जेव्हा ख्रिस्ती लोक “ऑर्डो सॅल्युटिस” बद्दल बोलतात तेव्हा ते “तारणाचा क्रम” ह्या संदर्भात बोलत असतात. अशा “क्रमा” बद्दलच्या कोणत्याही चर्चेला आपण अशी पुष्टी देऊन पात्र ठरवले पाहिजे की सर्वज्ञ देवाला आपल्याप्रमाणे क्रमाक्रमाने गोष्टी करण्याची आवश्यकता नाही, तरीही देव आपल्याला पाप आणि त्याच्या परिणामांपासून वाचवण्याचा जो मार्ग अवलंबतो त्याला एक तर्कसांगत क्रम आहे. आपले वर्णन “पापामध्ये मृत झालेले” (इफिस 2:1-5) असे केले गेले असल्याने आणि आपल्या भयंकर परिस्थितीतून स्वतःला वाचवण्यासाठी आपण काहीही करू शकत नसल्याने (योहान ६:४४), आपण अजूनही “मृत” असताना आम्हाला आमच्या पापांपासून वाचवण्यासाठी देवाने आपल्यासाठी काहीतरी केले पाहिजे. ऑर्डो सॅल्युटिस म्हणजे देव आपल्याला वाचवण्यासाठी कोणती पावले उचलतो आणि तो कोणत्या तर्कसंगत क्रमाने ती पावले उचलतो हे समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे.
ही एक काल्पनिक संकल्पना नाही कारण पवित्र शास्त्र स्वतःच आपले तारण देव-नियोजीत क्रमानुसार आपल्यासाठी पूर्ण होत असल्याचे सांगते. ह्या शास्त्रभागांपैकी पहिला शास्त्रभाग ज्याला “सुवर्ण साखळी” म्हटले जाते तो आपल्याला रोम. ८:२८-३० ह्या वचनांमध्ये आढळतो. ह्या शास्त्रभागात पौल लिहितो, “परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले; आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला.”
तारणाची “सुवर्ण साखळी” असे ह्या शास्त्रभागाचे वर्णन केले गेले आहे कारण पौल केवळ एका अटूट क्रमाबद्दल बोलत आहे असे नाही, असा क्रम ज्याद्वारे देव आपले तारण करतो (साखळी), परंतु प्रेषित पौल ह्याबाबतीत स्पष्ट आहे की आपले तारण हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्याने आपल्या तारणाची प्रक्रिया सुरू केली आहे अशा एका कृपाळू आणि सार्वभौम देवाचे कार्य आहे आणि त्याला त्या प्रक्रियेचा शेवट (“सोने”) देखील दिसतो. ह्याचा अर्थ असा होत नाही की देवाने निवडलेल्यांपैकी काहींना शेवटी नाकारले जाईल, किंवा पापी मनुष्यामध्ये काहीतरी चांगले आहे ज्यामुळे देवाला त्याच्यावर दया करण्यास आणि नंतर त्याच्या वतीने कृती करण्यास प्रवृत्त करते.
पौल जरी त्याच्या वाचकाला आठवण करून देत असला की सर्व गोष्टींमधून शेवटी चांगले घडवण्याचे सामर्थ्य देवाकडे आहे (व. २८), तरी तो लगेच पुढे असे म्हणतो की हे केवळ त्यांनाच लागू होते जे देवाच्या उद्देशाने बोलावलेले आहेत. म्हणून, जेव्हा आपल्याला सुवार्ता सांगितली जाते, तेव्हा देव प्रभावीपणे त्याच्या निवडलेल्यांना येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास पाचारण करतो. आणि त्या पाचारणामध्ये अनेक महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे (म्हणजे ऑर्डो सॅल्युटिसचा किंवा तारणाच्या क्रमाचा).
पौल देवाने ज्यांना पूर्वनियोजित केले आहे त्यांच्याबद्दल बोलत आहे. काही लोकांनी चुकून ह्याचा अर्थ असा घेतला आहे की देव भविष्यकाळात पाहतो आणि नंतर अशा लोकांना तारणासाठी निवडतो ज्यांना सुवार्ता सांगितली गेल्यावर ते विश्वास ठेवतील हे त्याला अगोदरच दिसून येते. परंतु हे खरे नाही, कारण पौलाने आपल्याला आधीच सांगितले आहे की काही लोकांना तारणासाठी पाचारण करणे हे पूर्वनिश्चित विश्वासावर आधारित नसून देवाच्या उद्देशांवर आधारित आहे (व. २८). शिवाय, पूर्वज्ञानाचा अर्थ केवळ असा नाही की आपण काय करणार आहोत हे देवाला आधीच माहीत आहे, तर त्याचा अर्थ असा होतो की स्तोत्र १३९ मध्ये चित्रित केलेल्या पूर्ण अर्थाने देव आपल्याला एक व्यक्ती म्हणून ओळखतो – जिथे असे म्हटले आहे की आपण विचार करण्याआधीच देवाला आपले विचार कळतात कारण त्यानेच आम्हाला आमच्या आईच्या उदरात घडवले आहे.
पौलाच्या म्हणण्यानुसार, देव ज्यांना आधीपासून जाणतो त्या सर्वांना तो पूर्वनिश्चित करतो. पूर्वनिश्चित करणे म्हणजे एका विशिष्ट हेतूने निवड करणे – ख्रिस्ताच्या प्रतिमेशी सुसंगत होण्यासाठी (साखळीतील अंतिम कडीमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, गौरवीलेले). ज्यांना आधीपासून जाणले आहे ते पूर्वनिश्चित केलेले आहेत आणि जे पूर्वनिश्चित केलेले आहेत ते पाचारण झालेले आहेत. जेव्हा सुवार्तेचा प्रचार केला जातो तेव्हा पाचारण होते आणि देवाचे निवडलेले संदेशाला विश्वासाने प्रतिसाद देतात. ज्यांना सुवार्तेच्या प्रचाराद्वारे पाचारण केले जाते ते नीतिमान ठरवले जातात. नीतिमान ठरवले जाणे घडते कारण ख्रिस्ताचे नीतिमत्व विश्वासाच्या माध्यमातून पाचारण झालेल्यांना लागू केले जाते आणि ख्रिस्ताच्या नीतिमत्वामुळे आपण देवासमोर नीतिमान ठरवले जातो.
साखळीतील अंतिम कडी ही आहे की ज्यांना आधीपासून जाणले आहे, पूर्वनिश्चित केले आहे, पाचारण केले आहे आणि नीतिमान ठरवले आहे, ते शेवटी गौरवीले जातात. म्हणजे, ज्या दिवशी ख्रिस्तात मेलेले उठवले जातात त्या दिवशी आपण पापाच्या प्रभावापासून पूर्णपणे पुनःस्थापित केले जातो. पौलाचा मुद्दा हा आहे की देव आपल्या तारणाची सुरुवात करतो आणि ते पूर्ण होईल ह्याची खात्री करून घेतो.
आणखी एका शास्त्रभागात, पौल तारणाचा असाच एक “क्रम” मांडतो (१ करिंथ. ६:११), जेव्हा तो लिहितो, “तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात.” जरी काही विशिष्ट घटक रोम. ८:८:२८-३० मधील क्रमापेक्षा वेगळ्या क्रमाने आलेले असले तरी, सामान्य कल्पना एकच आहे. एक तर, पौलाने येथे वापरलेली सर्व क्रियापदे (ग्रीक ऑरिस्ट काळात म्हणजे एखादी कृती पूर्ण झाली, चालू आहे किंवा तिची पुनरावृत्ती झाली आहे हे न दर्शवता) हे सूचित करतात की ह्यातील प्रत्येक घटक आधीच पूर्ण झालेली क्रिया आहे. आणि रोम. ८:२८-३० प्रमाणे, देव आपल्यासाठी ह्या गोष्टी पूर्ण करतो. आमच्या वतीने त्याचे तारणाचे कार्य अगोदरच पूर्ण झाले आहे. ख्रिस्तामध्ये असलेले सर्वजण धुतलेले आहेत, पवित्र आहेत, नीतिमान आहेत.
धुतलेले म्हणजे नवा जन्म झालेले, देवाची अशी कृती ज्याद्वारे आपल्याला नवीन जीवन दिले जाते आणि पापाच्या अपराधापासून शुद्ध केले जाते आणि आपल्यावरील पापाचा प्रभाव नष्ट केला जातो. जे सर्व “धुतलेले” आहेत त्यांचे पवित्रीकरण देखील झालेले आहे. म्हणजेच, देवाच्या आत्म्याने नवा जन्म पावलेले आता देवाच्या पवित्र हेतूंसाठी वेगळे केले गेले आहेत आणि त्यांच्यामध्ये पापाला मरण्याची आणि जीवनाचे नवीकरण (पवित्रीकरण) होत जाण्याची जीवनभरची प्रक्रिया सुरू होते. जे देवाने त्याच्या स्वतःच्या पवित्र हेतूंसाठी वेगळे केलेले आहेत ते नीतिमान देखील ठरवलेले आहेत – म्हणजे जेव्हा आपला नवा जन्म होतो, तेव्हा आपण जिवंत होतो आणि आपण आपला विश्वास येशू ख्रिस्तावर ठेवतो. जेव्हा आपण आपला विश्वास (श्रद्धा) ख्रिस्तावर ठेवतो, तेव्हा ख्रिस्ताची नीतिमत्ता आपल्याकडे गणली जाते किंवा आपल्याला दिली जाते, त्यामुळे आपल्याला देवासमोर नीतिमान घोषित केले जाते.
पौल लाभांची ही विशिष्ट यादी आम्हाला असे सांगून संपवतो की हे सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण केले आहे, जो आम्हाला येशू ख्रिस्ताचे तारणाचे कार्य लागू करतो.
पवित्र शास्त्र अगदी स्पष्टपणे शिकवते की सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आपले तारण हे देवाचे कार्य आहे, आणि ते येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी पूर्ण केले आहे ही गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर ठेवण्याचा ऑर्डो सॅल्युटिस किंवा तारणाचा क्रम हा एक अतिशय उपयुक्त मार्ग आहे. आपण हे देखील पाहतो की मधूनच बंद करण्यासाठी देव प्रक्रिया सुरू करत नाही. ज्या सर्वांना अगोदर जाणण्यात आले आहे (रोम. ८:२८-३० मध्ये) ते सर्व गौरवले जातात, आणि जे सर्व धुतलेले आहेत (१ करिंथ. ६:११ मध्ये), ते सर्व नीतिमान ठरवले जातात. आपले तारण खरोखर प्रभूपासून आहे, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत.

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.