लोक मुळातच चांगले असतात असा बहुतेकांचा प्रामाणिक पण पूर्णपणे चुकीचा समज असतो. आपण जेव्हा स्वतःची इतरांशी तुलना करतो, तेव्हा आपण त्यांच्यापेक्षा खूप चांगले आहोत असे आपल्याला वाटू शकते. नक्कीच, असे काही लोक असू शकतात जे आपल्यापेक्षा चांगले असल्याचे आपण नम्रपणे कबूल करतो, तरीही इतरांशी केलेल्या आपल्या तुलनेच्या बहुतेक निकषांवर आपण त्यांच्यापेक्षा अधिक चांगले सिद्ध होतो.
लोक मुळात चांगले आहेत असे गृहीत धरण्यात अडचण अशी आहे की असे गृहीत धरल्याने आपण योग्यरितीने देवाच्या दोषारोपाखाली असलेल्या आणि मृत्युदंडाची आणि सार्वकालिक शिक्षेची वाट पाहत असलेल्या एका पतित जातीचे आहोत ह्या वस्तुस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. खरे पाहता देव माझी तुलना माझ्या सारखाच पापी असलेल्या इतर कोणाशी करणार नाही. त्याऐवजी, देव माझे मुल्यांकन त्याच्या आज्ञांच्या पवित्र, यथान्याय आणि उत्तम मानकांप्रमाणे करणार आहे (रोम. ७:१२). आणि जेव्हा देव त्याच्या आज्ञांचा दर्जा वापरून माझे मुल्यांकन करतो, तेव्हा हे लवकरच स्पष्ट होते की आदामापासून आलेल्या इतर सर्वांप्रमाणे मी देवाच्या परिपूर्णतेची मानके पूर्ण करू शकत नाही. मी पापी आहे. मला मृत्यूदण्डाची शिक्षा झालेली आहे. हे कसे घडले?
ह्यामुळे लगेचच निष्पक्षतेचा प्रश्न निर्माण होतो. मी ज्या मानकांपर्यंत पोचू शकत नाही अशा मानकांच्या आधारे माझा न्याय करणे देवाच्या दृष्टीने योग्य आहे का? कोणत्याही पवित्र शास्त्रसंबंधी संदर्भाशिवाय आपण शून्यात ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास उत्तर “नाही” असे मिळेल. पवित्र शास्त्र असे शिकवते की आदाम केवळ पहिला मनुष्यप्राणी नव्हता (ज्याच्यापासून सर्व मानव जैविक दृष्ट्या जन्मले आहेत), तर आदामाला पवित्र आणि पापरहित असे निर्माण करण्यात आले होते. आदामाला एदेन बागेत, “हे कर (निषिद्ध झाडाचे फळ खाऊ नकोस) आणि जग,” किंवा “झाडाचे फळ खा आणि मर” ह्या कृत्यांच्या कराराखाली त्याच्या अटींसह ठेवण्यात आले होते. आदामाने दुसरा पर्याय निवडला आणि संपूर्ण मानवजातीवर मृत्यूच्या कराराचा शाप आला. बहुतेक लोक बेन फ्रँकलिन ह्यांच्या सुप्रसिद्ध नीतिसूत्राशी सहमत होतील की, जीवनात दोन गोष्टी अटळ आहेत, मृत्यू आणि कर आणि मी त्यात अशी भर घालू इच्छितो की ह्या दोन्ही गोष्ठी मनुष्याच्या पापामुळे अस्तित्वात आल्या आहेत. तरीही, वस्तुस्थिती ही आहे की मृत्यू हा मानव जातीसाठी नैसर्गिक नाही. मृत्यू हा आदामाच्या पतनाचा परिणाम आहे.
आदामाने जेव्हा बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाल्ले तेव्हा देवाने लगेच त्याच्यावर कराराचा शाप घोषित केला. “आणि आदामाला [देव] म्हणाला, ““तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील; ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील; तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” काम कष्टाचे झाले. फलद्रूप शेतांमध्ये तण आणि काटेरी झुडूपे उगवू लागली. बाळंतपण कष्टमय झाले. आणि त्याहूनही वाईट म्हणजे आदामाला आता मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागणार होती. आणि आम्हाला देखील.
आदामाने आमच्यातर्फे आणि आमच्या जागी (एदेन बागेत आमचे प्रतिनिधीत्व करून) कृती केल्यामुळे, आदामाने केलेल्या बंडखोरीच्या कृत्यामुळे आम्ही देवासमोर तितकेच दोषी आहोत जितके जणूकाही त्यावेळी आम्ही एदेन बागेत हजर होतो, आणि आमचा पहिला पिता आदाम ह्याच्याप्रमाणेच वैयक्तिकरित्या देवाविरुद्ध बंड करत होतो. आदामाच्या पापाच्या दोषाचे लांच्छन आपल्याला लावण्यात आले किंवा त्याच्या पापाचा दोष आपल्याकडे गणण्यात आला. (रोम. ५:१२, १६-१९). केवळ आदामाच्या पतनानेच आपल्याला देवासमोर दोषी ठरवले गेलेले नाही, तर आम्हा सर्वांना आदामाकडून जो पापी स्वभावाचा वारसा मिळाला आहे, त्या पापी स्वभावातूमुळे आपल्या हातूनही तशीच पापी कृत्ये घडतात (रोम. ७:५). आपण पाप करतो कारण आपल्याला पाप करावेसे वाटते. खरे तर आपल्याला पाप करायला आवडते. आपण सर्व मुळात चांगले लोक असून अधूनमधून पाप करतो ह्या कल्पनेपेक्षा हे अगदी वेगळे आहे. उलट आपण पापी लोक आहोत, ज्यांच्या पापी प्रवृत्तीला दयाळू देवाच्या कृपेने आळा घातला जातो.
पवित्र शास्त्र असे शिकवते की आपण स्वभावाने आणि निवडीनुसार पापी आहोत आणि देवासमोर आपण आता निर्दोष नाही, आणि कधीही नव्हतो (स्तोत्र. ५१:५; ५८:३). इफिस. २:१-३ मध्ये पौलाने सांगितल्याप्रमाणे, आपण पापात मेलेले आहोत आणि स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. इफिस. ४:१७-१९ मध्ये, पौल आदामाच्या पतनाच्या परिणामांबद्दल पुढील शब्दांत बोलतो. “परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये; त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत; ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे.” आदामाच्या पतनाचे परिणाम गंभीर आहेत. आपली विचारसरणी व्यर्थ झाली आहे, आपली समजशक्ती अंधकारमय झाली आहे, आपण देवापासून दुरावलो आहोत आणि आपण देवाला संतुष्ट करण्याऐवजी आपल्या पापी स्वभावाला संतुष्ट करू इच्छित असतो.
आणि ह्या सर्व गोष्टींची सुरवात एदेन बागेतील आदामाच्या बंडखोर कृत्यापासून होते. पवित्रतावादी लोक अगदी समर्पकपणे असे म्हणतात की, “आदामाच्या पतनात, आपण सर्वांनी पाप केले.” आदामाने पाप केल्यामुळे, आपण पापी स्वभावाने जन्माला आलो आहोत, अगोदरच मृत्यूच्या शिक्षेखाली आहोत, आणि स्वतःला त्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाही.
आदामाच्या पतनाचा हा परिणाम आहे.

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.