नीतिमान ठरवले जाणे

सुधारित ख्रिस्ती लोक संकोच न करता ह्या गोष्टीला पुष्टी देतात की, नीतिमान ठरवले जाण्याविषयीची शिकवण ही विश्वासांगीकारातील एक असे कलम आहे ज्याद्वारे मंडळी उभी राहते किंवा पतन पावते. ह्या नेहमी उल्लेख केल्या जाणाऱ्या टिप्पणीचे श्रेय जरी मार्टिन ल्यूथर ह्यांना दिले जात असले, तरी प्रत्यक्षात ते सुधारित ईश्वरविज्ञानशास्त्रज्ञ जे.एच. अल्स्टेड (१५८८-१६३८) ह्यांचे आहे, ज्यांनी हे शब्द प्रथम कागदावर उतरवले- त्यात मार्टिन ल्यूथर ह्यांचा प्रतिध्वनी होता ह्यात शंका नाही.
केवळ कृपेने, केवळ विश्वासाद्वारे, केवळ ख्रिस्तामुळे नीतिमान ठरवले जाण्याची शिकवण इतकी महत्त्वाची आहे कारण तिचे शुभवर्तमानाशी आणि येशू ख्रिस्ताच्या तारणाच्या कार्याशी अगदी जवळचे नाते आहे. आपण पापी असताना देवासमोर कसे नीतिमान घोषित केले गेले आहोत हे जर आपल्याला समजले नाही (ज्याचा अर्थ “नीतिमान ठरवले जाणे” असा आहे), तर आपला शुभवर्तमानाबद्दल गैरसमज तर होणारच आहे – आणि त्यामुळे आपले स्वतःचे नीतिमत्व पुरेसे आहे असे समजून आपण देवासमोर उभे राहण्याचा धोकाही पत्करणार आहोत – इतकेच नव्हे तर ही शिकवण आपल्याला देऊ करत असलेल्या सुंदर आशेपासून आपण वंचित राहणार आहोत.
चांगली बातमी ही आहे की नीतिमान पापी ह्या नात्याने – आमचे पाप ख्रिस्ताकडे गणले गेले आहे, आणि ख्रिस्ताचे नीतिमत्व आमच्याकडे गणले गेले आहे (रोम. ५:१२, १८-१९) – आमच्याकडे आता कल्पना करता येणार नाही अशी सर्वात मोठी देणगी आहे, भीती, दहशत आणि आशंकेपासून मुक्त असे मन (२ तीमथ्य. ४:१८). आपल्या पापांची क्षमा झाली आहे आणि देव आपल्यावर जितका प्रसन्न आहे तितकाच तो आपल्या प्रिय पुत्रावरही प्रसन्न आहे ही जाणीव (२ करिंथि. ५:२१), केवळ आपले मन शांत करून त्यात एक आनंदी भावना उत्पन्न तर करतेच शिवाय देवासमोर एक कृतज्ञतेचे जीवन जगण्यासाठी शक्तिशाली प्रेरणा देखील देते. (२ करिंथ. १:३-७). वास्तविक पाहता, ही शिकवण समजून घेणे हाच एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे आपण सर्व गौरव देवाला देऊ शकतो आणि त्याचे आभार मानू शकतो, जे आपल्या नीतिमान ठरवले जाण्यामागचे अंतिम ध्येय आहे.
येथे आपण आपल्या मनात पूर्णपणे स्पष्ट असणे आवश्यक आहे – आपण चांगल्या कृतींनी नीतिमान ठरवले गेलो आहोत – पण लक्षात घ्या, आपल्या चांगल्या कर्मांनी नव्हे, तर येशू ख्रिस्ताच्या चांगल्या कार्यामुळे, जे त्याच्या बलिदानाच्या मृत्यूप्रमाणेच आमच्यासाठी आणि आमच्या ऐवजी केले गेले आहे. ख्रिस्त आपल्या पापांसाठीच तर मरण पावलाच, शिवाय देवाच्या आज्ञांचे पूर्ण पालन करणाऱ्या त्याच्या जीवनाद्वारे त्याने सर्व नीतिमत्व पूर्ण केले (रोम. ५:१८-१९). फिलिप्पै. ३:४-११ मध्ये, पौल ख्रिस्ताच्या ह्या नीतिमत्तेबद्दल बोलतो जी विश्वासाद्वारे देवाकडून मिळते. “तरी देहावरही भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसर्‍या कोणाला देहावर भरवसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकांतला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रदृष्टीने परूशी; आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे; इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा, आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे. हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी; म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे.”
आपल्या पापाचे लांच्छन ख्रिस्ताला लावले जाते किंवा आपले पाप ख्रिस्ताकडे गणले जाते किंवा आपले पाप ख्रिस्ताच्या खाती जमा केले जाते आणि त्याची नीतिमत्ता आपल्याकडे गणली जाते हे कसे? असे केवळ विश्वासाद्वारे घडते आणि आपली सर्व कामे पापाने दुषित झालेली आणि नेहमीच पापी हेतूने केलेली असल्यामुळे आम्ही जे काही केले आहे किंवा करू शकतो त्याच्या आधारे आपल्याला नीतिमान ठरवले जाऊ शकत नाही. विश्वास हे एक असे साधन आहे जे आपल्याला ख्रिस्ताशी जोडते आणि त्या करवी त्याचे नीतिमत्व आपल्याला दिले जाते. गलती. ३:२३-२६ मध्ये, पौल म्हणतो “हा जो विश्वास प्रकट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेवले होते. ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात.”
विश्वास हे एक कार्य नाही जे देव आपल्याकडून अपेक्षित करतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.. विश्वास ही अशी गोष्ट नाही जी देव आपल्या अंतःकरणात पाहतो आणि नंतर “नीतिमान ठरवला गेलेला” असा दर्जा आपल्याला बहाल करतो – हा एक असा दृष्टीकोन आहे जो संपूर्ण अमेरिकन सुवार्तावादी ख्रिस्ती लोकांमध्ये व्यापकपणे जोपासला जातो. याउलट, जे. आय. पॅकर जी उपयुक्त गोष्ट सांगतात ती म्हणजे, विश्वास हा “एक विनियोगाचे साधन आहे, ख्रिस्तामध्ये देवाच्या नीतिमत्तेची मोफत देणगी प्राप्त करण्यासाठी पसरलेला रिकामा हात.” पौल रोम. ४:४-५ मध्ये लिहित असताना अगदी तंतोतंत शब्दांत सांगतो की, “आता जो काम करतो त्याची मजुरी मेहेरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणार्‍यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास नीतिमत्त्व असा गणण्यात येतो.”
पवित्र शास्त्र ह्या बाबतीती स्पष्ट आहे की विश्वास आपल्याला ख्रिस्ताशी जोडतो, आणि ख्रिस्ताला आपल्याला जे काही द्यायचे आहे ते त्याच्यावरील विश्वासाने आपल्याला मिळते – म्हणजे त्याच्या मृत्यूमुळे पूर्ण झालेल्या पापाची क्षमा आणि त्याच्या आज्ञाधारकतेवर आधारित नीतिमत्तेची देणगी. येशूवरील विश्वासाने, आपले पाप त्याच्यावर लावले जाते जेणेकरून तो ह्या पापांची किंमत वधस्तंभावर भरतो आणि त्याच विश्वासाने त्याचे नीतिमत्व (त्याची गुणवत्ता आणि पवित्र कार्ये) आपली होते. आपण जेव्हा केवळ कृपेने, केवळ विश्वासाने, केवळ ख्रिस्तामुळे नीतिमान ठरवले गेल्या बद्दल बोलतो तेव्हा आपल्याला हेच म्हणायचे असते. हे शुभवर्तमान आहे! देव नियमशास्त्रानुसार आपल्याकडून जी मागणी करतो ती ख्रिस्तामध्ये मुक्तहस्ते देतो. रोम. ३:२१-२६ मध्ये, पौल हाच मुद्दा मांडत आहे. “आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्त्व ते प्रकट झाले आहे; त्याला नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे; हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे; म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्‍याला नीतिमान ठरवणारे असावे.”
आपण ह्या महान शिकवणीबद्दल जर स्पष्ट नसलो, तर आपल्याला आपल्या तारणाची खात्री नाही, ख्रिस्ती जीवन जगण्याचा कोणताही पाया आपल्याकडे नाही आणि आपल्या सभोवतालच्या अविश्वासू जगाला प्रचार करण्यासाठी आपल्याकडे कोणतीही सुवार्ता नाही. ह्या शिकवणीशिवाय, आमची मंडळी ही एक पतित मंडळी आहे.

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.