ख्रिस्ताच्या मंडळीची वैशिष्टे आणि सेवाकार्य

नव्या करारात येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या परंतु स्थानिक मंडळीचा सभासद नसलेल्या व्यक्तीसाठी कोणतीही श्रेणी नाही. ह्याचे कारण इतके स्पष्ट आहे की आपण ते गृहीत धरतो. सर्व खरे विश्वासणारे विश्वासाद्वारे ख्रिस्ताशी जोडले जाऊन ख्रिस्ताच्या शरीराचे सभासद होत असल्यामुळे, नवा करार असे गृहीत धरतो की जे ख्रिस्ताच्या शरीराचे सभासद आहेत ते नैसर्गिकरित्या अविश्वासू जगासमोर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या आणि त्याला आपला प्रभू मानणाऱ्या मंडळीशी तादात्म्य स्थापित करतील. दुर्दैवाने, अनेक लोकांची धारणा ह्यापेक्षा अगदी वेगळी असते.
अमेरिकन संस्कृतीचा असंस्कृत तरी दणकट व्यक्तिवाद आणि अधिकाराबद्दलची त्यांची जन्मजात शंका लक्षात घेता, अनेक अमेरिकन लोक जे स्वतःला पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणारे विश्वासाणारे मानतात त्यांच्या दृष्टीने येशू ख्रिस्तावरील स्वतःचा वैयक्तिक विश्वास आणि स्थानिक मंडळीचे सभासदत्व ह्यांच्यात फारसा संबंध नसतो. हा आपल्या काळातील सर्वात गंभीर प्रश्न आहे आणि ख्रिस्ती मंडळीविषयीच्या शिकवणीविषयी आणि समविचारी सह-विश्वासणाऱ्यांनी स्थानिक मंडळीचे सभासद असण्याच्या आवश्यकतेविषयी असलेल्या सर्वसामान्य अज्ञानातून तो उद्भवला आहे. किंबहुना, जॉन कॅल्विन ह्यांनी यशया संदेष्ट्यावरील आपल्या भाष्यात लिहिले आहे, “आपण एकाच विश्वासात एकत्र आल्याशिवाय, म्हणजेच ख्रिस्ती मंडळीचे सभासद असल्याशिवाय देवाला स्वीकार्य होऊ शकत नाही.” “केवळ विश्वासाने आणि केवळ कृपेने नीतिमान ठरणे” आणि ख्रिस्ताच्या मंडळीचे सभासदत्व ह्या दोन गोष्टी कॅल्विन ह्यांच्या मते अविभाज्य आहेत, कारण पवित्र शास्त्र स्पष्टपणे असे सूचित करते की ज्यांना आपला प्रभु विश्वासाद्वारे नीतिमान ठरवतो, त्या सर्वांना तो एकत्र आणतो, ख्रिस्ती उपसाकांचा एक सदृश्य समूह, एक स्थानिक ख्रिस्ती मंडळी.
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी समविचारी विश्वासणाऱ्यांच्या स्थानिक मंडळीचे सभासद होऊन ख्रिस्ताच्या जोखडाच्या म्हणजेच स्वामित्वाच्या अधीन व्हावे हे जर खरे असेल, तर कोणती मंडळी समविचारी आहे आणि शुभवर्तमानाशी विश्वासू आहे, देवाच्या वचनानुसार पवित्रसंस्कारांचे व्यवस्थापन करते, हे आपण कसे सांगू शकतो? मंडळीतील लोक येशूवर प्रीती करतात कि नाही आणि मंडळीमध्ये आमच्या मुलांसाठी चांगले कार्यक्रम आहेत कि नाही, हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो का? किंवा मंडळीमध्ये शुभवर्तमान शिकवले जाते कि नाही, पवित्र शास्त्रात आज्ञापिल्याप्रमाणे पवित्रसंस्कार केले जातात कि नाही आणि ह्या शिकवणीच्या विरोधात शिकवणाऱ्या किंवा ज्यांच्या जीवनशैलीवरून असे दिसून येते की ते मंडळीमध्ये शिकवल्या जाणाऱ्या शिकवणीवर खरोखर विश्वास ठेवत नाहीत अशा सभासदांना शिस्त लावून ह्या गोष्टींचे रक्षण करण्यास मंडळी इच्छुक आहे कि नाही हे आपण पाहतो का? ख्रिस्ती मंडळीची वैशिष्टे वस्तुनिष्ठ आहेत (आम्ही ती स्पष्टपणे पाहू शकतो). ही वैशिष्टे, उपासनेला हजर राहणाऱ्या लोकांचे पावित्र्य किंवा प्रामाणिकपणा ह्यातून उगम पावत नाहीत (कारण आम्ही ती ठरवू शकत नाही).
ह्या मुद्यावरून लोक सहसा गोंधळात पडतात. एक ख्रिस्ती मंडळी ही एक खरी ख्रिस्ती मंडळी होऊ शकते – शुभवर्तमानाचा प्रचार करा, पवित्र संस्कारांचे व्यवस्थापन करा आणि मंडळीच्या सभासदांना शिस्त लावा – तरीही त्यांच्यामध्ये पापी सभासद आणि अ-ख्रिस्ती लोक असतीलच (जे लोक सत्याचा दावा करतात, परंतु शुभवर्तमानावर विश्वास ठेवत नाहीत). आपण अशा ख्रिस्ती लोकांच्या समूहाबद्दल विचार करू शकतो जो स्वतःला ख्रिस्ती मंडळी म्हणवतो, उपासनेसाठी आणि ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी एकत्र येतो आणि तरीही त्याच्यामध्ये खऱ्या ख्रिस्ती मंडळीची वैशिष्टे दिसून येत नाही. तरीही, अशा समूहात (खरी ख्रिस्ती मंडळी नसलेल्या) अशा अनेक लोकांचा समावेश असू शकतो जे खरोखर ख्रिस्ती आहेत. मंडळी ही खरी ख्रिस्ती मंडळी आहे कि नाही किंवा त्यात खोट्या मंडळीची काही वैशिष्टे दिसून येतात का ह्या विषयावरील चर्चेचा अर्थ असा होत नाही की अशा मंडळीतील सर्वच सभासद ख्रिस्ती नाहीत.
खऱ्या ख्रिस्ती मंडळीचे पहिले वैशिष्ट म्हणजे शुभवर्तमानाचा चोख प्रचार. हे वैशिष्टच इतर सर्व गोष्टींचा पाया आहे आणि ख्रिस्ती मंडळीचे ध्येय प्रभावीपणे परिभाषित करते. मंडळीमध्ये हे वैशिष्ट नसेल तर बाकी सर्व गोष्टींना काहीच अर्थ नाही. मंडळीमध्ये हे वैशिष्ट नसेल तर त्यात इतर कोणतीही वैशिष्टे उपस्थित असू शकत नाहीत (उदाहरणार्थ, पवित्र संस्कारांना त्यांची गुणकारिता मंडळी किंवा पाळकांकडून नव्हे तर शुभवर्तमानाकडून मिळते.). शुभवर्तमानाच्या चोख प्रचारासाठी, ज्याला पौल ख्रिस्ताचे सार्वजनिक घोषणापत्र म्हणतो ते आवश्यक आहे. (गलती. ३:१). ह्यात १ करिंथ. १५:१-८ मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे पापी लोकांसाठी येशू ख्रिस्ताचा मृत्यू, पुरले जाणे आणि पुनरुत्थान ह्या गोष्टींची विश्वासूपणे केलेली घोषणा समाविष्ट आहे. शुभवर्तमानाचा प्रचार करणे म्हणजे देवाने त्याच्या पुत्राच्या व्यक्‍तीत्वामध्ये पापी लोकांशी केलेल्या समेटाबद्दल सांगणे (रोम. ५:८-११; २ करिंथ. ५:१८-२१). वधस्तंभाद्वारे, देव त्याची प्रीती आणि न्याय प्रकट करतो, त्याच्या क्रोधाला पात्र असलेल्या लोकांवर त्याचा न्याय्य राग शमवतो हे घोषित करणे (रोम. ३:२०-२५). रोम. १०:१४-१७ नुसार, शुभवर्तमानाची घोषणा ऐकल्याने विश्वास निर्माण होतो. शुभवर्तमानाच्या शुद्ध प्रचारामध्ये अतिशय विशिष्ट गोष्टी समाविष्ट आहेत: येशूख्रिस्ताच्या सक्रिय आणि नम्र आज्ञाधारकपणाद्वारे म्हणजे त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान ह्यांच्याद्वारे पापी लोकांसाठी ख्रिस्ताचे तारणाचे कार्य घोषित करणे. उपदेश करताना येशूबद्दल काहीतरी अस्पष्ट बोलणे म्हणजे शुभवर्तमान सांगणे नव्हे!
ख्रिस्ती मंडळीचे दुसरे वैशिष्ट म्हणजे पवित्र संस्कार किंवा विधी योग्य पद्धतीने पार पाडणे. केवळ विश्वासाद्वारे प्राप्त झालेल्या ख्रिस्ताच्या नीतिमत्वाद्वारे आपण जरी नीतिमान ठरवले गेलो असलो, तरी आपण सर्व हृदयाच्या कठोरपणाला बळी पडू शकतो आणि आपल्या सर्वांना पापाकडे सतत ओढा जाणवतो. देवाने आपल्याला पवित्र धर्मसंस्कार देण्यामागचे कारण हे आहे की आपण दुर्बल आणि पापी आहोत. देवाने शुभवर्तमानात आपल्याला अपराधीपणापासून आणि पापाच्या प्रभावापासून मुक्त करण्याचे अभिवचन दिले आहे, त्याचप्रमाणे पवित्र विधीसंस्कारांमध्ये देखील देव शुभवर्तमानात दिलेल्या अभिवचनांची पुष्टी सदृश्य आणि मूर्त स्वरूपात करतो. हे पवित्र धर्मसंस्कार इतक्या मूर्त स्वरूपात आहेत की आपण त्यात भिजून जातो (बाप्तिस्मा). इतक्या मूर्त स्वरूपात की आपण त्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्या हातात घेतो आणि आपल्या तोंडावाटे त्या घटकांचे (भाकर आणि दाक्षरस) सेवन करतो ज्या येशूने त्याच्या प्रेषितांना दिल्या होत्या. आणि हे पवित्र धर्मसंस्कार त्याच कराराच्या अभिवचनावर आधारित आहेत – “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.” (मत्तय ११:२८)!
खर्‍या ख्रिस्ती मंडळीचे तिसरे वैशिष्ट म्हणजे पापी लोकांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना शिक्षा करणे. पवित्र शास्त्रातील ह्या संदर्भातील गंभीर शास्त्रभाग मत्तय १८:१५-१७ हा आहे. ह्या शास्त्रभागात, आपला प्रभू आपल्यामध्ये असलेले विवाद मिटवण्याची आवश्यकता आणि त्यासाठीची प्रक्रिया ह्या दोन्ही गोष्टी स्थापित करतो, ज्यामध्ये अपील करण्याचे सर्वोच्च न्यायालय हे मंडळी आहे. १ करिंथ. ५:४-५ मध्ये, पौल तथाकथित विश्वासणाऱ्यांना बहिष्कृत करण्याबद्दल बोलतो ज्यांच्या पश्चात्ताप न केलेल्या पापांमुळे मंडळीची बदनामी होते. १ करिंथ. ५:१३ मध्ये, पौल करिंथ येथील मंडळीला एका दुष्ट माणसाला त्यांच्यामधून काढून टाकण्याची आज्ञा देत आहे – एक असा माणूस ज्याने आपल्या सावत्र आईला स्वतःची पत्नी करून घेतले होते. अशा वागणुकीकडे दुर्लक्ष करणे आणि आक्षेपार्ह माणसाला न बहिष्कृत करणे म्हणजे संपूर्ण मंडळीवर देवाचा न्यायदंड ओढवण्याचा धोका आहे. मंडळीच्या सभासदत्वाप्रमाणेच, मंडळीतील शिस्तीला देखील पर्याय नाही.
ही तीन वैशिष्टे (ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगणे, पवित्र विधीसंस्कारांचे योग्य प्रशासन करणे आणि मंडळीतील शिस्त) केवळ खऱ्या ख्रिस्ती मंडळीचे (देवाच्या वचनाशी विश्वासू असलेल्या) प्रतिक आहेत इतकेच नव्हे, तर ती ख्रिस्ती मंडळीचे ध्येय परिभाषित करतात.

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.