जोपर्यंत आपल्याला नीतिमान ठरवले जाणे म्हणजे काय हे समजत नाही तोपर्यंत आपण पवित्रीकरणावर चर्चा करण्याच्या कोणत्याही स्थितीत नाही, ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे ज्याद्वारे पापाची जुनी सवय (ज्याला आपण “निवासी पाप” म्हणतो) हळूहळू कमकुवत होत जाते आणि नवा स्वभाव (आम्हाला नव्या जन्मामुळे मिळालेला) उत्तरोत्तर बळकट होत जातो. असे का घडते? विश्वासाची तीच कृती जी आपल्याला ख्रिस्ताशी जोडते जेणेकरून त्याचे नीतिमत्व आपल्याकडे गणले जाते आणि जिच्या आधारे देव आपल्याला “दोषी नाही” असे घोषित करतो आणि तेथून पुढे पवित्रीकरणाची जीवनभरची प्रक्रिया सुरू होते, ज्यामध्ये आपल्या पापी सवयी कमकुवत होऊ लागतात, देवाविषयीचा नवा स्नेह वाढीस लागतो आणि आपण थोड्या नाही तर देवाच्या सर्व आज्ञांचे (जरा अशक्तपणात का होईना) पालन करू लागतो. दुसर्या शब्दात सांगायचे तर, प्रत्येक नीतिमान पापी मनुष्याचे पवित्रीकरण होत जाते.
खरे पाहता, ज्या क्षणी आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्या क्षणी आपल्या सर्व पापांची (भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील) क्षमा केली जाते. ज्या विश्वासाच्या कृतीने आपण नीतिमान ठरवले जातो त्याच विश्वासाच्या कृतीने, ख्रिस्ताचे नीतिमत्व आपले बनते जेणेकरून आता आपण वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताच्या आज्ञाधारकपणावर विसंबून राहू लागतो, जो आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आता आपला आज्ञाधारणपणा ठरतो. विश्वासाद्वारे (आपल्या चांगल्या कामांमुळे नव्हे) आपली अंतरमने भीती, दहशत आणि संदेहापासून मुक्त केली जातात. आपण अयशस्वी झालो तर देव आपल्याला शिक्षा करेल ह्या भीतीने आता आपला थरकाप होत नसल्यामुळे, आपण अधिक नीतिमत्ता मिळवण्यासाठी किंवा “अधिक पवित्र” बनण्यासाठी नव्हे, तर देवाच्या आज्ञांचे पालन करण्यासाठी मोकळे होतो. उलट, आम्ही देवाच्या आज्ञांचे पालन करतो आणि चांगली कामे करतो कारण आम्ही आता “नीतिमान” ठरले गेलो आहोत आणि देवाच्या दृष्टीने आमची सार्वकालिक प्रतिष्ठा आधीच येशू ख्रिस्ताच्या सक्रिय आणि नम्र आज्ञाधारकपणामुळे निश्चित केली गेली आहे. थोडक्यात, ह्यालाच पवित्रीकरण होणे म्हणतात.
पवित्रीकरणाबद्दल पवित्र शास्त्रातील शिकवण खूप विस्तृत आहे. पौलाच्या मते, पापाशी करावा लागणारा हा संघर्ष हे सर्वसामान्य ख्रिस्ती जीवन आहे (रोम. ७:१४-२५). किंबहुना, आपल्यातील सर्वात पवित्र लोक असे असू शकतात ज्यांना सर्वात जास्त पापाशी झगडावे लागते. देहाचे फळ (पौलाने गलती. ५:१९-२१ मध्ये दाखवून दिल्याप्रमाणे) हळूहळू कमी होऊ लागते, तर आत्म्याचे फळ (व. २२-२३) आपल्या जीवनात उत्स्फूर्तपणे दिसू लागते. पापाशी संघर्ष नव्हे तर देवाच्या गोष्टींबद्दलची उदासीनता आणि आपल्या वैयक्तिक पापांबद्दलची उदासीनता ही संकटाची खरी चिन्हे आहेत.
नवा मनुष्य (जो पापात मेला होता, पण आता ख्रिस्तामध्ये जिवंत आहे) आता पापाचा गुलाम रहात नाही. जुना स्वभाव (देहस्वभाव) ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे आणि बाप्तिस्मा घेतल्याने त्याच्याबरोबर पुरला गेला आहे (रोम. ६:१-७). नवा मनुष्य (नवा जन्म झालेला स्वभाव) ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने जिवंत होतो आणि त्याच्यात देहास्वभावापेक्षा पूर्णपणे वेगळी प्रवृत्ती निर्माण होते. नवा स्वभाव देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवतो, तो विश्वासाद्वारे ख्रिस्ताला स्वीकारतो, तो पापाचा तिरस्कार करतो आणि देवाला संतुष्ट करण्याची इच्छा बाळगतो. म्हणूनच ज्याला शुभवर्तमानाच्या उपदेशाद्वारे पाचारण केले जाते आणि जो नंतर ख्रिस्तावर विश्वास ठेवतो (पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे) तो केवळ विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो इतकेच नव्हे तर, त्याच्यामध्ये नव्या इच्छा आणि आवडीनिवडी निर्माण होतात, ज्यामधून त्याचा नवा स्वभाव प्रतिबिंबित होतो.
म्हणूनच पवित्रीकरण हे आम्ही नीतिमान ठरवले गेलो आहोत ह्या एकदाच केलेल्या घोषणेचा आवश्यक परिणाम आहे. जेव्हा एखादा मनुष्य केवळ कृपेने, केवळ विश्वासाने, केवळ ख्रिस्तामुळे नीतिमान ठरला गेला असल्याचा दावा करतो, परंतु नंतर पापाविरुद्ध संघर्ष न करता उदासीन जीवन जगतो, तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकले आहे. कोणताही नीतिमान ठरलेला पापी मनुष्य त्याच्या वर्तनाबद्दल उदासीन राहू शकत नाही किंवा नीतिमान ठरण्याअगोदर जसे जीवन जगत होता तसे जीवन जगत राहू शकत नाही.
नव्या जन्मात आपल्याला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले जाते आणि पूर्वी आपल्यावर असलेल्या पापाचा प्रभाव नाहीसा केला जातो. परंतु अंतरआत्म्यात वास करणारे पाप (ज्याला आपले ईश्वरविज्ञानशास्त्रज्ञ स्वाभाविक पाप म्हणतात) आपण मरेपर्यंत आपल्यामध्ये राहते. रोम. ७:१४-२५ आणि गलती. ५:१७ ही वचने ह्या वस्तुस्थितीबद्दल अगदी स्पष्ट आहेत. नव्या स्वभावाने प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याच्या तीन शत्रूंविरुद्ध संघर्ष केला पाहिजे: जग (अख्रिस्ती विचारसरणी आणि आचरण), देहस्वभाव (आपल्यातील पापी इच्छा) आणि सैतान (खोटे बोलणे आणि देवाबद्दलचा खोटेपणा). म्हणूनच पापाशी संघर्ष हे नीतिमान ठरण्याचे आणि नव्या जन्माचे आवश्यक फळ आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे, ह्या संघर्षामुळे अनेकांना त्यांच्या देवासोबतच्या नातेसंबंधाबद्दल शंका येऊ लागते, मात्र खरे पाहता, पापाशी संघर्ष हे निश्चित चिन्ह आहे की देव कार्य करत आहे, आपल्याला घडवत आहे आणि आपल्याला त्याच्या प्रिय पुत्राच्या प्रतिमेशी अनुरूप करत आहे.
रोम. ६:६ मध्ये, पौल आपल्याबद्दल असे बोलतो की आपण पूर्वी पापाचे गुलाम होते. पण एकदा आमच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर, आम्ही गुलामासारखा विचार करणे आणि तसे वागणे थांबवण्यासाठी संघर्ष करतो आणि आम्ही आता जे स्वतंत्र स्त्री-पुरुष झालो आहोत त्याप्रमाणे जगण्यासाठी संघर्ष करतो. ख्रिस्ती परिपूर्णतावादी लोक शिकवतात त्याप्रमाणे संघर्ष केल्यामुळे ह्या जीवनातील सर्व पापांवर विजय मिळवता येणार नाही. परंतु पापाच्या प्रभावात खंड पडला आहे जेणेकरून पवित्रीकरण आणि परिवर्तन आवश्य सुरू होईल. आणि तरीही, आपण मरेपर्यंत किंवा आपला प्रभु परत येईपर्यंत, जे काही अगोदर घडून येईल तोपर्यंत, पाप करण्याची सवय (मनात वसणारे पाप) आपल्याबरोबर राहील. .
म्हणूनच जसे काही जण म्हणतात की, “तुम्ही येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारू शकता, पण काही काळपर्यंत तुम्ही त्याला तुमच्या जीवनाचा प्रभू बनवत नाही” असा वाद घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही ख्रिस्ती लोकांसारखा वाद तुम्ही यशस्वीपणे घालू शकत नाही. (तथाकथित “लॉर्डशिप कॉन्ट्रॉव्हर्सी म्हणजे विश्वास आणि कृती ह्यांच्यातील संबंधांवर ख्रिस्ती धर्मातील तारणाच्या सिद्धांतावरील प्रश्नासंबंधीचा एक ईश्वरविज्ञानशास्त्रीय विवाद”). विश्वासाद्वारे तुम्ही जर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला असेल, तर तुम्ही ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खिळले गेले आहात, ख्रिस्तासोबत पुरले गेले आहे आणि आता ख्रिस्तासोबत जिवंत आहात. नव्या करारात दुटप्पी ख्रिस्ती जीवन नाही, ज्यामध्ये असे लोक आहेत जे ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतात पण अद्याप त्यांनी त्याला त्यांच्या जीवनाचा प्रभु बनवलेले नाही, किंवा असे लोक नाहीत ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा वास करतो पण त्यांचा पवित्र आत्म्याद्वारे अद्याप बाप्तिस्मा झालेला नाही, किंवा असेही लोक नाहीत ज्यांचे तारण झाले आहे, पण अद्याप त्यांचे पवित्रीकरण झालेले नाही.
म्हणून, जसे आपण पापाला मरतो आणि दररोज जीवनाच्या नवीनतेकडे उदय पावत जातो, तसतसे आपण पापाशी संघर्ष करू लागतो. पण ह्या संघर्षामुळे जरी अडचणी निर्माण होत असल्या, तरी आपले पवित्रीकरण हे एक खात्रीलायक आणि निश्चित चिन्ह आहे की आपण ख्रिस्ताचे आहोत आणि ज्याने आपल्यामध्ये त्याचे चांगले कार्य सुरू केले आहे, तो ते शेवटपर्यंत नक्कीच पूर्ण करेल. (फिलिप्पै. १:६). पवित्रीकरण होणे ह्याचा अर्थ हाच आहे.