नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी

लोक जेव्हा स्वर्गाबद्दल बोलतात, तेव्हा ते सहसा त्यांच्या आवडत्या ठिकाणांच्या प्रतिमा वापरतात (उदा. समुद्रकिनारा, किंवा योसेमटी दरी), किंवा ते अशा प्रकारच्या शरीराशिवाय असलेल्या अस्तित्वाविषयी वर्णन करतात जिथे त्यांचा अमर आत्मा शेवटी मानवी शरीराच्या मर्यादांपासून मुक्त होईल. मी अनेक लोकांना स्वर्गाविषयी असे बोलताना ऐकले आहे, जे खरे तर आपण असे बोलू नये हे समजण्याइतके शहाणे किंवा सभ्य असायला हवेत, की स्वर्ग एक मोत्याचे दरवाजे (जेथे स्वत: संत पेत्र उभा आहे) आणि सोन्याचे रस्ते असलेले ठिकाण आहे आणि तेथील दैनंदिन जीवन हे पृथ्वीवर असताना आपण जशी मौज करत होतो (म्हणजे आपला एखादा आवडता छंद जोपासणे किंवा पृथ्वीवर असताना ज्या गोष्टी करण्यात आपल्याला आनंद मिळत होता) तसे मजेत दिवस घालवण्याचे ठिकाण आहे. दुर्दैवाने, ह्यापैकी कोणतीही प्रतिमा स्वर्गाविषयी पवित्र शास्त्रात शिकवलेल्या गोष्टींशी तंतोतंत जुळत नाही.
ह्या दुःखद परिस्थितीवर उपाय करण्यासाठी, जेव्हा जेव्हा आपण स्वर्गाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला मध्यवर्ती अवस्था (जी आपण मेल्यानंतर आपला आत्मा नक्की कोठे जातो हा प्रश्न हाताळते) आणि सार्वकालिक अवस्था (जी युगाच्या समाप्तीच्या वेळी देहाचे पुनरुत्थान झाल्यावर मानवी अस्तित्वाच्या स्वरूपाबद्दल बोलते) ह्या दोन अवस्थांमधील फरक नीट समजणे आवश्यक आहे.
मध्यवर्ती स्थितीबद्दलाचा हा प्रश्न की, “आपण मेल्यानंतर कोठे जातो?” ह्याबद्दल पौलाने करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात जे लिहिले त्यावरून त्याने अप्रत्यक्षरित्या असे उत्तर दिले, “शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांला अधिक बरे वाटते.” (२ करिंथ. ५:८). फिलिप्पै येथील मंडळीला, पौलाने लिहिले की “येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे” (फिलिप्पै. १:२३). येशूने वधस्तंभावरील पश्चात्ताप करणार्‍या चोराला सांगितले, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” (लूक २३:४३). तसेच, इब्रीलोकास पत्राचा लेखक ख्रिस्ती मंडळीचे असे वर्णन करतो, “स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे” (इब्री. १२:२३). आम्ही विश्वासणारे मेल्यानंतर कोठे जातो? मृत्यू होताच तत्क्षणी आपण प्रभूच्या सान्निध्यात जातो.
मध्यवर्ती स्थितीबद्दलच्या संबंधित प्रश्नावर विचार करत असताना, “जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत, आणि प्रभूच्या सानिध्यात गेले आहेत त्यांचे काय होते?” प्रकटी. ४-७ मध्ये आपल्याला ह्याविषयीचे एकमेव वर्णन सापडते. आपल्याला योहान सांगतो की राजासनावर बसलेला एकजण आहे (सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर – प्रकटी. ४:८), जो चोवीस वडील (प्रकटी. ४:४), चार जीवधारी प्राणी (४:६ आणि पुढील काही वचने), ह्यांनी वेढलेला आहे, तसेच ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा देखील तेथे उपस्थित आहे (प्रकटी. ५:६ आणि पुढील काही वचने), तेथे असंख्य देवदूत आहेत (प्रकटी. ५:११ आणि पुढील काही वचने), इस्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकी १,४४,००० जण (प्रकटी. ७:४ आणि पुढील काही वचने), आणि मग, शेवटी, उद्धार पावलेल्यांचा एक इतका मोठा लोकसमुदाय तेथे आहे की त्यांची गणती केली जाऊ शकत नाही (प्रकटी. ७:९), आणि ते एकजूट होऊन उच्च स्वरात म्हणत आहेत (व. १०), “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकर्‍याकडून, तारण आहे!” ह्या लोकसमुदायाबद्दल असे म्हटले आहे, “ते देवाच्या राजासनासमोर आहेत, आणि त्याच्या मंदिरात रात्रंदिवस त्याची सेवा करत आहेत; आणि जो राजासनावर बसला आहे तो त्याच्या उपस्थितीने त्यांना आश्रय देत आहे. त्यांना ह्यापुढे भूक लागणार नाही, तहान लागणार नाही. सूर्य किंवा कोणतीही उष्णता त्यांना बाधा करणार नाही. कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.” जेव्हा विश्वासणारे मरतात, तेव्हा आपण युगाच्या समाप्तीला आपल्या देहाच्या पुनरुत्थानाची वाट पाहत, प्रभूच्या उपस्थितीत प्रवेश करतो. जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत ते सध्या प्रकटीकरणाच्या उल्लेखनीय अध्यायांमध्ये वर्णन केलेली गौरवशाली रहस्ये लक्षपूर्वक पाहत आहेत.
आपली सार्वकालिक स्थिती आणि देहाचे पुनरुत्थान ह्याविषयी विचार करत असताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. लूक २०:२७-३३ मध्ये सांगितल्याप्रमाणे, येशूला सदूक्यांनी पुनरुत्थानाबद्दल एक खोचक प्रश्न विचारला होता. एका मनुष्याचे लग्न झाले आणि नंतर तो मरण पावला, आणि त्याच्या सहा भावांपैकी प्रत्येकाने नियमशास्त्रानुसार त्या मनुष्याच्या विधवेशी लग्न केले आणि सहा भावांपैकी प्रत्येकाचा मृत्यू झाला, तर ह्यापैकी पुनरुत्थानात ही स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण तीने सातही भावांशी लग्न केले होते? ह्या प्रश्नाचे आपल्या प्रभूने दिलेले उत्तर आपल्याला पुनरुत्थानानंतरच्या सार्वकालिक स्थितीबद्दल बरेच काही सांगते. “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात; परंतु ते युग व मेलेल्यांतून पुनरुत्थान हे प्राप्त करून घेण्यास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणारही नाहीत; आणि ते पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. पण मोशेनेही झुडपाच्या वृत्तान्तात, परमेश्वराला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव असे म्हणून मेलेले उठवले जातात हे दर्शवले आहे. तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे; कारण त्याला सर्वच जिवंत आहेत. (लूक २०:३४-४०). येशूच्या मते, आपण युगाच्या समाप्तीला मेलेल्यांतून शारीरिकरित्या उठवले जातो, पण पुनरुत्थानानंतरचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे जे ह्या जीवनातील आपल्या सामान्य लैंगिक आणि कौटुंबिक संबंधांच्या पलीकडे आहे. आम्ही त्यावेळी देवदूतांच्या बरोबरीचे आणि पुनरुत्थानाची मुले होऊ असे आपले वर्णन केले आहे.
थेस्सलनीकाकरांच्या मंडळीतील काही जण ह्या प्रकरणाबद्दल गोंधळात पडले होते, म्हणून पौलाने येशू परतल्यावर (प्रकटी. ४:७ मध्ये दाखवून दिल्याप्रमाणे) राजासनापुढे स्वर्गात असलेल्या लोकांचे काय होते हे स्पष्ट केले. प्रेषित लिहितो, “बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हांला सांगतो की, प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघांरूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा (१ थेस्सलनी. ४:१३-१८). म्हणून, ख्रिस्त पृथ्वीवर मंडळीला वर घेण्यासाठी परत येईल, तेव्हा राजासनापुढे उभ्या असलेल्या संतांना पुनरुत्थित शरीर प्राप्त होईल.
शेवटी, सार्वकालिक स्थितीचा विचार करत असताना, आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की स्वर्ग हे देहविरहीत काल्पनिक अस्तित्व नाही. प्रकटी. २१:९-२७ मध्ये, योहानाला आपल्या सार्वकालिक घराचे दर्शन देण्यात आले आहे – एक नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी, जिथे देवाचे संत पुनरुत्थित शरीरात राहतात. होय, स्वर्गीय नगरीमध्ये सोन्याचे रस्ते आहेत आणि ती मौल्यवान रत्नांनी भरलेली आहे – पृथ्वीवरील सौंदर्य आणि संपत्तीच्या सादृश्यतेने नव्या यरुशलेमच्या अवर्णनीय वैभवाचे वर्णन करण्याचा एक मार्ग. पण योहानाने केलेल्या वर्णनात खरोखर महत्त्वाची गोष्ट ही आहे की ख्रिस्ताची मंडळी, ती वधू जिचा त्याने उद्धार केला आहे, तिच्यासोबत तिचा तारणारा उपस्थित आहे. योहान लिहितो, “ये, नवरी म्हणजे कोकर्‍याची स्त्री मी तुला दाखवतो” (प्रकटी. २१:९). आणि मग योहानाला एक अतिशय उल्लेखनीय गोष्ट दिसते. “त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते. नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नाही; कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे; आणि हाच कोकरा तिचा दीप आहे. राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव व सन्मान तिच्यात आणतात. तिच्या वेशी दिवसा बंद होणारच नाहीत; रात्र तर तेथे नाहीच. राष्ट्राचे वैभव व प्रतिष्ठा तिच्यात आणतील; तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा प्रवेश होणारच नाही तर कोकर्‍याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल” (प्रकटी. २१:२२-२७).
तारणाच्या इतिहासाचे संपूर्ण सर्वेक्षण करत असताना आपण निर्मितीपासून, आपल्या वंशजांच्या पतनापर्यंत आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेल्या तारणापर्यंतच्या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. पण पुढील वैभवाची एक भव्य झलक दाखवून कथेचा शेवट होतो. म्हणून, आपण त्या दिवसाची आकांक्षा बाळगू या, आणि तसे करत असताना, “आपल्या विश्‍वासाचा संस्थापक व आपल्याला परिपूर्ण करणारा येशू, ज्याने त्याच्यासमोर ठेवलेल्या आनंदासाठी, लाज तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.”

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.