त्याला एकच उत्तर मिळाले, “देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल” कसे, किंवा कोठे, किंवा कोठून, किंवा कोणत्या रीतीने, किंवा कोणत्या मार्गाने, – हे सर्व इसहाकाला सांगितले गेले नाही; पण त्याला मिळालेले उत्तर पुरेसे होते. त्याचा विश्वास होता की सर्वकाही ठीक होईल, कारण त्याच्या वडिलांनी तसे सांगितले होते आणि त्याने त्या उत्तरावर समाधान मानले. तुमच्या मुलांनी देखील सांगा, की आपण सर्वांनी सुरुवातीला विद्यार्थी असले पाहिजे, की प्रत्येक प्रकारच्या ज्ञानावर प्रभुत्व मिळवण्यासाठी एक वर्णमाला असते, – की जगातील सर्वोत्तम घोड्याला सुरवातीला प्रशिक्षण देणे आवश्यक असते, – की एक दिवस असा येईल ज्या दिवशी त्यांना तुमच्या सर्व प्रशिक्षणातील शहाणपण लक्षात येईल. परंतु त्यादरम्यान तुम्ही एखादी गोष्ट योग्य असल्याचे म्हटल्यास, ती त्यांच्यासाठी पुरेशी असली पाहिजे, – त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि समाधानी राहिले पाहिजे.

पालकांनो, प्रशिक्षणातील कोणताही मुद्दा महत्त्वाचा असेल तर तो हा आहे. मी तुम्हाला तुमच्या मुलांवरील प्रेमाचा वस्ता देतो, त्यांना विश्वास ठेवण्याची सवय लावण्यासाठी प्रत्येक मार्गाचा वापर करा.

९. त्यांना आज्ञाधारकपणाची सवय लावा.

हा एक असा घटक आहे जो मिळवण्यासाठी जितके श्रम घेतले जातील तितका फायदा आहे. माझ्या मते इतर कोणत्याही सवयीचा आपल्या जीवनावर इतका प्रभाव पडत नाही. पालकांनो, तुमच्या मुलांना तुमच्या आज्ञा पाळण्यास शिकवण्यासाठी तुम्हाला जरी खूप त्रास सहन करावा लागला आणि त्यांना अनेक अश्रू गळावे लागले तरी हरकत नाही, तुम्ही तसा निर्धार करा. प्रश्न, तर्क, वादविवाद, विलंब, आणि उलट उत्तर देणे या गोष्टी होऊ देऊ नका. तुम्ही जेव्हा त्यांना आज्ञा द्याल तेव्हा तुम्ही त्यांना ती पाळायला लावालच हे त्यांच्या लक्षात येऊ द्या.

आज्ञापालन हे एकमेव वास्तव आहे. आज्ञापालन म्हणजे प्रत्यक्षदर्शनी विश्वास, कृतीतून प्रकट होणारा विश्वास आणि सदेह विश्वास होय. ही प्रभूच्या लोकांसाठी खऱ्या शिष्यत्वाची परीक्षा आहे. ” मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात.” (योहान १५:१४). हे सुप्रशिक्षित मुलांचे लक्षण असले पाहिजे, की त्यांचे पालक त्यांना जे सांगतील ते ते करतात. जर आई-वडिलांचे आनंदाने, स्वेच्छेने आणि लगेच ऐकले नाही तर, पाचव्या आज्ञेत दिलेला सन्मान कुठे आहे?

लगेच आज्ञापालन करणे या कृतीचे पवित्र शास्त्र देखील समर्थन करते. अब्राहामाने केलेल्या मध्यस्थीमध्ये दिसून येते, तो केवळ त्याच्या कुटुंबाला प्रशिक्षितच करणार नाही, तर “तो आपल्या लेकरांना व आपल्या पश्‍चात आपल्या घराण्याला आज्ञा देईल” (उत्पत्ति १८:१९). स्वतः प्रभु येशू ख्रिस्ताविषयी असे म्हटले आहे की तो तरुण असताना मरीया आणि योसेफ यांच्या आज्ञा पाळत असे (लूक २:५१). योसेफाने त्याचे वडील याकोब यांच्या आदेशाचे किती स्पष्टपणे पालन केले ते पहा (उत्पत्ति ३७:१३). “मुलाने वयस्कर लोकांशी गर्विष्ठपणाने वागावे ही वाईट गोष्ट आहे” असे यशया कसे म्हणतो ते पाहा. (यशया ३:५). पालकांची अवज्ञा करणे हे वाईट काळाचे लक्षण आहे असे प्रेषित पौल कसे म्हणतो ते पाहा (२ तीमथ्य. ३:२). ख्रिस्ती पुढाऱ्याला शोभेल अशा आज्ञाधारकपणावर पौल कसे केंद्रित करतो ते पाहा: तो आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीडमर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा; तसेच, सेवक आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारा असावा” ( १ तीमथ्य. ३:४,१२). आणि पुन्हा, “त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावीत” (तीत. १:६).

पालकांनो, तुम्हाला तुमच्या मुलांना आनंदी पहायचे आहे का? तर मग काळजी घ्या, तुम्ही त्यांना आज्ञा दिल्यास ती पाळण्यास शिकवा – त्यांना जे सांगितले गेले आहे त्याप्रमाणे त्यांना वागायला शिकवा. माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही पूर्णपणे आपल्या मनासारखे वागण्यासाठी बनलेलो नाही, – आम्ही त्यासाठी योग्य नाही. ख्रिस्तात स्वतंत्र असलेल्या लोकांना देखील एक जू वाहायचे आहे, ते “प्रभू ख्रिस्ताची चाकरी करतात” (कलस्सै. ३:२४). या जगात आम्ही प्रत्येकाने राज्य केले पाहिजे असे अपेक्षित नाही, तसेच आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्या आज्ञा पाळायला शिकल्याशिवाय आपण कधीही आपल्या योग्य जागी नसतो हे शिकायला मुलांना फार वेळ लागतो. त्यांना लहानपणापासूनच आज्ञा पाळायला शिकवा, नाहीतर ते आयुष्यभर देवाचा संताप करत राहतील, आणि त्याच्या नियंत्रणापासून स्वतंत्र राहण्याच्या निरर्थक कल्पनेने स्वत:ला थकवत राहतील.

वाचकांनो, ही सूचना अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला या दिवसात असे बरेच लोक भेटतील जे त्यांची मुले सक्षम होण्याआधीच त्यांना स्वत:ची निवड करण्याची आणि स्वतःचे निर्णय घेण्याची, तसेच त्यांच्या अवज्ञांबद्दल निमित्त सांगण्याची परवानगी देतात, जणूकाही ती दोष न लावण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या मुलाच्या इच्छांपुढे झुकणारे पालक आणि नेहमी मनमानी करणारे मूल हे एक अतिशय वेदनादायक दृश्य आहे; — वेदनादायक, कारण त्यात मला देवाने लावून दिलेल्या नियमांचा क्रम उलटा झाल्याचे आणि पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे दिसून येते; – वेदनादायक, कारण मला खात्री आहे की शेवटी त्या मुलाच्या चारित्र्यामध्ये मनमानी, गर्व, आणि अहंकार हे दुर्गुण दिसून येतील. मुले लहान असताना त्यांना त्यांच्या जगिक पित्याची अवज्ञा करण्यास अटकाव न केल्यास, मोठे झाल्यावर त्यांनी त्यांच्या स्वर्गीय पित्याची अवज्ञा केली तर त्यात तुम्हाला फारसे आश्चर्य वाटू नये.

पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करत असाल, तर आज्ञापालन हे त्यांच्या डोळ्यांसमोर सतत एक बोधवाक्य आणि संकेतशब्द असावा.

१०. त्यांना नेहमी खरे बोलण्याची सवय लावा.

आम्हाला प्रथमदर्शनी वाटते त्यापेक्षा खरे बोलणे हे जगात फारच कमी प्रमाणात दिसून येते. संपूर्ण सत्य सांगणे, आणि सत्याशिवाय दुसरे काही न सांगणे, हा एक सुवर्ण नियम आहे जो अनेकांनी लक्षात ठेवला पाहिजे. खोटे बोलणे आणि सांगण्याची टाळाटाळ करणे ही जुनी पापे आहेत. सैतान हा त्यांचा पिता होता, – त्याने निर्लज्जपणे खोटे बोलून हव्वेला फसवले, आणि मानवाचे पतन झाल्यापासून ते एक असे पाप आहे ज्यापासून हव्वेच्या सर्व मुलांनी सावध राहिले पाहिजे.

जगात किती खोटेपणा आणि फसवणूक आहे याचा विचार करा! किती अतिशयोक्ती! एका साध्या घटनेत किती भर घातली जाते! एखादी गोष्ट सांगणे बोलणाऱ्याच्या हिताचे नसेल, तर त्याच्या बोलण्यातून किती गोष्टी वागळल्या जातात! आम्ही त्यांच्या शब्दांवर निसंकोचपणे विश्वास ठेवतो असे त्यांच्याबद्दल बोलता येईल अशी किती कमी माणसे आपल्या परिचयाची असतात! खरोखरच, प्राचीन पर्शियन लोक त्यांच्या पिढीत शहाणे होते: त्यांच्या मुलांच्या शिक्षणात त्यांनी खरे बोलायला शिकले पाहिजे हा एक प्रमुख मुद्दा होता. अशा मुद्याचा उल्लेख करणे हा मनुष्याच्या नैसर्गिक पापीपणाचा किती चिंताजनक पुरावा आहे!

वाचकहो, जुन्या करारात देवाचा ‘सत्याचा देव’ असा किती वेळा उल्लेख केला गेला आहे हे तुम्ही सांगू शकाल का? येशू ख्रिस्त ज्याच्याशी आपली सहभागीता आहे त्याच्या स्वभावात सत्य हे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून आपल्यासमोर ठेवलेले दिसून येते. तो सरळ रेषेवरून आपली दिशा कधीही बदलत नाही. तो खोटे बोलणे आणि ढोंगीपणाचा तिरस्कार करतो. हे सतत तुमच्या मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करा. कमी खरे बोलणे म्हणजे खोटे बोलणे हे त्यांना ठासून सांगा; टाळाटाळ करणे, सबब सांगणे आणि अतिशयोक्ती करणे म्हणजे खोटेपणाशी तडजोड करण्यासारखे आहे आणि ह्या गोष्टी आम्ही टाळल्या पाहिजे. खरे बोलण्यासाठी त्यांना कितीही किंमत मोजावी लागली तरी कोणत्याही परिस्थितीत सरळ राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा.
जरी मी ह्या विषयावर बरेचकाही बोलू शकेन, तरीही तुमच्या मुलांना हाताळत असताना तुम्हाला दिलासा देण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी मी ह्या विषयाकडे तुमचे लक्ष वेधत आहे. त्यांच्या बोलण्यावर नेहमी विश्वास ठेवण्यासाठी आणि लपवालपव करणे ह्या मुलांमध्ये असलेल्या वाईट सवयीला अटकाव करण्यासाठी तुम्हाला पुष्कळ मद्दत होईल. आपल्यातील मोकळेपणा आणि सरळपणा हे विषय आपण लहान असताना आपल्या पालकांनी कसे हाताळले यावरून दिसून येतो.

११. त्यांना नेहमी कुटुंबाबरोबर आणि देवाबरोबर वेळ घालवण्याची सवय लावा.

आळशीपणा हा सैतानाचा सर्वात चांगला मित्र आहे. त्याला आपले नुकसान करण्याची संधी देणे हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे. निष्क्रिय मन हे उघड्या दारासारखे असते आणि जर सैतान त्याद्वारे स्वतःमध्ये प्रवेश करत नसेल तर तो आपल्या मनात वाईट विचार आणण्यासाठी काहीतरी प्रलोभन दाखवेल हे निश्चित आहे.

निर्माण केलेला कोणताही जीव निष्क्रिय असणे कधीही अभिप्रेत नव्हते. सेवा आणि कार्य ह्या गोष्टी देवाच्या प्रत्येक प्राण्याला नेमून दिल्या आहेत. स्वर्गातील देवदूत काम करतात, – ते परमेश्वराची सेवा करणारे सेवक आहेत, ते नेहमी त्याची इच्छा पूर्ण करतात. सुखलोकात आदामकडे काम सोपवून दिले होते, — त्याला एदेन बागेची काट-छाट करण्यासाठी आणि तिची निगा राखण्यासाठी नेमण्यात आले होते. गौरवात असलेल्या उद्धार पावलेल्या संतांना काम असेल, “ज्याने त्यांना विकत घेतले त्याची ते रात्रंदिवस स्तुती आणि गौरव करतात ते विश्रांती घेत नाहीत.” आणि मनुष्य, दुर्बल, पापी मनुष्य त्याच्याकडे काहीतरी काम असायला हवे, नाहीतर त्याच्या आत्म्याची लवकरच वाईट परिस्थिती होईल. आपले हात काहीतरी काम असले पाहिजे आणि आपले मन कशाने तरी व्यापलेले असले पाहिजे, नाहीतर आपल्या कल्पनेला लवकरच उधाण येईल आणि दुष्प्रवृत्ती निर्माण होतील.

आणि आपल्या बाबतीत जे खरे आहे ते आपल्या मुलांबाळांच्या बाबतही खरे आहे. अरेरे, खरोखरच, ज्या माणसाकडे काही काम नाही त्याची किती दुर्दशा होणार! यहूदी लोक आळशीपणाला निश्चितच पाप समजत होते: प्रत्येकाने आपल्या मुलाला एखाद्या उपयुक्त उद्योगाचे प्रशिक्षण दिले पाहिजे हा त्यांचा एक कायदा होता. – आणि त्यांचे बरोबर होते. आपल्यापैकी काही जाणांपेक्षा त्यांना मनुष्याच्या मनाची चांगली जाण होती.

आळशीपणाने सदोममध्ये पाप वाढले. “पाहा, तुझी बहीण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते : गर्व, अन्नाची विपुलता व ऐषआराम ही तिला व तिच्या कन्यांना होती” (यहेज्केल २६:४९). आळशीपणाचा उरियाच्या पत्नीसोबत दाविदाने केलेल्या भयंकर पापाशी बराचसा संबंध होता. — २ शमुवेल ११:१ मध्ये मला दिसते की यवाब अम्मोनी लोकांशी लढाई करण्यासाठी गेला, “पण दावीद यरुशलेमेतच राहिला.” हा निष्क्रियपणा नव्हता का? आणि मग असे झाले की त्याने बथशेबाला पाहिले – आणि आपण वाचतो की त्याची पुढची पायरी म्हणजे त्याचे फार मोठ्या प्रमाणावर झालेले दयनीय पतन.
माझा खरोखरच असा विश्वास आहे की आळशीपणामुळे इतर कोणत्याही सवयीपेक्षा जास्त पाप झाले आहे. मला अशी शंका आहे की आळशीपणा शरीराच्या अनेक कर्मांची जननी आहे, — विवाहबाह्य लैंगिक संबंध, अविवाहित स्त्रीशी लैंगिक संबंध, मद्यपान आणि इतर अनेक अंधाराच्या कृत्यांची, ज्यांचे नाव घेण्यास मला वेळ नाही, ती जननी आहे. मी खरे बोलत आहे की नाही हे तुमच्या मनालाच ठरवू द्या. तू निष्क्रिय होतास, आणि त्याच क्षणी सैतान दार ठोठावून आत आला.

आणि खरोखरच मला या गोष्टीचे आश्चर्य वाटत नाही; – आपल्या सभोवतालच्या जगातील प्रत्येक गोष्ट हाच धडा शिकवत आहे. स्थिर पाणी घाणेरडे आणि अशुद्ध होते: वाहणारे आणि गती असलेले झरे किंवा प्रवाह नेहमीच स्वच्छ असतात. तुमच्याकडे जर वाफ बनवायची यंत्रसामग्री असेल, तर तुम्ही ती वापरली पाहिजे, नाहीतर ती लवकरच खराब होऊन जाईल. तुमच्याकडे घोडा असेल तर तुम्ही त्याला नियमित व्यायाम दिला पाहिजे; त्याच्याकडे नियमित काम असेल तेंव्हाच तो सुदृढ राहील. तुम्हाला स्वतःचे शारीरिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे. तुम्ही नेहमी शांत बसल्यास, खात्रीने तुमच्या शरीरात तक्रार निर्माण होईल. आणि अगदी तसेच आत्म्याचे देखील आहे. सक्रिय आणि गतिशील मनावर अचूक नेम धरणे सैतानाला कठीण जाते. नेहमी उपयुक्त कामात गुंतलेले राहण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे तुमच्या शत्रूला तण पेरण्यासाठी जागा मिळणे कठीण होईल.

वाचकहो, मी तुम्हाला या गोष्टी तुमच्या मुलांच्या मनावर बिंबवायला सांगतो. त्यांना वेळेची किंमत शिकवा आणि त्याचा योग्य वापर करण्याची सवय त्यांना लावण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या हातात जे काही आहे, मग ते काहीही असो, त्याबद्दल त्यांनी आळशीपणा केलेला पाहून मला वेदना होतात. मला त्यांना सक्रिय आणि कष्टाळू पाहणे आणि ते जे काही करत आहेत ते त्यांनी मनापासून केलेले पाहायला आवडते; जेव्हा त्यांना शिकायचे असते तेव्हा त्यांचे संपूर्ण अंतःकरण त्यांनी त्यात लावावे; — जेव्हा ते खेळायला जातात किंवा करमणूकीची एखादी कृती करतात तेव्हा ती देखील त्यांनी मनापासून करावी.

पण तुम्ही त्यांच्यावर मनापासून चांगले प्रेम करत असाल, तर तुमच्या कुटुंबात आळशीपणा हे पाप मानले जाऊ द्या.

१२. त्यांना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करण्यापासून सावध राहण्याचे शिक्षण द्या.

हा एक असा मुद्दा आहे ज्यावर तुम्हाला सर्वात जास्त सावधगीरी बाळगण्याची गरज आहे. आपल्या स्वतःच्या मांस-रक्ताबद्दल माया आणि प्रेम असणे स्वाभाविक आहे आणि या प्रेमळपणाचा अतिरेक होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रेमापोटी तुम्ही तुमच्या मुलांच्या चुकांकडे डोळेझाक करणार नाही आणि त्या चुकांबद्दल सल्ला देण्याकडे दुर्लक्ष करणार नाही याची काळजी घ्या. शिक्षा आणि सुधारणेचा त्रास होण्यापेक्षा वाईट वर्तनाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून काळजी घ्या.

मला चांगले माहीत आहे की शिक्षा आणि सुधारणा या परस्परविरोधी गोष्टी आहेत. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना वेदना देणे आणि त्यांना रडायला लावणे यापेक्षा कोणतीही गोष्ट अप्रिय नाही. परंतु आपने मन ज्या पद्धतीने विचार करते, त्यावरून असे गृहीत धरणे व्यर्थ आहे की, सर्वसाधारणपणे, मुलांना सुधारल्याशिवाय त्यांचे चांगले संगोपन होऊ शकेल.

बिघडवणे हा एक अतिशय अर्थपूर्ण शब्द आहे आणि दुर्दैवाने फार अर्थापूर्ण आहे. आता मुलांना बिघडवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांना त्यांचा स्वतःच्या मार्गाने जाऊ देणे – त्यांना चुकीच्या गोष्टी करू देणे आणि त्याबद्दल त्यांना शिक्षा न करणे. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या आत्म्यांचा नाश करायचा नसेल तर, तुम्हाला कितीही वेदना सहन कराव्या लागल्या तरी तुम्ही असे करू नका.

पवित्र शास्त्र या विषयावर स्पष्टपणे बोलत नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही की: “जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्याच्यावर प्रीती करणारा होय.” (नीति. १३:२४). “काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर; त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नकोस” (नीति. १९:१८). “बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते; शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते.” (नीति. २२:१५). मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नकोस, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही. तू त्याला छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचव. (नीति. २३:१३,१४). “छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते. तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जिवाला हर्ष देईल.” (नीति. २९:१५,१७).

ही वचने किती शक्तिशाली आणि प्रभावी आहेत! अनेक ख्रिस्ती कुटुंबांना ती जवळजवळ अनोळखी असतात ही वस्तुस्थिती किती खिन्न करणारी आहे! त्यांच्या मुलांना ताडन करणे आवश्यक असते, पण तसे क्वचितच केले जाते; त्यांच्यात सुधारणा करण्याची गरज असते, पण ती क्वचितच केली जाते. आणि तरीही नीतिसूत्रे हे पुस्तक ख्रिस्ती लोकांना अप्रचलित नाही किंवा अयोग्यही नाही. ते देवाच्या प्रेरणेने दिले गेले आहे, आणि ते फायदेशीर आहे. रोम आणि इफिस येथील लोकांना लिहिलेल्या पत्रांप्रमाणे ते आपल्या शिक्षणासाठी दिले आहे. निःसंशयपणे, जो विश्वासणारा त्याच्या सल्ल्याकडे लक्ष न देता आपल्या मुलांना वाढवतो तो लिखित गोष्टींपेक्षा स्वतःला जास्त शहाणा समजतो आणि मोठी चूक करतो.

आई-वडिलांनो, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, तुमची मुले चुकत असताना तुम्ही त्यांना शिक्षा केली नाही, तर तुम्ही त्यांच्याबाबतीत फार मोठी चूक करत आहात. मी तुम्हाला चेतावणी देतो की, प्रत्येक युगामध्ये, ह्याच खडकावर आदळून देवाच्या अनेक संतांची जहाजे बुडाली आहेत. वेळेत शहाणे होण्याचा आणि त्यापासून दूर राहण्याचा सल्ला देताना मला आनंद होत आहे. एलीच्या बाबतीत काय घडले ते पाहा. त्याचे मुलगे हफनी आणि फिनहास हे “स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरले नाही.” जेथे त्यांना कठोरपणे फटकारायला हवे होते तेथे त्याने त्यांना एक लेचीपेची आणि कोमट तंबी देण्यापलीकडे काही केले नाही. थोडक्यात, त्याने आपल्या मुलांचा देवापेक्षा अधिक आदर केला. आणि या गोष्टींचा शेवट काय झाला? युद्धात त्याच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे ऐकण्यासाठी तो जिवंत राहिला आणि शेवटी तो वृद्ध व अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. (१ शमू. २:२२-२९, ३:१३).

दावीदाच्या बाबतीतही काय घडले ते पाहा. आपल्या मुलांचा इतिहास आणि त्यांची पापे याबद्दल वाचताना कोणाला दुःख होणार नाही? अम्नोनाचा व्यभिचार, — अबशालोमाचा खून आणि गर्विष्ठ बंडखोरी, — अदोनीयाची षडयंत्री महत्त्वाकांक्षा: देवाच्या मनासारखा असलेल्या मनुष्यासाठी ह्या जखमा खरोखरच फार गंभीर होत्या. पण यात त्याच्या काही दोष नव्हता का? पण मला असे म्हणताना वाईट वाटते पण दावीद दोषी होता यात काही शंका नाही. १ राजे १:६ मधील अदोनीयाबद्दलच्या अहवालात मला या सर्व गोष्टींचा एक सुगावा सापडतो: ” “तू हे काय करतोस?” असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखवले नव्हते.” हाच सर्व नैतिक दुराचाराचा पाया होता. दावीद एक अतिशय लाड पुरवणारा पिता होता, – एक असा पिता ज्याने आपल्या मुलांना त्यांचा स्वतःचा मार्ग निवडू दिला – आणि त्याने पेरल्याप्रमाणे कापणी केली.

पालकांनो, तुमच्या मुलांच्या फायद्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की, मुलांचे फालतू लाड पुरवण्यापासून सावध रहा. मी तुम्हाला हे लक्षात ठेवण्याचे आवाहन करतो की, त्यांचा खरा फायदा कशात आहे हे विचारात घेणे तुमचे आद्य कर्तव्य आहे, त्यांच्या कल्पना आणि आवडीनिवडींचा नाही; – त्यांना शिक्षण देण्यासाठी, त्यांचे मनोरंजन करण्यासाठी नाही – त्यांचा उत्कर्ष करण्यासाठी, केवळ त्यांना खुश करण्यासाठी नाही.

तुम्ही तुमच्या मुलावर कितीही प्रेम करत असला तरी, तुम्ही तुमच्या मुलाच्या मनातील प्रत्येक इच्छेला आणि लहरीपणाला वाट करून देऊ नये. आपण त्याची अशी समजूत होऊ देऊ नये की त्याची इच्छा आपल्यासाठी सर्व काही आहे आणि त्याने केवळ एखाद्या गोष्टीची इच्छा करवी आणि ती पूर्ण होईल. मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या मुलांना तुमचे श्रद्धास्थान बनवू नका, नाही तर केवळ तुमचा मूर्खपणा तुम्हाला पटवून देण्यासाठी, देव त्यांना घेऊन जाईल आणि तुमचे श्रद्धास्थान भंग पावेल.

तुमच्या मुलांना “नाही” म्हणायला शिका. त्यांना हे दाखवून द्या की तुम्ही त्यांच्यासाठी अयोग्य असलेल्या गोष्टींना नकार देण्यास सक्षम आहात. त्यांना हे दाखवून द्या की त्यांनी तुमचे ऐकले नाही तर तुम्ही त्यांना शिक्षा करू शकता आणि जेव्हा तुम्ही शिक्षेबद्दल बोलत आहात तेव्हा तुम्ही केवळ धमकी देत आहात असे नाही तर ती प्रत्यक्षात उतरवण्याची देखील तुमची तयारी आहे. त्यांना फार जास्त धमकावू नका. [टीप: काही पालक आणि सांभाळ करणाऱ्या आयांना प्रत्येक क्षुल्लक प्रसंगी आणि बहुतेकवेळा विनाकारण, मुलाला किंवा मुलीला “खट्याळ मुलगा/मुलगी” असे म्हणण्याची सवय असते . ही एक अतिशय वाईट सवय आहे. दोष लावणारे शब्द खऱ्या कारणाशिवाय कधीही वापरू नयेत.] धमक्या आणि दोषारोप लोकांच्या मनात, फार काळ टिकतात. क्वचितच शिक्षा द्या, पण ती शिक्षा चांगली आणि योग्य हेतूने असली पाहिजे, – वारंवार आणि थोडीशी शिक्षा देणे फारसे परिणामकारक होत नाही. [टीप: मुलाला शिक्षा करण्याचा सर्वोत्तम मार्ग हा आहे, असा कोणताही सर्वसामान्य नियम केला जाऊ शकत नाही. मुलांचे स्वभाव इतके वेगवेगळे असतात की, एका मुलासाठी जी कठोर शिक्षा असेल, ती दुसऱ्यासाठी अगदी क्षुल्लक असू शकते. कोणत्याही मुलाला कधीही छडी मारू नये ह्या आधुनिक कल्पनेच्या विरोधात माझा निर्धारीत निषेध नोंदवण्याची मी केवळ विनंती करतो. निःसंशयपणे काही पालक शारीरिक सुधारणेचा वापर खूप जास्त आणि खूप हिंसकपणे करतात; परंतु माझ्या मते, इतर अनेकजण, तिचा फारच कमी वापरतात.]

“हा एक छोटासा दोष आहे” या कल्पनेने लहान दोषांकडे दुर्लक्ष करण्यापासून सावध रहा. मुलांना शिक्षण देताना कोणतीही गोष्ट छोटी नाही; सर्व महत्वाच्या आहेत. तण लहान असतानाच उपटणे आवश्यक आहे. त्यांना एकटे सोडा, आणि ते लवकरच स्वतःला फार मोठे समजू लागतील.

वाचकहो, तुम्हाला एखादा दखलपात्र मुद्दा माहित असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा, तो हा आहे. मला कल्पना आहे की तो तुम्हाला त्रासदायक वाटेल. पण तुम्ही तुमची मुले लहान असताना त्यांच्यासाठी त्रास सहन केला नाही तर ते म्हातारे झाल्यावर तुम्हाला त्रास देतील. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही निवडू शकता.

१३. देव त्याच्या मुलांना कसे प्रशिक्षण देतो हे सतत लक्षात ठेवून त्याप्रमाणे त्यांना प्रशिक्षित करा.

पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की देवाचे काही निवडलेले लोक आहेत – ते या जगात एक कुटुंब म्हणून आहेत. पापाची जाणीव झालेले सर्व गरीब बिचारे पापी लोक, ज्यांनी शांतीसाठी येशूकडे धाव घेतली आहे, त्यांचे एक कुटुंब तयार होते. तारणासाठी ख्रिस्तावर खरोखर विश्वास ठेवणारे आपण सर्व त्या कुटुंबाचे सदस्य आहोत.

आता देव पिता या कुटुंबातील सदस्यांना त्याच्या सोबत सदासर्वकाळ स्वर्गात राहण्यासाठी प्रशिक्षण देत आहे. तो आपल्या द्राक्षवेलांची छाटणी करणारा शेतकरी म्हणून काम करत आहे, जेणेकरून त्यांनी अधिक फळे द्यावीत. त्याला आपल्या प्रत्येकाचे चारित्र्य माहीत आहे, — आमची पापे, — आमची कमजोरी, — आमची विशिष्ठ नैतिक दुर्बलता, — आमच्या विशेष गरजा. आपली कृत्ये आणि आपण कोठे राहतो, जीवनातील आपले सोबती कोण आहेत आणि आपल्या समस्या काय आहेत, आपली प्रलोभने कोणती आहेत आणि आपले विशेषाधिकार काय आहेत हे त्याला माहीत आहे.
त्याला या सर्व गोष्टी माहित आहेत, आणि तो नेहमी आपल्या भल्यासाठी सर्व गोष्टींचा योग्य अनुक्रम लावतो. तो आपल्यापैकी प्रत्येकाला, त्याच्या पुरवठ्यामधून, जास्तीत जास्त फळ देण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी, – आपण सहन करू शकतो तितका सूर्यप्रकाश आणि आवश्यकतेनुसार पाऊस, – आपल्याला सहन होतील तितक्या कटू आणि तितक्याच गोड गोष्टींचे वाटप करतो. वाचकहो, तुम्हाला तुमच्या मुलांना हुशारीने प्रशिक्षित करायचे असेल, तर देव पिता त्याच्या मुलांना कसे प्रशिक्षण देतो त्याकडे नीट लक्ष द्या. तो सर्व काही चांगले करतो. त्याने आखलेली योजना चांगलीच असली पाहिजे.

तेव्हा पाहा, अशा किती गोष्टी आहेत ज्या देव त्याच्या मुलांपासून रोखून धरतो. माझ्या मते, त्यांच्यापैकी अगदी थोडे असे असतील ज्यांनी, ज्या इच्छांची पूर्तता करण्यामध्ये देवाला कधीच आनंद नव्हता अशा गोष्टींची इच्छा केली नसेल. असे अनेकदा घडले आहे की त्यांना एखादी गोष्ट साध्य करायची होती, पण ती साध्य करण्यामध्ये सतत अडथळे येत होते. याचा अर्थ देव ती गोष्ट जणूकाही आपल्या आवाक्याबाहेर ठेवत होता आणि म्हणत होता, “हे तुमच्यासाठी चांगले नाही; तुम्ही असे करू नका.” मोशेला यार्देन नदीपलीकडे जाण्याची आणि वचनदत्त देश पाहण्याची खूप इच्छा होती. पण तुम्हाला आठवत असेल की त्याची ती इच्छा कधीच पूर्ण झाली नाही.

हे देखील पाहा, देव आपल्या लोकांना कितीतरी वेळा अंधकारमय आणि गूढ वाटणाऱ्या मार्गांनी नेतो. आपल्याशी त्याच्या सर्व व्यवहाराचा अर्थ आपण लावू शकत नाही; आपली पाऊले ज्या मार्गाने पडत आहेत तो मार्ग बरोबर आहे की नाही हे आपल्याला समजू शकत नाही. कधी-कधी आपल्यावर इतकी संकटे येतात, – इतक्या अडचणींनी आपण वेढले जातो , – की आम्ही काय करणे आवश्यक आहे हे आपल्याला कळत नाही. जणू काही आपला पिता आपल्याला हात धरून एका अंधाऱ्या जागी नेत आहे आणि म्हणत आहे, “प्रश्न विचारू नका, तर माझ्यामागे या.” मिसर देशातून कनानपर्यंत थेट रस्ता होता, तरीही इस्राएलला त्या रस्त्याने नेण्यात आले नाही; तर त्यांना रानात गोलगोल फिरवले गेले. आणि हे त्याकाळी त्या लोकांना कठीण वाटले. “लोकांचे मन,” आम्हाला सांगितले जाते, “त्या मार्गामुळे अधीर झाले” (निर्गम १३:१७-१८; गणना २१:४).

हे देखील पहा, देव किती वेळा त्याच्या लोकांच्या जीवनात परीक्षा आणि दुःख पाठवून त्यांना शासन करतो. तो त्यांच्याकडे विरोध आणि निराशा पाठवतो; तो त्यांना आजारी पाडतो; तो त्यांची मालमत्ता आणि मित्र त्यांच्यापासून हिरावून घेतो; तो त्यांच्या परिस्थितीत बदल करतो; तो शरीराला अत्यंत कठीण अशा गोष्टींनी पीडा देतो; आणि आपल्यापैकी काही जण आपल्यावर लादलेल्या ओझ्याखाली उघडपणे त्यांचा विश्वास आणि धैर्य गमावून बसले आहेत. आमच्यावर आमच्या शक्तीपलीकडे दबाव आणल्यासारखे वाटले आहे आणि ज्या हाताने आम्हाला शासन केली आहे त्याच्याकडे तक्रार करण्यास आम्ही जवळजवळ तयार आहोत. प्रेषित पौलाच्या शरीरात एक काटा ठेवलेला होता, एक दुःखदायक शारीरिक परीक्षा, यात काही शंका नाही, जरी ते नेमके काय होते हे आपल्याला माहित नाही. पण हे आम्हाला माहीत आहे, – तो दूर व्हावा म्हणून त्याने देवाकडे तीनदा विनंति केली; तरीही तो दूर केला गेला नाही (२ करिंथ. १२:८-९).
आता वाचकहो, या सर्व गोष्टी असूनही, तुम्ही कधी देवाच्या एकातरी मुलाबद्दल असे ऐकले आहे का ज्याला असे वाटले की त्याच्या पित्याने त्याला योग्य वागणूक दिली नाही? नाही, मला खात्री आहे की तुम्ही कधीच असे ऐकले नसेल. देवाची मुले तुम्हाला नेहमी असे सांगतील की, अखेरीस, ही एक आशीर्वादाची गोष्ट होती की ते त्यांच्या मनासारखे वागले नाहीत आणि ते स्वतःसाठी कधीही करू शकले नसते इतक्या चांगल्या गोष्टी देवाने त्यांच्यासाठी केल्या. होय! आणि ते तुम्हाला हे देखील सांगू शकतील की, ते स्वतः कधीही मिळवू शकले नसते इतके सुख देवाने त्यांच्या आयुष्यात त्यांना दिले आहे आणि त्याचा मार्ग, काही वेळा जरी फार अंधकारमय वाटला तरी, तो आनंद आणि शांतीचा मार्ग होता.

देव त्याच्या लोकांशी ज्या प्रकारे वागला ते तुम्हाला शिकवण्यासाठी होते यावर तुम्ही खोलवर विचार करावा असे मी तुम्हाला सांगतो. तुमच्या मुलाच्या स्वतःच्या इच्छा काहीही असोत, त्यामुळे त्याचे नुकसान होईल असे तुम्हाला वाटत असेल तर त्यापासून त्याला रोखण्यास तुम्ही मागेपुढे पाहू नका. ही देवाची योजना आहे.

ज्या आज्ञांमध्ये त्याला सध्या विवेक दिसत नाही अशा आज्ञा देण्यात आणि त्याच्या मनाला आता पटत नाही अशा प्रकारे त्याला मार्गदर्शन करण्यात अजिबात संकोच बाळगू नका. ही देवाची योजना आहे.

तुम्हाला कितीही वाईट वाटत असले तरी, त्याच्या आत्म्याच्या आरोग्यासाठी त्याला शासन करणे व त्याच्यात सुधारणा करणे आवश्यक आहे असे दिसत असताना त्यापासून आक्रसून मागे होऊ नका; आणि हे लक्षात ठेवा की, मनासाठी असलेली औषधे कडू आहेत म्हणून ती नाकारली जाऊ नयेत. ही देवाची योजना आहे.

आणि सर्वात महत्वाचे, प्रशिक्षणाच्या अशा योजनेमुळे तुमची मुले नाखूष होतील म्हणून घाबरू नका. मी तुम्हाला या भ्रमाविरुद्ध चेतावणी देतो. तुम्ही ह्या भ्रमात राहिलात, तर नेहमी मनमनी करणे ह्यापेक्षा दुःखाकडे जाणारा दुसरा कोणताही निश्चित मार्ग नाही. आमची इच्छा तपासून पाहणे आणि तिला नकार देणे ही आमच्यासाठी एक आशीर्वादाची गोष्ट आहे; त्यामुळे जेव्हा आनंदाचे प्रसंग आमच्या जीवनात येतात तेव्हा त्यांची प्रशंसा करायला आपण शकतो. सदैव स्वैराचाराने वागणे हा स्वार्थी बनण्याचा मार्ग आहे; आणि माझ्यावर विश्वास ठेवा की, स्वार्थी लोक आणि बिघडलेली मुले, क्वचितच आनंदी असतात.

वाचकहो, देवापेक्षा शहाणे होऊ नका; – तो जसे प्रशिक्षित करतो तसे तुमच्या मुलांना प्रशिक्षण द्या.

१४. तुमच्या स्वतःच्या उदाहरणाचा प्रभाव सतत लक्षात ठेवून त्यांना प्रशिक्षित करा.

जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या नमुन्याचा त्यांना आधार नसेल, तोपर्यंत सूचना, सल्ले आणि आज्ञा यांचा फारसा उपयोग होणार नाही. जोपर्यंत तुमची कृती तुमच्‍या सल्‍ल्‍याच्‍या विरुद्ध असेल तोपर्यंत तुमची मुले तुम्‍ही जे सांगत आहात ते मनापासून सांगत आहात आणि त्यांनी तुमच्या आज्ञेचे पालन करावे अशी तुमची खरोखर इच्छा आहे यावर कधीही विश्‍वास ठेवणार नाहीत. आर्चबिशप टिलॉटसन यांनी चांगल्या रीतीने आपले मत व्यक्त केले जेव्हा ते म्हणाले, “मुलांना चांगली शिकवण देणे आणि एक वाईट उदाहरण त्यांच्या समोर ठेवणे म्हणजे त्यांना स्वर्गाचा मार्ग दाखवण्यासाठी डोके हालवून इशारा करणे, आणि त्यांचा हात धरून त्यांना नरकाच्या मार्गाने नेण्यासारखे आहे.”

उदाहरणाचा जोर आणि शक्ती याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. आपल्यापैकी कोणीही या जगात स्वतःसाठी जगू शकत नाही; आपण नेहमी आपल्या सभोवतालच्या लोकांवर, कोणत्या ना कोणत्या मार्गाने, एकतर चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी, देवासाठी किंवा पापासाठी प्रभाव पाडत असतो. – ते आमचे मार्ग पाहतात, ते आमच्या आचरणाकडे अवलोकन करतात, ते आमचे वर्तन पाहतात आणि ते आमच्या प्रत्यक्ष कृतीकडे पाहून असा अंदाज बांधतात की आपण योग्य दिशेने विचार करतो. आणि मला असा विश्वास आहे की, पालक आणि मुले यांच्याबाबतीत उदाहरण फारच शक्तिशाली आहे.

आई-वडिलांनो, तुम्हाला हे विसरून चालणार नाही की मुले ऐकून शिकतात त्यापेक्षा पाहून जास्त शिकतात. घरात मुलांच्या चारित्र्यावर जितकी खोलवर छाप पडते तितकी ती शाळेत पडत नाही. सर्वोत्तम शाळामास्तर त्यांच्या मनावर तितकीशी छाप पाडणार नाहीत जितकी ती तुमच्या सोबत शेकोटीजवळ बसल्याने पडेल. मुलांच्या दृष्टीने स्मरणशक्तीपेक्षा अनुकरण हे अधिक शक्तिशाली तत्व आहे. त्यांना जे सांगितले जाते त्यापेक्षा ते जे पाहतात त्याचा त्यांच्या मनावर जास्त प्रभाव पडतो.

तेव्हा काळजी घ्या, मुलाच्या आधी तुम्ही काय करता याकडे लक्ष द्या. “जो मुलासमोर पाप करतो, तो दुप्पट पाप करतो” ही म्हण खरी आहे. तुमचे कुटुंब स्पष्टपणे वाचू शकेल असे ख्रिस्ताचे जिवंत पत्र बनण्याचा प्रयत्न करा. देवाच्या वचनाबद्दल आदर, आदरयुक्त प्रार्थना, कृपेच्या मिळकतीबद्दल आदर, प्रभूच्या दिवसाबद्दल आदर या बाबतीत उदाहरण व्हा. – शब्द, स्वभाव, परिश्रम, संयम, विश्वास, दान, दयाळूपणा, नम्रता या बाबतीत उदाहरण व्हा. असे समजू नका की तुमची मुले तुम्ही जे करत नाही ते करतील. तुम्ही त्यांचे आदर्श आहात आणि तुम्ही जसे आहात त्याची ते कॉपी करतील. तुमचा युक्तिवाद आणि तुमचे व्याख्यान, तुमच्या सुज्ञ आज्ञा आणि तुमचा चांगला सल्ला; हे सर्व त्यांना समजू शकत नाही, पण ते तुमचे जीवन फार चांगले समजू शकतात.

मुले खूप चांगले निरीक्षक असतात; काही प्रकारचा दांभिकपणा पाहण्यात खूप हुशार, तुम्ही खरोखर काय विचार करता आणि तुम्हाला काय वाटते हे शोधण्यात खूप जलद, तुमचे सर्व मार्ग आणि मते शिकण्यात अति वेगवान. वडील जसे आहेत तसाच मुलगा देखील बनतो.

विजेता राजा सीझर नेहमी युद्धात आपल्या सैनिकांना जे सांगत असे ते लक्षात ठेवा. तो “पुढे जा” असे म्हणत नसे तर “या” किंवा “चला” असे म्हणत असे. तुमच्या मुलांना प्रशिक्षण देताना हीच गोष्ट घडली पाहिजे. तुम्ही तुच्छ मानत असलेल्या सवयी ते क्वचितच शिकतील किंवा जो मार्ग तुम्ही स्वतः अवलंबत नाही असा मार्ग ते क्वचितच अवलंबतील. जो मनुष्य मुलांना उपदेश करतो पण स्वतः प्रत्यक्षात तसे वागत नाही, तो असे काम करत असतो ज्याला पुढे काहीही भविष्य नाही. हे पेनीलोपच्या जुन्या दंतकथेसारखे आहे, जी दिवसभर विणकाम करत असे आणि रात्रभर ते उसवत असे. त्याचप्रमाणे, मुलासमोर चांगले उदाहरण न ठेवता प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणारे पालक एका हाताने बांधतात आणि दुसऱ्या हाताने पाडून टाकतात.

१५. त्यांना पापाची शक्ती सतत लक्षात ठेवण्याचे प्रशिक्षण द्या.

पवित्र शास्त्रानुसार नसलेल्या अपेक्षांपासून तुम्हाला सावध करण्यासाठी मी हे थोडक्यात सांगत आहे. तुम्ही तुमच्या मुलांचे मन एक पांढरा शुभ्र कागद आहे आणि तुम्ही योग्य पद्धत वापरली तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही अशी अपेक्षा करू नका. मी तुम्हाला स्पष्टपणे चेतावणी देतो की तुम्हाला असे काहीही अनुभवास येणार नाही. लहान मुलाच्या हृदयात किती भ्रष्टाचार आणि दुष्टता असते आणि ती किती लवकर फळ देण्यास सुरुवात करतात हे अनुभवणे वेदनादायक आहे. हिंसक स्वभाव, मनमनी, स्वाभिमान, मत्सर, उदासपणा, उत्कटता, आळशीपणा, स्वार्थीपणा, कपट, धूर्तपणा, खोटेपणा, ढोंगीपणा, वाईट गोष्टी शिकण्यातील तत्परता, चांगल्या गोष्टी शिकण्यातील अतिमंदता, कोणतेही ढोंग करण्याची तयारी या सर्व गोष्टी किंवा त्यांपैकी काही गोष्टी आपल्या स्वतःमध्येही पाहण्यास तयार असले पाहिजे. अगदी लहानपणापासूनच या गोष्टी लहानसहान बाबतीत दिसून यायला सुरवात होईल; या गोष्टी किती नैसर्गिकरित्या विकसित होतात हे पाहणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. मुलांना पाप करायला शिकण्यासाठी शालेय शिक्षणाची गरज नसते.

पण तुम्हाला जे दिसते त्यावरून तुम्ही निराश आणि नाउमेद होऊ नका. ही छोटीशी अंतःकरणे पापाने भरलेली असू शकतात ही एक विचित्र आणि असामान्य गोष्ट आहे असे समजू नका. आपला पिता आदाम याने आम्हाला दिलेला हा वारसा आहे; ह्या पतित स्वभावासह आम्ही आमचे जीवन जगत असतो; तो वारसा आपल्या सर्वांनाच मिळालेला आहे. त्याऐवजी तुम्ही खरे तर ही चूक सुधारण्यासाठी देवाच्या आशीर्वादाने बहुधा योग्य वाटणाऱ्या प्रत्येक मार्गाचा परिश्रमपूर्वक वापर करण्यात तत्पर असा. पापाचा हा वारसा लक्षात घेऊन तुमच्या मुलांना मोहांपासून दूर ठेवण्याच्या तुमच्या मनातील उत्कट इच्छेमुळे तुम्ही अधिकाधिक सावधगीरी बाळगली पाहिजे.

कोणी तुम्हाला सांगत असले की तुमची मुले चांगली आहेत, त्यांचे चांगले संगोपन झाले आहे, आणि ती विश्वासार्ह आहेत तर त्यांचे मुळीच ऐकू नका. त्याऐवजी असा विचार करा की त्यांची अंतःकरणे नेहमीच एखाद्या ज्वालाग्राही पदार्थासारखी ज्वलनशील आहेत. सर्व काही उत्तम चाललेले असताना, त्यांच्यातील भ्रष्टाचार प्रज्वलित होण्यासाठी केवळ एका ठिणगीची आवश्यकता आहे. पालक क्वचितच खूप सावध असतात. तुमच्या मुलांची नैसर्गिक विकृती लक्षात ठेवा आणि काळजी घ्या.

१६. त्यांना पवित्र शास्त्रात दिलेली अभिवचने सतत लक्षात ठेवण्याचे प्रशिक्षण द्या.

तुम्ही निराश होऊ नये म्हणून मी हे देखील थोडक्यात सांगतो. तुम्हाला एक अगदी सरळ अभिवचन मिळालेले आहे, “मुलाने ज्या मार्गाने गेले पाहिजे त्यासाठी त्याला शिक्षण दे, म्हणजे वयस्कर झाल्यावर देखील तो त्यापासून दूर जाणार नाही” (नीति. २२:६). असे अभिवचन मिळणे म्हणजे काय याचा विचार करा. अभिवचने ही आशेचा एकमेव दिवा होता ज्याने पवित्र शास्त्र लिहिले जाण्यापूर्वी कुलपितांच्या हृदयाला आनंद दिला. हनोक, नोहा, अब्राहाम, इसहाक, याकोब, योसेफ, – हे सर्वजण अभिवचनांवर जगले आणि त्यांच्या आत्म्यात समृद्ध झाले. अभिवचने ही इतकी सौहार्दपूर्ण आहेत ज्यामुळे प्रत्येक युगात विश्वासणाऱ्यांना आधार दिला आहे आणि त्यांना सामर्थ्यवान बनवले आहे. ज्याच्या बाजूने ही अभिवचने आहेत त्याला कधीही नाउमेद होण्याची गरज नाही. आई-वडिलांनो, जेव्हा तुमची अंतःकरणे निराश होतात आणि तुम्ही हार मानण्यास तयार होता, तेव्हा या अभिवचनांची आठवण करा आणि तुमच्या मनाला समाधान मिळेल.

हे अभिवचन कोण देत आहे याबद्दल विचार करा. खोटे बोलणाऱ्या किंवा पस्तावा करणार्‍या माणसाचे हे अभिवचन नाही; हे राजांच्या राजाचे अभिवचन आहे, जो कधीही बदलत नाही. त्याने एखादी गोष्ट सांगितली, तर तो ती करणार नाही का? किंवा तो बोलला आहे, तर तो ते खरे करून दाखवणार नाही का? त्याच्यासाठी काहीही कठीण नाही. ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. वाचकहो, ज्या अभिवचनावर आपण विचार करत आहोत त्या अभिवचनाचा लाभ तुम्हाला मिळाला नाही तर त्यात दोष तुमचा आहे त्याचा नाही.

तुम्ही त्या अभिवचनापासून सांत्वन घेण्यास नकार देण्याअगोदर, त्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत याचा विचार करा. ते एका विशिष्ट वेळेबद्दल बोलत आहे, जेव्हा चांगल्याप्रकारे दिलेल्या प्रशिक्षणाचे प्रतिफळ मिळेल, – “जेव्हा ते मूल वयस्कर होईल.” यात नक्कीच दिलासा आहे. काळजीपूर्वक दिलेल्या प्रशिक्षणाचे परिणाम आपण कदाचित स्वत:च्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही, पण आपण मेल्यानंतर, त्यातून कोणते आशीर्वादित फळ मिळेल हे आपण सांगू शकत नाही. एकाच वेळी सर्व काही देणे हा देवाची पद्धत नाही. “नंतर” ही अशी वेळ आहे जेव्हा तो अनेकदा निसर्गाच्या गोष्टी आणि कृपेच्या गोष्टी करण्याचे ठरवतो. “नंतर” हा असा काळ आहे ज्यामध्ये छळाद्वारे शांतीचे प्रतिफळ मिळते (इब्री. १२:११). “नंतर” ही अशी वेळ आहे जेव्हा आपल्या पित्याच्या द्राक्षमळ्यात काम करण्यास नकार देणाऱ्या मुलाने पश्चात्ताप केला आणि तो काम करायला गेला (मत्तय. २१:२९). आणि “नंतर” ही अशी वेळ आहे जेव्हा लगेच यश दिसून येत नसताना जे पालक “नंतर” या वेळेची आतुरतेने वाट पाहतात. – तुम्ही आशेने पेरणी केली पाहिजे आणि आशेने रोपण केले पाहिजे.

” आपले अन्न जलाशयावर सोड; आत्मा म्हणतो, ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल. (उपदेशक ११:१). ह्यात काही शंका नाही की, ज्या मुलांनी त्यांचे पालक जिवंत असताना त्यांना पालकांकडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा त्यांच्या जीवनात फायदा झाल्याची कोणतीही चिन्हे दाखवली नव्हती, अशी अनेक मुले, न्यायाच्या दिवशी उठतील आणि पालकांच्या चांगल्या प्रशिक्षणाबद्दल त्यांची प्रशंसा करतील. तेव्हा विश्वासाने पुढे जा आणि तुमचे श्रम पूर्णपणे वाया जाणार नाहीत याची खात्री बाळगा. विधवेच्या मुलाला जिवंत करण्यासाठी एलीयाने तीन वेळा मुलाच्या अंगावर पाखर घातली. त्याच्या उदाहरणावरून शिका आणि धीर धारा.

१७. शेवटी, त्यांना प्रशिक्षित करत असताना तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टी आशीर्वादित व्हाव्यात यासाठी सतत प्रार्थना करा.

परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय, तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नांचा काही उपयोग होणार नाहीत. त्याच्या हातात सर्व माणसांची अंतःकरणे असतात, आणि त्याने त्याच्या आत्म्याने तुमच्या मुलांच्या अंतःकरणाला स्पर्श केला नाही तर, तुम्ही विनाकारण थकून जाल. म्हणून, तुम्ही त्यांच्या मनावर पेरलेल्या बीजाला अखंड प्रार्थनारुपी पाणी घाला. आपण प्रार्थना करण्यासाठी जितके इच्छुक असतो त्यापेक्षा परमेश्वर कितीतरी जास्त ऐकण्यास इच्छुक असतो; आशीर्वाद मागण्यास आपण जितके तयार असतो त्यांच्यापेक्षा परमेश्वर कितीतरी जास्त ते देण्यास तयार असतो; — पण त्यांच्यासाठी विनवणी केलेली त्याला आवडते. आणि तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टींमधील प्रमुख गोष्ट आणि त्या प्रयत्नांना तुमच्या मुलांच्या उत्कर्षाशी जोडणारी गोष्ट म्हणून प्रार्थना ही बाब मी तुमच्या पुढे ठेवत आहे. माझ्या मते ज्या मुलासाठी खूप प्रार्थना केल्या जातात त्याला क्वचितच दूर लोटले जाईल.

याकोबाने त्याच्या मुलांकडे पहिले तसे तुम्ही तुमच्या मुलांकडे पाहा. तो एसावला सांगतो की ते “आपल्या दासावर देवाने कृपा करून दिलेली ही मुले आहेत.” (उत्पत्ति ३३:५). योसेफाने आपल्या मुलांकडे जसे पाहिले तसे तुम्ही तुमच्या मुलांकडे पाहा; त्याने आपल्या वडिलांना सांगितले, ” “हे माझे मुलगे, देवाने मला हे ह्या देशात दिले आहेत.” (उत्पत्ति ४८:९). त्यांना स्तोत्रकर्त्याप्रमाणे परमेश्वराकडून मिळालेला वारसा आणि बक्षीस असे समजा. (स्तोत्र. १२७:३). आणि मग परमेश्वराला, पवित्र धैर्याने, त्याने स्वतः दिलेल्या बक्षीसाबद्दल कृपाळू व कनवाळू होण्यास सांगा. अब्राहामाचे इश्माएलवर प्रेम असल्यामुळे त्याने त्याच्यासाठी देवाकडे मध्यस्थी कशी केली ते पाहा, ” “इश्माएल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले.” (उत्पत्ति १७:१८). मानोहा शमशोनाबद्दल देवदूताशी कसे बोलतो ते पाहा, “आम्ही ह्या मुलाचा जीवनक्रम कसा लावावा आणि आम्ही त्याच्यासाठी काय करावे?” (शास्ते १३:१२). ईयोबने आपल्या मुलांच्या आत्म्यांची काळजी किती प्रेमळपणाने घेतली ते पाहा, “तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलींचे हवन करी; कारण तो म्हणे की, “न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल.” (ईयोब १:५). पालकांनो, तुम्ही जर तुमच्या मुलांवर प्रेम करत असाल तर जा आणि तसेच करा. दयासनासमोर तुम्ही त्यांची नावे सारखीसारखी ठेवू शकत नाही.

आणि आता, वाचकहो, शेवटी, तुम्हाला तुमच्या मुलांना स्वर्गासाठी प्रशिक्षित करायचे असेल, तर तुमच्या अखत्यारीत असलेले प्रत्येक साधन वापरण्याची आवश्यकता आणि महत्त्व, मला तुमच्या मनावर पुन्हा एकदा बिंबवू द्या.

मला माहीत आहे की देव हा सार्वभौम देव आहे आणि तो सर्व काही त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार करतो. मला माहीत आहे की रहबाम हा शलमोनाचा मुलगा होता आणि मनश्शे हिज्कीयाचा मुलगा होता आणि धार्मिक पालकांची मुले नेहमी धार्मिकच असतात असे तुम्हाला दिसून येत नाही. परंतु मला हे देखील माहित आहे की देव विशिष्ठ पद्धतींचा वापर करून कार्य करतो आणि मला खात्री आहे की, जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धती वापरण्यात कुचराई केली तर तुमच्या मुलांचे भले होण्याची शक्यता नाही.

आई-वडीलांनो… तुम्ही त्यांना उत्तमोत्तम शाळांमध्ये पाठवू शकता, आणि त्यांना पवित्र शास्त्र आणि प्रार्थनेची पुस्तके देऊ शकता आणि तुमच्या मनात साठवलेल्या माहितीने त्यांनी मने भरून टाकू शकता: – पण जर त्यासोबतच त्यांना घरी नियमित प्रशिक्षण दिले जात नसेल, तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मला अशी भीती वाटते की शेवटी तुमच्या मुलांच्या आत्म्यांना ते फार कठीण जाईल. घर ही एक अशी जागा आहे जिथे सवयी विकसित केल्या जातात; – घर ही एक अशी जागा आहे जिथे चारित्र्याचा पाया घातला जातो; – घर आपल्या अभिरुची, आवडी आणि मतांना पूर्वग्रह देते. मग पाहा, मी तुम्हाला विनंती करोत की, घरी काळजीपूर्वक प्रशिक्षण द्या. जसे बोल्टनने आपल्या मरणशय्येवर म्हटले, “माझा असा विश्वास आहे की, तुमच्यापैकी एकही जण देवाच्या न्यायासनासमोर नवीन जन्म न झालेल्या स्थितीत मला भेटण्याची हिंमत करणार नाही.” असे म्हणता येणारा मनुष्य खरोखरच खूप सुखी आहे.

आई-वडिलांनो, मी तुम्हाला देव आणि प्रभु येशू ख्रिस्तासमोर वचन देतो की, तुमच्या मुलांना त्यांनी ज्या मार्गाने गेले पाहिजे त्या मार्गासाठी प्रशिक्षित करण्यासाठी आवश्यक ते सर्व कष्ट घ्या. मी तुम्हाला फक्त तुमच्या मुलांच्या आत्म्यासाठी विनंती करत नाही; तुमच्या स्वतःच्या भविष्यातील आराम आणि शांततेसाठी मी तुम्हाला विनंती करतो. खरे तर तसे करण्यात तुमचे हित आहे. खरोखर तुमचे स्वतःचे सुख मोठ्या प्रमाणात यावर अवलंबून आहे. मुले ही धनुष्यासारखी असतात; त्यातून निघालेले सर्वात तीक्ष्ण बाण माणसाचे हृदय छेदतात. माणसाला प्यावे लागलेले सर्वात कडू प्याले मुलांनी मिसळले आहेत. माणसाच्या डोळ्यात आजवरचे सर्वात दुःखद अश्रू मुलांनी आणले आहेत. आदाम तुम्हाला तसे सांगू शकतो; याकोब तुम्हाला तसे सांगू शकतो; दावीद तुम्हाला तसे सांगू शकतो. मुलांनी त्यांच्या पालकांवर जे दुःख आणले आहे, त्यासारखे दुसरे दु:ख पृथ्वीवर नाही. अरेरे! सावध राहा, नाहीतर तुम्ही त्यांच्याकडे केलेले दुर्लक्ष तुमच्या म्हातारपणी तुम्हाला दु:खी करण्यास कारणीभूत होईल. सावध राहा,
नाहीतर, तुमचे डोळे अंधुक झालेले असताना आणि तुमच्या नैसर्गिक शक्ती कमी झालेल्या असताना तुमच्या कृतघ्न मुलाच्या वाईट वागणुकीमुळे तुमच्यावर रडण्याची पाळी येईल.

तुमची मुले तुमचे जीवन पुनर्स्थापित करणारी आणि तुमच्या म्हातारपणाची पोषणकर्ती व्हावीत, – त्यांनी तुमचे आभारी असावे तुम्हाला शिव्याशाप देणारे नसावे, तुम्हाला दुःख देणारे नव्हे तर आनंद देणारे असावे – रऊबेन सारखे नव्हे तर यहूदा सारखे असावेत – अर्पा नव्हे तर रूथ असावीत – तुम्हाला जर नोहाप्रमाणे तुमच्या मुलांच्या कृत्याची लाज वाटू नये असे वाटत असेल आणि रिबेकाप्रमाणे त्यांच्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनाचा कंटाळा येऊ नये असे वाटत असेल तर माझा सल्ला अधूनमधून लक्षात ठेवा, त्यांना प्रशिक्षण द्या.
आणि माझ्याकरिता, हा लेख वाचणार्‍या तुम्हा सर्वांना देवाने आपल्या स्वतःच्या आत्म्याचे मूल्य समजण्यास शिकवावे यासाठी मी सर्वांसाठी देवाकडे प्रार्थना करून माझा लेख संपवतो… बर्याचदा पालक स्वतःबद्दल विचार करत नाहीत आणि त्यामुळे ते त्यांच्या मुलांबद्दलही विचार करत नाहीत. त्यांना निसर्गाची स्थिती आणि कृपेची स्थिती यातील प्रचंड फरक कळत नाही आणि म्हणूनच आपल्या मुलांना एकटे सोडण्यात ते समाधानी राहतात.

पाप ही घृणास्पद गोष्ट आहे, आणि ती देवाला आवडत नाही हे प्रभू तुम्हाला शिकवो. तेव्हा, मला माहित आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या पापांबद्दल शोक कराल आणि त्यांना अग्नीतील कोलीताप्रमाणे बाहेर काढण्याचा प्रयत्न कराल.

ख्रिस्त किती मौल्यवान आहे आणि त्याने आपल्या तारणासाठी किती महत्कृत्ये करून ते कार्य पूर्ण केले आहे हे परमेश्वर तुम्हा सर्वांना शिकवो. तेव्हा, मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या मुलांना येशूकडे आणण्यासाठी सर्व मार्ग अवलंबाल, यासाठी की त्यांनी त्याच्याद्वारे जगावे. तुमच्या आत्म्याचे नवीकरण, पवित्रीकरण, संजीवन करण्यासाठी तुम्हाला असलेल्या पवित्र आत्म्याच्या गरजेबद्दल प्रभू तुम्हा सर्वांना शिकवो….

प्रभुने हे तुम्हाला द्यावे आणि मग मला आशा आहे की तुम्ही खरोखरच तुमच्या मुलांना चांगले प्रशिक्षण द्याल, – ह्या जीवनासाठी, आणि पुढील जीवनासाठी त्यांना चांगले प्रशिक्षण द्या; पृथ्वीसाठी चांगले प्रशिक्षण द्या आणि स्वर्गासाठी चांगले प्रशिक्षण द्या; त्यांना देवासाठी, ख्रिस्तासाठी आणि अनंतकाळासाठी प्रशिक्षण द्या.

J. C. Royal
J. C. Royal