कृत्यांचा करार

होशेय ६:७ मध्ये, संदेष्ट्याने परमेश्वराचे वचन पुढीलप्रमाणे नोंदवले आहे: “त्यांनी [इस्राएल आणि यहूदा] आदामाप्रमाणे करार मोडला आहे; तेथे ते माझ्याबरोबर बेइमानपणे वागले आहेत.” ह्या घोषणेच्या आधारे हे स्पष्ट होते की एदेन बागेत असताना आदाम त्याच्या निर्माणकर्त्याशी एका नात्यात करारबध्द होता आणि आदामाने खरोखरच एका वैयक्तिक आवज्ञेच्या कृतीद्वारे त्या कराराच्या अटींचे उल्लंघन केले होते. संदेष्ट्याच्या ह्या घोषणेमध्ये, आम्हाला ख्रिस्ती ईश्वरविज्ञानशास्त्राचे दोन अतिशय महत्त्वाचे घटक सापडतात जे सुधारित (Reformed) ख्रिस्ती लोकांना समजले आहेत. पहिला घटक असा आहे की आदामाची निर्मिती देवासोबतच्या कराराच्या नातेसंबंधात करण्यात आली होती (देवाने आदामाला निर्माण केल्यानंतर त्याच्यावर हा करार स्वैरपणे लादला गेला नव्हता). दुसरा, आदामाने ह्या कराराचे उल्लंघन केल्याने त्याने स्वतःवर, तसेच तो जिचे प्रतिनिधित्व करतो आणि जी जैविक दृष्ट्या त्याच्यापासून उत्पन्‍न झाली आहे अशा संपूर्ण मानवजातीवर भयानक परिणाम घडवून आणले.


ह्या कराराची ओळख आणि त्याचे गुणधर्म हा एक दीर्घकालीन वादाचा विषय आहे. परंतु कृत्यांचा करार (किंवा, जो “निर्मितीचा करार” म्हणून देखील ओळखला जातो) आदाम पापात पडण्यापूर्वीच्या आणि त्यानंतरच्या अशा दोन्ही तारणाच्या इतिहासाच्या संतुलनाच्या केंद्रस्थानी आहे. अनेक कारणांसाठी मानवी इतिहासाच्या सुरुवातीपासूनच हा करार अस्तित्वात होता हे मान्य करणे खरोखर महत्वाचे आहे. ह्यावरून देवाने आदामाची निर्मिती केल्यानंतर मानवजातीवर कार्यांचा करार लादला `नाही ह्या वस्तुस्थितीला भक्कम आधार मिळतो. ह्याउलट, आदामाला देवाचा प्रतिमा वाहक म्हणून निर्माण करून, त्याला देवासोबतच्या कराराच्या नातेसंबंधात निर्माण केले गेले कारण नैतिक आणि विवेकशील प्राणीमात्र त्याच्या स्वभावाने त्याच्या निर्माणकर्त्याचे आज्ञापालन करण्यास बांधील आहेत. आदामाने जर हा करार मोडला – – विचार, शब्द आणि कृतीत परिपूर्ण आज्ञाधारकपणा – – तर आदाम आणि तो ज्यांचे प्रतिनिधित्व करतो ते सर्व (संपूर्ण मानवजात) कराराच्या शापाच्या म्हणजे मृत्युच्या अधीन आहेत.


निर्मितीच्या सुरुवातीपासून हा करार उपस्थित असण्यामागचे कारण हे की जर आदाम आणि त्याच्या वंशजांना त्यांच्या सामूहिक बंडखोरीच्या परिणामांपासून मुक्त करायचे असेल, तर शापापासून मुक्त होण्यासाठी पापात पडण्यापूर्वी आदाम जसा नीतिमान होता तसेच आदामाच्या पतित वंशजांना परमेश्वरासमोर नीतिमान ठरवण्यासाठी देवाच्या तारणाच्या कृपेची आणि शाप समूळ नष्ट करण्यासाठी तारणाच्या कृतीची आवश्यकता असेल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, जेव्हा आदामाने त्याच्या निर्माणकर्त्याविरुद्ध बंड केले आणि कृत्यांच्या कराराच्या अटींचा भंग केला, तेव्हा कृपेच्या कराराला (ज्यामध्ये येशू ख्रिस्त कराराचा मध्यस्थ आहे – १ तीमथ्य. २:५) केवळ मानवजातीचे सामूहिकरित्या पापात पडणे आणि परिणामी शापित होण्याच्या (मृत्यूच्या) पार्श्वभूमीवरच अर्थ प्राप्त होतो. “कृत्य चा करार” हा शब्द जरी निर्मितीच्या वृतांतात आढळत नसला तरी, अशा कराराचे सर्व घटक स्पष्टपणे एदेन बागेत उपस्थित आहेत. पहिला, ह्या करारात दोन पक्ष सामील आहेत (आदाम आणि त्याचा निर्माणकर्ता), ज्यामध्ये देवाने सार्वभौमपणे ह्या कराराच्या अटी आदाम आणि त्याच्या वंशजांवर लादल्या आहेत. दुसरे, उत्पत्ति २:१७ मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे देवाने एक अट घातली आहे – “पण बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणार्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” ही अट जरी एक विशिष्ट गोष्ट करण्याला आळा घालण्याच्या स्वरूपात घातली आहे (तू त्या झाडाचे फळ खाशील तर खास मारशील.), तरी ह्याकडे एका सकारात्मक ईश्वरविज्ञानशास्त्रीय तत्त्वाच्या दृष्टीकोनातून देखील पाहता येऊ शकते जे खरे पाहता ह्या कराराचे सार आहे: “हे करा [म्हणजे, फळ न खाता आज्ञापालन करा) आणि जगा.” तिसरा, त्यामध्ये परिपूर्ण आज्ञापालन केल्यास एक अभिवचन देण्यात आले आहे (सार्वकालिक जीवन), तसेच आज्ञाभंग केल्यास शाप (मृत्यू) मिळण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. आदाम जर त्याच्या निर्माणकर्त्याचे पालन करतो आणि झाडाचे फळ खात नाही, तर त्याला देवाचे अभिवचन दिलेले आशीर्वाद मिळतील – अनंतकाळचे जीवन. पण आदामाने झाडाचे फळ खाल्ले तर तो कराराच्या शापाखाली येईल – जो मृत्यू आहे.


हे तिन्ही घटक निर्मितीच्या वृतांतात उपस्थित आहेत, आणि होशेय ६:७ मधील घोषणेच्या प्रकाशात, असा करार अस्तित्वात आहे आणि तो आशीर्वाद/शाप तत्त्वावर आधारित आहे ह्याबद्दल फारसा प्रश्न नाही. आपण जेव्हा ह्या तीन घटकांकडे थोडे अधिक तपशीलवारपणे पाहतो, तेव्हा आपल्याला असे दिसून येते की केवळ कराराचे घटक एदेन बागेतच स्पष्टपणे उपस्थित नाहीत, तर आपल्या हे देखील लक्षात येते की त्यानंतरचा सर्व तारणाचा इतिहास आशीर्वाद/शाप तत्त्वावर कार्यरत आहे ज्यामध्ये सार्वकालिक जीवनाचे अभिवचन आदाम आणि त्याच्या वंशजांना त्यांच्या सर्व विचार, कृती आणि बोलण्यात देवाच्या आज्ञांचे पूर्ण पालन करण्याच्या अटीवर दिले गेले आहे. आदामाने कराराच्या अटींचे पूर्णपणे पालन केले तर देव त्याला अनंतकाळचे जीवन देणार आहे. आदाम जसे जीवन जगत होता तसेच जीवन जगत राहणार नाही, तर आदामला नीतिमत्तेत दृढ केले जाईल आणि त्याला अनंतकाळचे जीवन दिले जाईल.


परंतु जेव्हा आदामाने पाप केले आणि तो कराराच्या शापाखाली आला, तेव्हा आदाम किंवा त्याच्या वंशजांपैकी कोणालाही परमेश्वराशी परिपूर्ण आज्ञाधारकपणे वागणे शक्य नव्हते. त्यांना कृपेच्या कराराच्या अटींनुसार देवासमोर सादर करण्यासाठी, त्यांच्या वतीने असा परिपूर्ण आणि वैयक्तिक आज्ञाधारकपणा प्रदान करण्यासाठी दुसरा आदाम, म्हणजे येशू ख्रिस्तच आवश्यक आहे. आणि ह्या तरणाऱ्याने देवाच्या सर्व आज्ञांचे पूर्णपणे पालन तर केलेच पाहिजे, शिवाय त्याने असे एक माध्यम प्रदान केले पाहिजे ज्याद्वारे आदामामधील आपल्या पापाचे दोष तसेच आपल्या स्वत:च्या पापांमुळे आपल्या हातून घडलेले अपराध दूर केले जाऊ शकतील. दुसरा आदाम आपल्यासाठी आणि आपल्या ऐवजी पूर्णपणे आज्ञाधारक असला पाहिजे इतकेच नव्हे तर त्याने वधस्तंभावर जाणे आवश्यक आहे जिथे तो आपल्या पापांसाठी दु:ख सहन करेल आणि आपण जी आदामाची मुले आहोत त्या आपल्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करून आपल्या सर्वांवर येणार असलेला शाप आपल्यापासून दूर करेल.


आणि येशूच्या वधस्तंभावर जाण्याला आणि मृत्यूला (शुभवर्तमानातील चांगली बातमी) केवळ एका वाईट बातमीच्या पार्श्वभूमीवरच अर्थ प्राप्त होतो – मोडलेला कृत्यांचा करार, ज्यामध्ये आपण सर्वांनी आदामामध्ये पाप केले, तरी परंतु येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला अनंतकाळचे जीवन दिले गेले. ( हा संदर्भ पाहा: रोम. ५:१२-१९).

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.