अमेरिकन लोक लोकशाही प्रजासत्ताक देशात वाढलेले असल्याने, ते “एक व्यक्ती, एक मत” ह्या तत्त्वाला दृढपणे चिकटून राहतात. तारणाच्या शिकवणीविषयी त्यांच्या समजुतीला हे तत्त्व लागू करणे खूप सोपे (आणि जवळजवळ नैसर्गिक) आहे. देवाने प्रत्येकाला स्वर्गात जाण्याची संधी दिली पाहिजे असे गृहीत धरणे सोपे आहे आणि जर लोकांनी देवाच्या कृपेच्या प्रस्तावाला नकार दिला तर लोक देवाचे कृपेचे दान नाकारून स्वतःला नरकात पाठवतात. लोकशाहीच्या पूर्वकल्पनांबाबत ही गोष्ट अगदी पूर्णपणे लागू होतो कारण राजकीय क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा जीवनक्रम ठरवण्याचा अधिकार आणि क्षमता असल्याचे गृहीत धरले जाते. आणि जर हे अमेरिकन राजकीय जीवनात खरे असेल, तर ते पापाच्या तारणाच्या बाबतीतही खरे असले पाहिजे. बरोबर? अजिबात नाही. पवित्र शास्त्र आपल्याला अशा चित्ताकर्षक शब्दांत पापापासून मानवजातीची सुटका होईल अशी समज करून घेऊ देत नाही.


आदामाच्या पापामुळे, आपण सर्व स्वभावाने आणि निवडीनुसार पापी आहोत आणि एदेन बागेत आदामाने केलेल्या बंडाच्या कृत्यामुळे आपण दोषी ठरलो आहोत. पवित्र शास्त्र ह्या स्थितीला पापात मेलेले आहे असे म्हणते (इफिस. २:१), ह्याचा अर्थ आपण स्वतःला वाचवण्यासाठी काही करू इच्छित नाही आणि करू शकत नाही. आपण देवाच्या दिशेने ती पहिली पावले उचलू शकतो असा काही ख्रिस्ती लोकांचा गैरसमज असला तरी, आपण पापात मेलेले असल्यामुळे आपल्याला ते शक्य नाही. (योहान ६:४४). सर्वसाधारणपणे ख्रिस्ती लोक देवाच्या कृपेचे अस्पष्ट, तपशीलवार नसलेल्या आणि उपचारात्मक शब्दांत वर्णन करतात, उदाहरणार्थ, “कृपा ही एक औषधासारखी आहे जे आपण घेण्यास तयार असलो तर, ते आपल्याला ख्रिस्ताकडे येण्यास सक्षम करते” किंवा “कृपा ही एक जीवनी चक्र आहे ज्याला आपण लटकून राहिले पाहिजे, नाहीतर आपण आपल्या पापांमध्ये बुडून जाऊ.”


आपण आध्यात्मिकरित्या आजारी आहोत, आपल्या पापामुळे काहीसे बिघडलो आहोत किंवा आपण नैतिकदृष्ट्या कमकुवत आहोत ही आपली समस्या नाही. ती त्यापेक्षाही खूप वाईट आहे. पवित्र शास्त्र म्हणते की आपण पापात मेलेले आहोत. मृत लोक देवाकडे येत नाहीत, आणि खरोखर येऊही शकत नाहीत. आपण पापात मेलेले असताना देवाने आपल्याकडे आले पाहिजे आणि आपल्याला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले पाहिजे (हा संदर्भ पाहा: इफिस. २:१-१०). ह्यामध्येच आपल्याला देवाच्या तारणाच्या कृपेचे मर्म सापडते. आपले तारण होण्यासाठी जेव्हा आपण अगदी अयोग्य असतो आणि आपल्या दुर्दशेबद्दल काहीही करण्यास पूर्णपणे अक्षम असतो, तेव्हा देव आपल्या पांपासून आपली सुटका करण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करतो. लोकशाहीच्या पूर्वकल्पना पाप आणि कृपेच्या बाबतीत अजिबात लागू होत नाहीत. मानवजातीची दुर्दशा आणि देवाची सार्वभौम कृपा ही श्रेणी येथे योग्य आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत देवाने आपले तारण केले पाहिजे कारण आपण स्वतःचे तारण करण्यासाठी काहीही करू शकत नाही.


आपल्यापैकी कोणीही सध्या आपल्या पापांपासून आपले तारण होण्यासाठी जर येशूवर विश्वास ठेवत असेल तर त्याचे एकमेव कारण म्हणजे देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी येशू ख्रिस्तामध्ये आपले तारण करण्याची निवड केली आहे. (इफिस. १:४). पवित्र शास्त्र म्हणते की देवाने त्याच्या स्वत:च्या सार्वभौम आनंदाप्रीत्यर्थ आणि हेतूनुसार तसे केले आहे – दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, केवळ त्याला माहित असलेल्या कारणांसत्व, मात्र देवाच्या पवित्रतेशी आणि नीतिमत्वाशी पूर्णपणे सुसंगत. अगदी ह्याच विषयाला संबोधित करताना, पौल अगदी निश्चित शब्दात लिहितो की, “त्याने (देवाने) आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या (ख्रिस्ताच्या) रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे. (इफिस. १: ५-७). देव आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये निवडतो, आणि तो केवळ त्याला माहित असलेल्या कारणांसाठी तसे करतो. पण तरीही तो आपल्याला निवडतो.


येथे गंभीर मुद्दा असा आहे की जोपर्यंत देव आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये तारण्याची निवड करत नाही, तोपर्यंत आपल्यापैकी कोणाचेही तारण होणार नाही! जसा सर्वसाधारणपणे वाद केला जातो तसे देव भविष्यकाळात कोण ख्रिस्तावर विश्वास ठेवेल आणि कोण ठेवणार नाही हे पाहत नाही. जर तसे झाले असते, तर देवाची निवड ही मानवी कृतीला (ख्रिस्ताला स्वीकारण्याचा निर्णय) प्रतिसाद दिल्यासारखी झाली असती, आणि पापात मेलेले लोक ती कृती करू शकत नाहीत. जे निवडले गेले नाहीत त्यांना देवाच्या शापाखाली आणि न्याय्य दोषारोपाखाली, आदामामध्ये त्यांच्या मूळ स्थितीत सोडले जाते. ज्यांना निवडले नाही त्यांना अन्यायकारक वागणूक दिली जाते असे नाही. उलट, त्यांच्याशी ख्रिस्तामधील देवाच्या तारणाऱ्या दयेनुसार नव्हे, तर दैवी न्यायानुसार वागले जाईल. जे निवडले गेले नाहीत त्यांना ते खरोखर ज्याला पात्र आहेत ते मिळेल. देवाने आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले नसते, तर आपल्याला देखील ज्याला आपण पात्र आहोत ते मिळाले असते.


पवित्र शास्त्र अगदी स्पष्टपणे सांगते की देवाची निवड ही देवाच्या इच्छेवर आणि उद्देशावर आधारित आहे, ही निवड “ख्रिस्तात” आहे (म्हणजे, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते सर्व ख्रिस्तामध्ये निवडले गेले आहेत), आणि देव येशूची नितीमत्ता त्यांना प्रदान करतो. ज्यांना देवाने निवडले आहे त्यांना पापाच्या अपराधापासून आणि प्रभावापासून वाचवण्यासाठी ख्रिस्त (त्याच्या दुःखसहनाद्वारे आणि आज्ञाधारकपणाद्वारे). देव ज्यांना तारणासाठी निवडतो ते येशू ख्रिस्ताच्या तारणाच्या कार्याद्वारे तारले जातील, येशू ख्रिस्ताचे हे तारणाचे कार्य पवित्र आत्म्यामध्ये आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्याला लागू केले जाते. इथेच आपल्याला सोला ग्रेशिया (केवळ कृपेने) चा अर्थ सापडतो.
देवाने त्याच्या बहुमोल प्रीतीने, आपल्या पापाच्या अपराधापासून आणि प्रभावापासून आपल्याला सोडवण्यासाठी येशू ख्रिस्तामध्ये जगाच्या स्थापनेपूर्वी निवडले आहे.

Used with permission from www.monergism.com

For English- Basics of the Reformed Faith (eBook) | Monergism

Donate to our cause- Give – Jeevant Asha Resource

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.