येशूचे दुसरे येणे

आपल्या पतित मानवजातीच्या तारणाचा पवित्र शास्त्रात दिलेला अहवाल तारणाच्या संपूर्ण इतिहासात अनेक वळणे घेतो. पण आपण जेव्हा गोष्टीच्या शेवटच्या अध्यायात येतो तेव्हा त्या गोष्टीचा गौरवी हेतू स्पष्ट होतो. खरोखर असा एक दिवस येत आहे, ज्या दिवशी सर्व अन्याय दूर केले जातील, सर्व मानवी दुःख संपेल आणि आपल्या डोळ्यातले सर्व अश्रू पुसले जातील. भविष्याकरता नव्या करारात दिलेली महान आशा ही आहे की एके दिवशी आपला धन्य प्रभु येशू अचानक स्वर्गातून पृथ्वीवर परत येईल आणि मेलेल्यांना उठवेल, सर्व स्त्री-पुरुषांचा न्याय करेल आणि मानवी पापाच्या सर्व खुणा पुसून टाकून स्वर्ग आणि पृथ्वीचे नवीकरण करेल. प्रकटी. २१:३-४ मध्ये, योहान आपल्याला आठवण करून देतो की प्रभूचे पुनरागमन हे देवाच्या कृपेच्या कराराच्या अभिवचनाचा कळस आहे: “आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्याच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट हे नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” हाच तो गौरवशाली दिवस आहे ज्याची प्रत्येक विश्वासणारा वाट पाहत आहे – ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याचा दिवस.
मात्र, जे ख्रिस्ताला ओळखत नाहीत त्यांच्यासाठी प्रभूचे दुसरे येणे हा भयभीत करणारा दिवस आहे. तो सर्वात भयानक दिवस असेल ज्याची कल्पना करता येणार नाहील. प्रकटी. ६:१५-१७ मध्ये, योहान देवाचा क्रोध प्रकट होण्यासंदर्भात ह्या दिवसाचे वर्णन करतो: “पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, गुहांमध्ये व डोंगरांतील खडकांतून लपली; आणि ते डोंगरांना व खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या दृष्टीपुढून व कोकर्‍याच्या क्रोधापासून आम्हांला लपवा. कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?” जे ख्रिस्ताचे नाहीत, जे कोकऱ्याच्या रक्ताने धुतलेले नाहीत, किंवा त्यांनी त्याचे नीतिमत्व परिधान केलेले नाही, त्यांना न्यायाच्या दिवशी देवाच्या क्रोधाच्या पूर्ण क्रूरतेचा सामना करावा लागेल.
पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते की जेव्हा येशू काळाच्या शेवटी परत येईल तेव्हा एकाच वेळी तीन वेगवेगळ्या पण संबंधित घटना घडतील. पहिली घटना म्हणजे मृतांचे पुनरुत्थान (दानिएल १२:१-४; यशया २५:६-९) – ह्यात जे ख्रिस्तासोबत सदैव आशीर्वादित जीवन जगतील (१ थेस्सलनी. ४:१३-५:११; १ करिंथ. १५:१२-५८), आणि जे सार्वकालिक न्यायात प्रवेश करतील (२ थेस्सलनी. १:६, ८-९; प्रकटी. २०:११-१४). दुसरी घटना मृतांच्या पुनरुत्थानाशी जवळून संबंधित आहे आणि हा विश्वासणारे आणि अविश्वासणारे ह्यांचा अंतिम न्याय असेल (मत्तय १३:३६-४३; २५:३१-४६). तिसरी घटना म्हणजे नवा स्वर्ग आणि नव्या पृथ्वीची निर्मिती (रोम. ८:२१; २ पेत्र. ३:१०).
जुन्या करारातील संदेष्ट्यांनी अशी भविष्यवाणी केली होती की मेलेले सर्व लोक जेव्हा एकाच वेळी मेलेल्यातून उठवले जातील, तेव्हा मानवी इतिहासाचा शेवट होईल. दानिएल १२:२ मध्ये, संदेष्टा असे घोषित करतो की, “भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.” यशया ह्या दिवसाबद्दल एक महान मशीहाविषयक मेजवानीच्या संदर्भात बोलतो (यशया २५:६-९). देव “सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना अच्छादून टाकणारे आच्छादन, तो ह्या डोंगरावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो; देव परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसतो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे.” ह्या शास्त्रभागाच्या पार्श्वभूमीवर, पौल करिंथकरांना देहाच्या पुनरुत्थानाच्या स्वरुपाची आणि आशेविषयी लिहितो (१ करिंथ. १५:५०-५५). “बंधूंजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पाहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा “मरण विजयात गिळले गेले आहे” असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?”
अनेक शास्त्रभागांवरून हे स्पष्ट होते की जेव्हा येशू परत येईल तेव्हा अंतिम न्याय होईल. थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या त्याच्या दुसऱ्या पत्रात, पौल लिहितो की “तुमच्यावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हाला आमच्याबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, कारण प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल; तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. आपल्या पवित्र जणांच्या ठाई गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे . तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. (२ थेस्सलनी. १:६-९). मत्तय १३:३९ब -४३ मध्ये, निंदणांच्या दृष्टान्ताचे स्पष्टीकरण देताना, येशू घोषित करतो, “कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळवणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना’ त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा ‘नीतिमान’ आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.”जेव्हा आपला प्रभु परत येईल व त्या वेळी मृतांना उठवले जाईल तेव्हा न्याय होईल.
पण ह्या वेळी आणखी एक नाट्यमय घटना घडणार आहे. २ पेत्र ३ मध्ये, आपण वाचतो, “स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करत येऊन म्हणतील, “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.” कारण ते हे बुद्धीपुरस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी ही पृथ्वी झाली; त्याच्या योगे तेव्हाच जगाचा पाण्याने बुडून नाश झाला; पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तीहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवली आहेत. तरी, प्रियजनहो, ही गोष्ट तुम्ही विसरू नका की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टीतत्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.” प्रेषित पेत्राच्या मते, जेव्हा येशू परत येईल तेव्हा नैसर्गिक सृष्टीमध्ये आमूलाग्र बदल होतील आणि मानवी पापाच्या सर्व खुणा पृथ्वीवरून पुसल्या जातील. मृतांना उठवले जाईल, सर्वांचा न्याय केला जाईल आणि निर्मितीचे नवीकरण केले जाईल.
म्हणून, जेव्हा येशू शेवटच्या दिवशी परत येईल, तेव्हा तो मृतांना उठवेल, जगाचा न्याय करेल आणि सर्व गोष्टी नवीन करेल – तीन वेगळ्या परंतु संबंधित घटना ह्या सर्व एकाच वेळी घडतील. म्हणूनच प्रेषितीय मंडळीने ह्या आशीर्वादाने एकमेकांचे सांत्वन केले, “माराना था” (“आमच्या प्रभु ये” – १ करिंथ. १६:२२) तसेच आपल्या प्रभूने त्याच्या लोकांना दिलेल्या सांत्वनदायक शब्दांमध्ये अभिवचनासह “आपली डोकी वर करा,; कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे” (लूक २१:२८).

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.