ख्रिस्तासाठी साक्ष देणे

या पापी जगात ख्रिस्ताचे साक्षीदार होण्यासाठी ख्रिस्ती लोकांना पाचारण करण्यात आले आहे. हे पाचारण ख्रिस्ताने स्वतः दिलेल्या आज्ञेने (प्रेषित १:८) आणि तसेच पेंटेकॉस्ट पश्चात चर्चच्या उदाहरणाने स्थापित झाले आहे. सर्व तारलेल्या पापी लोकांना सुवार्ता संदेश इतरांना सांगण्याची इच्छा असते. पण केवळ एखादा कृती कार्यक्रम न राहता, (उदा. सुवार्ताप्रसार), विश्वासणारे म्हणून आपल्या नव्या ओळखीत ख्रिस्ताचे साक्षीदार होणे सामावलेले आहे. जेव्हा आपण सुवार्ताप्रसार किंवा इतर मिशन कार्यक्रम चालवत असतो तेव्हाच केवळ नाही तर आपण पूर्ण वेळेचे साक्षीदार असतो,

साक्षीदार हा शब्द एक कायदे विषयक व्याख्या आहे. साक्षीदार म्हणजे जिला एखाद्या महत्वाच्या वास्तवाचे व्यक्तिगत ज्ञान आहे आणि जी त्या सत्याबाबत जाहीरपणे साक्ष देऊ इच्छिते ती व्यक्ती ह्या व्याख्येने स्पष्टपणे दाखवली जाते. एखाद्या गोष्टीविषयी साक्ष देणे म्हणजे त्या गोष्टीचे सत्य सातत्याने बोलणे आणि ह्या विधानांची सत्यता शाबीत करील असा पुरावा देणे. ह्या अशा रीतीने ख्रिस्ती लोक ख्रिस्ताचे साक्षीदार आहेत. त्यांना ख्रिस्ताचे व्यक्तिगत, अनुभवजन्य ज्ञान असते. ते सर्व लोकांसमोर जाहीरपणे ख्रिस्ताचे प्रभुत्व आणि सुवार्ता संदेश ह्याविषयी साक्ष देतात. त्यांचे शब्द आणि जीवन शैली — जेव्हा कृपेने ते जगत असतात तेव्हा — ही ताडून पाहता येईल असा सत्याचा पुरावा असतो.

साक्षीदार म्हणून आपण कसे जगले पाहिजे? ख्रिस्ताने आपल्याकरिता परिपूर्ण असा आदर्श नमुना ठेवला आहे, आणि मग ह्या कामासाठी आपल्यामध्ये भरून सज्ज करण्यासाठी त्याचा आत्मा पाठवला. आपण, तीमथ्यासारखे, ख्रिस्ताचे उदाहरण अनुसरायचे आहे : “सर्व प्राणिमात्राला जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलाता समक्ष स्वतःविषयी चांगला पत्कर केला, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू ही आज्ञा निष्कलंक व अदुश्य (निर्दोष) राख” (१ तिमथ्य ६:१३-१४).

पंतय पिलाताच्या काळात सत्यावर खटला भरण्यात आला होता. मानव अवतार धारण केलेले सत्य ह्या परराष्ट्रीय न्यायाधीशापुढे उभे होते. ख्रिस्ताच्या जीवनाचा पुरावा निवाड्याची मागणी करत होता, आणि त्याचे निरपराधीत्व आणि त्याचे दैवत्व हे त्याचे स्पष्टप्रमाण होते. अधिक मोठ्या अशा यहूदीयाच्या न्यायालयात आणि सर्वराष्ट्रांसमोर देखील सत्यावर खटला भरण्यात आला होता. (तुलना यशया४३:८-१२). ज्याने पंतय पिलातासमोर स्वतःविषयी चांगला पत्कर केला तो ख्रिस्त “विश्वसनीय साक्षी” आहे (प्रकटी१:५). त्याच प्रमाणे, प्रत्येक विश्वासणाऱ्याला हे सांगण्यात आले आहे की त्याने ह्या कुटील व विपरीत पिढीत निर्दोष असे जीवन जगावे. (मत्तय५:१६; फिल२:१४-१६; १पेत्र२:१२). जसा आपला प्रभू विश्वसनीय साक्षी होऊन गेला तसे आपण त्याचे विश्वसनीय साक्षी व्हावे असे आपल्याला सांगण्यात आले आहे.

आपण विश्वसनीय रीतीने ख्रिस्ताची साक्ष कशी दिली पाहिजे? एक संक्षिप्त उत्तर अशक्य आहे कारण नवा कराराचा बहुतांश भाग विश्वासणाऱ्यांना साक्षी म्हणून जगण्याविषयी आदेश देण्याच्या प्राथमिक इराद्याने लिहिला होता. पण थोडक्यात सांगायचे तर, ख्रिस्ती साक्षी म्हणून जगणे म्हणजे सुवार्तेचे सत्य जाहीर करत असतांना, ह्या पापी जगात ख्रिस्ताचे स्वभाव गुण दाखवून ख्रिस्ताला अनुसरणे. पुढील व्यावहारिक विचारांची नोंदघ्या.

पहिली गोष्ट, आपली साक्ष पित्याच्या उपस्थितीत दिली जात असते. पौल “देवाच्या नजरेसमोर” तीमथ्याला सांगतो, आणि, तसेच, ख्रिस्त विश्वासू साक्षींना पित्यासमोर स्वर्गात पत्करील हे अभिवचन देतो. (मत्तय १०:३२).आपण पुष्कळ वेळां आपली जिवने आणि कृत्ये ह्यांचे मूल्यमापन इतरांची मतें विचारात घेऊन करतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या साक्षीवर देवाची नजर आहे हे विसरणे सोपे असते.

दुसरी गोष्ट, आपली साक्ष ख्रिस्ताचा आणि त्याच्या सत्याचा विरोध करणाऱ्या जगासमोर आहे. ख्रिस्ताच्या बाबतीत झाले तसे, आपल्या बाबतीत चुकीचे मत बनवले जाणे आणि चुकीच्या पद्धतीने आपणास वागवले जाणे यासाठी तयार असा, “ज्याने त्याची निंदा होत असतां त्याने उलट निंदा केली नाही, दुःख भोगत असतां त्याने धमकावले नाही तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले” (१ पेत्र २:२३).

तिसरी गोष्ट, आपल्याला प्रीतीमय खात्रीशीरपणाने साक्ष द्यायची आहे. पुष्कळ लोक निष्काळजीपणे अनंतकालीन नरकाकडे जायला निघाले आहेत. आपण सामाजिक रीतीने आणि राजनीतीनुसार चूक करत आहोत असे दिसत असले तरी, आपण त्यांच्यावर भरपूर प्रीती केली पाहिजे, आणि त्यांना त्यांच्या आत्मिक धोक्याची जाणीव करून देऊन ख्रिस्ताकडे त्यांना वळवले पाहिजे. सुवार्तेद्वारे होणाऱ्या रूपांतराची सत्यता आपण व्यक्तिगत रीतीने अनुभवली असल्यामुळे, इतरांना ही शांती आणि हर्ष ह्यां विषयी सांगण्यापासून स्वतःला आवरू शकत नाही. (१ योहान १:३-४).

चौथीगोष्ट. आपण प्रतिष्ठा,विनयशीलता आणि जो सत्य आहे त्या ख्रिस्तावरील भरवश्याने साक्ष द्यायची आहे. एक दुष्ट न्यायाधीश आणि कपटी धार्मिक पुढाऱ्यांपुढे ख्रिस्त चौकशीला उभा आहे ह्याचा विचार करा. ख्रिस्ताची राज वैभवी प्रतिष्ठा आणि सौम्य ऐश्वर्य दर्शवणारे त्याचे नीतिमान जीवन ह्यांवर गांभीर्याने मनन करा. त्याची सहजसुंदर सौम्यता आणि विनयशीलता यांचा विचार करा. (फिल. २:५-८). येथे दुष्टलोक ज्याचा उपहास करत आहेत तो विश्वाचा राजा उभा आहे; पण पाप्यांना तारण्यासाठी देवाने केलेल्या आश्चर्यकारक प्रीती विषयी सांगावे याकरिता त्याने स्वेच्छेने हे स्वीकारले होते. त्याच्या निशब्द आत्मविश्वासाने उत्तेजित व्हा. पिलाताच्या निवाड्याच्या निष्पत्तीने सत्य ठरवले गेले नव्हते; ख्रिस्त सत्य होता आणि तो आहे आणि तो सर्वदाच सत्य असेल, आणि लवकरच प्रत्येक जिव्हा ते कबूल करील.

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.