पवित्र शास्त्राची प्रेरणा आणि अधिकार

उत्पत्ति १:१ मध्ये आपण वाचतो “प्रारंभी देव होता.” पवित्र शास्त्राच्या सुरुवातीच्या घोषणेचे प्रतिध्वनी, योहान १:१ मध्ये आपण वाचतो की “प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.” पण योहान पुढे म्हणतो “शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.” (योहान १:१४). देवाने स्वतःला येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीत्वामधून प्रकट करण्याची निवड केली हे सत्य (सार्वकालिक शब्द ज्याला देही बनवले) आपल्याला पवित्र शास्त्राची प्रेरणा आणि त्याचा अधिकार ह्या विषयाकडे आणते.


पवित्र शास्त्राचे विविध मानवी लेखक पवित्र शास्त्राबद्दल काय म्हणतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? हे लेखक त्याच्याबद्दल काय साक्ष देतात?


पवित्र शास्त्र कधीही त्याच्या वाचकाला एखाद्या प्रकारची आध्यात्मिक अंतर्दृष्टी किंवा आत्म-ज्ञान देणारे “प्रेरणादायक” पुस्तक असल्याचा दावा करत नाही. पवित्र शास्त्र आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी किंवा महत्कृत्ये करण्यास प्रवृत्त करण्यासाठी दिलेले नाही. आपण पाहिल्याप्रमाणे, पवित्र शास्त्र हे देवाने देहधरी बनवलेल्या शब्दाची (येशूची) साक्ष म्हणून दिले आहे.


पवित्र शास्त्रसंबंधी लेखकांची साक्ष सर्वोच्च आहे. पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या त्याच्या दुसऱ्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” जरी लिखित स्वरुपात देवाने आपल्याला प्रकट केलेल्या प्रकटीकरणाचे वर्णन करण्यासाठी “पवित्र शास्त्राची प्रेरणा” हा शब्द वापरला जात असला, तरी पवित्र शास्त्राचे आधुनिक भाषांतर (उदा. इंग्लिश स्टॅन्डर्ड व्हर्शन) योग्यरितीने लक्षात घेते की किंग जेम्स आवृत्तीने “थीऑपन्युसटॉस” ह्या क्रियापदाचे लोकप्रिय भाषांतर “प्रेरित” असे केले आहे, पण ह्या शब्दाचे अधिक चांगले भाषांतर देवाच्या “मुखातून निघालेले” असे आहे. ह्यामुळे ह्या वस्तुस्थितीवर जोर दिला जातो की पवित्र शास्त्रातील विविध पुस्तके मानवी लेखकांच्या माध्यमाद्वारे देवाने (“त्याच्या मुखातून निघालेले शब्द”) आपल्याला दिली आहेत. म्हणूनच रोम. ३:२ मध्ये, उदाहरणार्थ, पौल जुन्या कराराबद्दल “स्वतः देवाचे शब्द” असे बोलू शकतो.


२ पेत्र १:१६-२१ मध्ये, आम्ही वाचतो, “कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्यांसंबंधाने तुम्हांला कळवले असे नाही; तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाला; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’ त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे1 वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. प्रथम हे ध्यानात ठेवा की, शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही; कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” ह्या शास्त्रभागात, प्रेषित पेत्र येशूच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा करतो (म्हणजे येशूचे रूपांतर), आणि तो कल्पित कथा शोधून काढल्याचे किंवा त्यांचे अनुसरण केल्याचे नाकारतो. पेत्राच्या दृष्टीने, पवित्र शास्त्र, पवित्र आत्म्याने लोकांची “सोबत केल्याने” लिहिले गेले आहे. पवित्र शास्त्र मनुष्याच्या इच्छेतून उत्पन्न झालेले नाही (“मला वाटते की मी आज पवित्र शास्त्रातील एक पुस्तक लिहावे!”), परंतु केवळ पवित्र आत्म्याने लोकांची “सोबत केल्याने” लिहिले गेले आहे, आणि असे करत असताना ते ज्या गोष्टींना संबोधित करते त्याच्या दैवी अधिकाराला आणि सत्यतेतील अचूकतेला मानवी पाप आणि अशक्तपणामुळे कोणतीही बाधा पोचणार नाही ह्याची काळजी त्याने घेतली आहे (त्रुटिहीनता) .


तसेच, स्वतः येशूची साक्ष आहे. आमचा प्रभू म्हणतो की पवित्र शास्त्र “देवाच्या मुखातून” आले आहे (मत्तय ४:४), ” शास्त्रलेखाचा भंग केला जाऊ शकत नाही” (योहान १०:३५), ते देवाचे सत्य आहे (योहान १७:१७). येशू आपल्या शिष्यांना सांगतो की पवित्र आत्मा येईल, तेव्हा तो त्यांना सर्व गोष्टी शिकवेल आणि येशूने त्यांना शिकवलेल्या सर्व गोष्टींची त्यांना आठवण करून देईल (योहान १४:२६). योहान १६:१३ मध्ये येशू म्हणतो, “तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे काही ऐकेल, तेच सांगेल; आणि होणार्‍या गोष्टी तुम्हांला कळवील.”


पवित्र शास्त्र हे स्वतः देवाच्या मुखातून निघालेले शब्द असल्यामुळे (त्यात केवळ देवाचे शब्द नाहीत), ते स्वतः देवाच्या अधिकाराने आपल्यापर्यंत येते. पवित्र शास्त्र हे देवाचे लिखित शब्द आहेत आणि त्याच्याकडे मानवी माध्यमातून आलेली देवाची वाणी ह्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. एका लेखकाने (बी. बी. वॉरफिल्ड) ही गोष्ट अगदी योग्यपणे मांडली आहे, “ते म्हणते की, देव म्हणतो.”

Used with permission from www.monergism.com

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.