असे म्हटले जाते की कराराचे ईश्वरविज्ञानशास्त्र सुधारित ईश्वरविज्ञानशास्त्राच्या केंद्रस्थानी आहे. हे म्हणणे बरोबर आहे ह्यात शंका नाही. एदेन बागेत, जेव्हा आपल्या वंशातील पहिल्या आदामाने त्याच्या निर्माणकर्त्याविरुद्ध बंड केले आणि संपूर्ण मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या खाईत लोटले तेव्हा संपूर्ण मानवजातीचा नाश झाला. सर्व नीतिमत्ता पूर्ण करणे आणि देवाच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन करणे ह्या गोष्टी केवळ दुसरा आदामच (येशू ख्रिस्त) करू शकतो. (हा संदर्भ पाहा: मत्तय ३:१५). तसेच आमच्या वैयक्तिक पापांचे अपराध, तसेच आमचा पहिला पिता, आदाम ह्याच्यामुळे आमच्यावर लावण्यात आलेला दोषारोप दूर करण्यासाठी देखील दुसऱ्या आदामाची आवश्यकता आहे. परंतु दुसऱ्या आदामाला ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी, कृत्यांच्या कराराऐवजी (आणि परिपूर्ण आज्ञाधारकपणाच्या मागणीऐवजी) वेगळा करार अस्तित्वात असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये देव एका दुसऱ्या आदामाला आपल्यासाठी आणि आपल्या जागी आपल्यासाठी तारले जाण्यासाठी आणि आपले तारण करण्यासाठी पुरेशी गुणवत्ता मिळवण्यासाठी जे आवश्यक आहे ते करण्याची परवानगी देतो. असे केल्याने आपण कृपेच्या कराराखाली येतो.


कृपेचा करार म्हणजे तारणाच्या सार्वकालिक कराराचे ऐतिहासिक कार्य पूर्णतेस आणणे (तथाकथित “कराराच्या आधीचा करार”) ज्यामध्ये पवित्र त्रैक्यातील व्यक्तींनी असे ठरवले की ज्यांना पित्याने जगाची स्थापना होण्यापूर्वी येशूमध्ये निवडले होते त्या सर्व पापी लोकांच्या वतीने आणि त्यांच्या जागी येशू हा उध्दारकर्ता असेल. (हा संदर्भ पाहा: इफिस. १:३-१४. ह्याचा अर्थ असा की देवाची तारणाची कृपा सर्वसाधारण जगाकडे निर्देशित केलेली नाही तर ज्या विशिष्ट व्यक्तींचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा आहे त्यांच्याकडे निर्देशित केलेली आहे. तारणाच्या ह्या करारामध्ये, पवित्र आत्मा ख्रिस्ताचे कार्य अशा सर्वांसाठी लागू करेल ज्यांना पित्याने निवडले होते आणि ज्यांच्यासाठी पुत्र मरण सोसेल. असे करत असताना ह्या गोष्टीची खात्री केली जाईल की देवाचे सर्व निवडलेले लोक शुभवर्तमानाच्या प्रचाराद्वारे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील. शुभवर्तमानाचा प्रचार हे देवाने नियुक्त केलेले माध्यम आहे ज्याद्वारे देवाच्या निवडलेल्या लोकांना विश्वासात येण्यासाठी पाचारण केले जाईल.


कराराचा समृद्ध आणि अनेक पैलू असलेला विषय संपूर्ण तारणाच्या इतिहासामध्ये दिसून येत असला आणि देवाच्या तारणाच्या उद्देशाच्या आणि मानवजातीशी त्याच्या असलेल्या नातेसंबंधांच्या तो अगदी केंद्रस्थानी असला तरी, कृत्यांच्या कराराप्रमाणे, “कृपेचा करार” ही विशिष्ट शब्दावली पवित्र शास्त्रात आढळत नाही. कृत्यांच्या कराराप्रमाणे, देव ह्या कृपाळू कराराचा लेखक आहे आणि तो आदाम आणि त्याच्या पतित वंशजांवर विशिष्ट अटी लादतो. ह्या करारात सार्वकालिक जीवनाचे अभिवचन देखील समाविष्ट आहे, परंतु हे अभिवचन कृपाळू देवाने दुसरा आदाम म्हणजे येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे पहिल्या आदामाच्या पापाच्या परीणामांपासून ज्या पापी लोकांना तारणासाठी निवडले आहे त्यांच्यासाठी दिले आहे. कृपेच्या करारामध्ये, सर्व काही बलिदानाच्या मृत्यूवर आणि येशूच्या परिपूर्ण आज्ञाधारकतेवर अवलंबून आहे जो देव आणि मानवजात ह्यांच्यातील कराराचा एकमेव मध्यस्थ आहे (१ तीमथ्य. २:५), तरीही आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी त्याला सहानुभूती वाटते, कारण तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला. (हे संदर्भ पाहा: इब्री ३:१-६; ४:१४-१६).


कृत्यांच्या मूळ कराराची अट देवाच्या आज्ञांचे पूर्ण आणि परिपूर्ण वैयक्तिक पालन करणे ही होती, तर पतनाचे भयंकर परिणाम नाहीसे करणाऱ्या कृपेच्या कराराची अट येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ही आहे. (रोम. ५:१२-२१; २ करिंथ. १५:२०-२८). ह्या कृपेच्या कराराचे सार उत्पत्ती १७:७ मधील “मी तुझा व तुझ्यामागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्‍चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो.” ह्या प्रथम आढळून येणाऱ्या आणि ज्याची वारंवार पुनरावृत्ती होते अशा शेवटच्या शब्दामध्ये दिसून येते. आपण जर सरळ तारणाच्या इतिहासाच्या शेवटच्या अध्यायात गेलो तर तेथे शेवटच्या दिवशी जेव्हा नवे यरुशलेम स्वर्गातून खाली उतरते तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला हे अद्भुत शब्द ऐकू येतात जे कृपेच्या कराराचे बोधवाक्य आहेत. “आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : ‘पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्याच्याबरोबर राहील”(प्रकटी. २१:३). होय, तो आपला देव आहे आणि आपण त्याचे लोक आहोत.


म्हणून, तारणाचा इतिहास, जो मानवी इतिहासातील देवाच्या सार्वकालिक आज्ञेची पूर्तता आहे, तो खरे पाहता त्यापुढे क्रमशः केल्या जाणाऱ्या करारांचा वृतांत आहे, असे करार जे कृपेच्या कराराचे ऐतिहासिक मूर्त रूप आहेत. मानवजातीचे पापात पतन झाल्यानंतर लगेचच, देवाने आदामाला अभिवचन दिले की एक उद्धारकर्ता येईल आणि त्याला आणि मानव जातीला त्यांच्या पापाच्या परिणामांपासून वाचवेल. उत्पत्ति ३:१५ मध्ये, आम्हाला पहिल्या शुभवर्तमानाच्या अभिवचनात (तथाकथित प्रोटो-इव्हेंजेलियम म्हणजे “तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन.” हे पहिले अभिवचन आदाम व हवा ह्यांनी निषिद्ध झाडाचे फळ खाल्यानंतर त्यांना देण्यात आले. ईश्वरविज्ञानशास्त्रज्ञ ह्याला पहिले शुभवर्तमान असे म्हणतात. ) कृपेच्या कराराचे पहिले ऐतिहासिक प्रकटीकरण झालेले दिसून येते. आदामाने पाप केल्यावर, लगेचच परमेश्वराने सैतानाला पुढील शाप घोषित केला: “तू व स्त्री (हव्वा), तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.” ह्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अभिवचनात, देवाने सर्पाला चिरडण्याचे आणि त्याच्या लोकांना वाचवण्याचे अभिवचन दिले आहे. कराराच्या मध्यस्थाचे येणे आता निश्चित झाले होते. आपल्या पापांपासून आपली सुटका करण्यासाठी येशू वधस्तंभावर मरण सोसणार होता.


जरी कृपेचा करार अनेक ऐतिहासिक पायऱ्यांमध्ये उलगडत जात असला (उदा. उत्पत्ति १२, १७, इ. मध्ये देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन, निर्गम २४ मध्ये सीनाय पर्वतावर, तसेच अनुवाद २९:१३ मध्ये मवाबाच्या मैदानावर देवाने इस्राएलला दिलेली अभिवचने, २ शमुवेल ७:१४ मध्ये दावीदाला दिलेले सार्वकालिक राज्याचे अभिवचन, त्यानंतर यिर्मयाने त्याच्या संदेशात केलेली नव्या कराराची भविष्यवाणी [३१:३३], जी इब्री लोकास पत्राचा लेखक विशेषतः येशू ख्रिस्ताला लागू करतो, इब्री. ८:१-१३ मधील कराराचा मध्यस्थ) – तारणाच्या संपूर्ण इतिहासात करार मूलत: समान आहे. दोन्ही करारांमध्ये फक्त एकच शुभवर्तमान आहे, ज्याप्रमाणे कराराचा केवळ एकच मध्यस्थ (येशू ख्रिस्त) आहे.


देवाने आपला देव होण्याचे अभिवचन आपल्याला दिले आहे आणि आपण त्याचे लोक आहोत. तारणाच्या इतिहासात दिलेली ही कराराची अभिवचने आपल्या पूर्वजांच्या पापात पडल्यापासून सुरू होतात, आणि शेवटच्या काळात, जेव्हा आपला प्रभु मृतांना उठवण्यासाठी, जगाचा न्याय करण्यासाठी आणि सर्व गोष्टी नव्या करण्यासाठी परत येईल तोपर्यंत ही अभिवचने दिलेली आहेत.

USED WITH PERMISSION FROM WWW.MONERGISM.COM

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.