ख्रिस्ती विश्वासाच्या अगदी केंद्रस्थानी आपल्याला देह धारणाची शिकवण आढळते – येशू ख्रिस्त, पवित्र त्रैक्यातील दुसरी व्यक्ती आणि देवाचा सार्वकालिक पुत्र ह्याने आपल्याला आपल्या पापांपासून तारण्याच्या उद्देशाने एक खरे मानवी स्वरूप स्वीकारले. विशिष्ट सत्य दाव्यांवर आधारित असलेली हीच शिकवण ख्रिस्ती धर्माला एक अलौकिक धर्म म्हणून चिन्हांकित करते, – म्हणजे, देव ख्रिस्तामध्ये जगाचा स्वतःशी समेट करत होता (हा संदर्भ पाहा: 2 करिंथ. ५:१८) – आणि ज्याचा उद्देश त्याच्या अनुयायांची नैतिक सुधारणा, ज्ञानप्राप्ती किंवा वैयक्तिक फायदा ह्यासाठी नसून, ज्यांना देवाने येशू ख्रिस्तामध्ये तारणासाठी निवडले आहे त्या सर्व पापी लोकांचे तारण व्हावे हा त्यामागचा हेतू आहे.
येशू ख्रिस्ताचे देह धारण करणे हा देव त्याची अभिवचने पाळतो ह्याचा पुरावा आहे. ही घटना खरोखरच आतापर्यंतची सर्वात महान घटना आहे. मानवी इतिहासाच्या पहाटे, देवाने आदामाला एदेन बागेत ठेवले आणि त्याने बऱ्या-वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नये अशी आज्ञा त्याला दिली. पण आदामाने निषिद्ध झाडाचे फळ खाल्ले आणि संपूर्ण मानवजातीला पाप आणि मृत्यूमध्ये लोटले. पण देव आदाम, हव्वा आणि सर्प ह्यांना शाप देत असतानाच (हा संदर्भ पाहा: उत्पत्ती ३), देवाने आदामाला स्त्रीच्या संततीद्वारे त्याच्या पापातून सोडवण्याचे अभिवचन दिले – म्हणजे, हव्वेच्या जैविक वंशजाद्वारे, जो देवाच्या लोकांना त्यांच्या पापापासून तारेल (उत्पत्ति ३:१५). पहिल्या आदामाने आपल्यावर आणलेल्या परिणामांना पूर्ववत करण्यासाठी दुसऱ्या आदामाची आवशकता आहे – जो आदामाने मोडलेल्या कृत्यांच्या कराराचे पालन करतो आणि केवळ तोच आपल्याला पापाच्या अपराधापासून आणि प्रभावापासून मुक्त करू शकतो. आणि ही गोष्ट आपल्याला येशू ख्रिस्ताच्या देहधारण करण्याच्या विषयाकडे घेऊन जाते, ज्या व्यक्तीमध्ये देव आपली अभिवचने पूर्ण करतो आणि जो आपला इमॅन्युएल (देव आपल्यासोबत) आहे. पहिल्या आदामाने आपल्यावर ओढवून आणलेल्या नाशापासून आपल्यापैकी कोणालाही वाचायचे असेल तर शब्द देही झाला पाहिजे (संदर्भ: योहान १:१७). त्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही.
जुना करार विविध माशीहाविषयक भविष्यवाण्यांनी भरलेला आहे, ज्यामध्ये देवाने आपल्या लोकांना सोडवण्याचे विशिष्ट विषयाशी संबंधित अभिवचन आश्चर्यकारकपणे मांडले आहे. खरेतर, संपूर्ण जुन्या करारात येशू ख्रिस्ताच्या आगमनासंबंधी एकूण एकसष्ट प्रमुख मशीहाविषयक भविष्यवाण्या आहेत, त्या सर्व संपूर्ण नव्या करारात तपशीलवार वर्णन केल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मानवी देहात येण्याद्वारे स्पष्टपणे पूर्ण झालेल्या दिसून येतात. उत्पत्ति ३:१५ मधील देवाने आदाम आणि हव्वेला दिलेले अभिवचन येशू वधस्तंभावर मरण पावल्यावर पूर्ण होते हे आपण आधीच पाहिले आहे. येशू केवळ सैतानाचे डोके फोडत नाही, तर स्वतःच्या लोकांचे तारण घडवून आणण्यासाठी दुःख सहन करतो. ख्रिस्तामध्ये पूर्ण होत असलेल्या देवाच्या तारणाच्या अभिवचनांचे आणखी एक उदाहरण म्हणून, यशया ७:१४ मध्ये आपल्याला ही आश्चर्यकारक भविष्यवाणी आढळते: “ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.” जो येणार होता तो केवळ अलौकिकरित्या जन्म घेणार होता इतकेच नव्हे तर तो मानवी देहात देव असणार होता. म्हणूनच तारणाबद्दलचा जुन्या कराराचा दृष्टीकोन उत्कंठा, प्रतीक्षा, अपेक्षा आणि आशेचा आहे.
आपण जेव्हा नव्या कराराच्या युगात येतो, तेव्हा आपल्याला लगेच कळते की काहीतरी अतिशय नाट्यमय आणि पूर्णपणे मानवी अपेक्षेपलीकडचे घडत आहे. मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये, आपल्याला ह्या प्राचीन माशीहविषयक भविष्यवाण्यांच्या पूर्ततेची ऐतिहासिक नोंद आढळते. मत्तय १:१८-२३ मध्ये आपण हे शब्द वाचतो: “येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरीया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.” हे सर्व अशासाठी झाले की, प्रभूने संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे; ते असे : “पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” (ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’)
येशू ख्रिस्ताच्या अलौकिक गर्भधारणेद्वारे आणि जन्माद्वारे, सर्पाचे डोके फोडण्यासाठी स्त्रीचे बीज पाठवण्याचे देवाने आदामाला दिलेले अभिवचन त्याने पूर्ण केले. परंतु येशू ख्रिस्ताचा जन्म, अब्राहामाच्या एका जैविक वंशजाद्वारे जगाला आशीर्वादित करण्याचे देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन देखील पूर्ण करतो. (उत्पत्ति २२:१५-१८). ह्यावरून हे स्पष्ट होते की मत्तयकृत शुभवर्तमानाची सुरवात वंशावळीच्या नोंदीने का होते, जे यहूदाच्या वंशापासून तर दावीदाच्या घराण्याद्वारे अब्राहमपर्यंत आपल्या प्रभूच्या वंशाची रूपरेषा प्रस्तुत करते. देव आपली अभिवचने पाळतो, आणि आपल्या प्रभूच्या वंशावळीचा तक्ता त्याचा पुरावा आहे.
देवाने आपला सार्वकालिक पुत्र का पाठवला आणि ह्याचा आपल्यासाठी काय महत्व आहे? जरी देह धारणाची प्रक्रिया प्रामुख्याने एक गूढच राहिले – खरे पाहता, पौल १ तीमथ्य. ३:१६ मध्ये देह धारणाबद्दल सांगतो की, “खरोखर, देवत्वाचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो (येशू) देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला – देह धारणाची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. येशू पूर्णपणे मनुष्य आहे आणि पूर्णपणे देव आहे असे पवित्र शास्त्रात स्पष्टपणे शिकवते. फिलिप्पै. २:६-८ मध्ये, पौल येशूबद्दल म्हणतो, “तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” येशू मानवी देहात देव आहे, त्याचे दोन स्वभाव आहेत (एक मानवी, एक दैवी), तरीही तो एक व्यक्ती आहे.
देह धारणात, आपल्या पापांपासून आपल्याला तारण्यासाठी देव येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीमध्ये पृथ्वीवर आला. आपल्याला आपल्या पापांपासून तारण्यासाठी शब्द देही झाला हे ख्रिस्ती धर्माचे तत्व आहे.

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.