चांगली कामे हा नीतिमान ठरवले जाणे आणि पवित्रीकरण ह्या शिकवणींशी जवळचा संबंध असलेला विषय आहे. केवळ विश्वासाने नीतिमान ठरवले जाण्याच्या पवित्र शास्त्रातील शिकवणीवर टीकाकारांनी उपस्थित केलेल्या सर्वात सामान्य आक्षेपांपैकी एक हा आहे: “जर आपण केवळ कृपेने, केवळ विश्वासाने, केवळ ख्रिस्तामुळे तारले गेलो, तर त्यात चांगल्या कामांसाठी जागा कुठे उरते?” प्रेषित पौलानेही रोममधील ख्रिस्ती लोकांकडून असाच आक्षेप ऐकला होता. “तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? (रोम. ६:१)”
ह्यासारखे प्रश्न अशा चिंतेतून उद्भवतात की जर देवाची कृपा खूप ताणली तर ख्रिस्ती लोक देवाच्या गोष्टींबद्दल आळशी आणि उदासीन होतील. ते कृपेवर खूप अवलंबून राहतील आणि चांगल्या कामांसाठी पुरेसा आवेश दाखवू शकणार नाहीत अशी भीती वाटते. शेवटी, जर देवासमोर आपले स्थान दुसर्याच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या चांगल्या कृत्यांवर अवलंबून असेल तर देव आपल्याला त्याच्या वचनात ज्या आज्ञा देतो ती कामे करण्यासाठी कोणते प्रोत्साहन शिल्लक राहील? त्याहूनही वाईट, टीकाकारांच्या म्हणण्याप्रमाणे, जर नीतिमान ठरवले जाण्याची शिकवण खरी असेल आणि आपण ख्रिस्ती झाल्यानंतरही नीतिमान ठरलेले पापी आहोत, तर मग आपली चांगली कामे अजूनही पापामुळे डागाळलेली असल्यामुळे आम्ही ती का करावीत?
रोम. ६ मधील ह्या प्रश्नांना पौलाने दिलेले उत्तर प्रभावी आहे. देवाची कृपा जास्त ताणल्याने ख्रिस्ती लोक आपल्या वागणुकीबद्दल उदासीन होतात ह्या आरोपाला उत्तर देताना पौल लिहितो, “कधीच नाही!” प्रेषिताचे स्पष्टीकरण सोपे आहे, “जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार? किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो; ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे.” (रोम. ६:२-४).
पापी लोक केवळ विश्वासाने नीतिमान ठरतात, कृतीने नव्हे (रोम. ३:२१-२८) असा युक्तिवाद केल्यानंतर, प्रेषित पौल असा मुद्दा मांडतो की जे विश्वासाने नीतिमान ठरले आहेत ते पापासाठी देखील मरण पावले आहेत. ख्रिस्ती लोकांना ह्यापुढे पापाच्या अधिपत्याखाली जगण्याची इच्छा राहत नाही कारण ते ख्रिस्ताबरोबर पुरले गेले आहेत आणि नंतर जीवनाच्या नवीनतेमध्ये उठवले गेले आहेत. चांगली कामे करण्याची इच्छा नष्ट करण्याऐवजी, केवळ विश्वासाने नीतिमान ठरवले जाण्याची शिकवण चांगल्या कामांचा पाया स्थापित करते. जे नीतिमान आहेत (पापाला मरण पावले आहेत), ते जीवनाच्या नवीनतेमध्ये चालतील आणि त्यांच्या जीवनात पवित्रीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. चांगल्या कामांमधून जीवनाची नवीनता आणि आपले पवित्रीकरण होत असल्याचे (इफिस. २:१०) दिसून येते, तसेच आपल्या जीवनात आत्म्याची फळे (गलती. ५:१६-२६) दिसून येतात. जसे पौल इतर वचनात म्हणतो, “ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे.” (फिलिप्पै. १:६)
हा मुद्दा वादाचा मुद्दा बनल्यामुळे, प्रोटेस्टंट विश्वासांगीकार आणि कॅटेकीझम (प्रश्नोत्तर रुपात दिलेले धर्माधिकार) ह्या सर्व गोष्टी विस्तारित प्रमाणात हाताळतात. उदाहरणार्थ, हेडलबर्ग कॅटेकिझममधील चर्चा घ्या. चांगली कामे म्हणजे बक्षीस मिळविण्यासाठी नव्हे (प्रश्नोत्तर ९१), तर दैवी आज्ञांनुसार, खऱ्या विश्वासाने केलेल्या आणि देवाच्या गौरवासाठी केलेल्या गोष्टी आहेत हे निदर्शनास आणून दिल्यावर आणि नंतर दहा आज्ञा ह्या देवाच्या इछेचे प्रकटीकरण आहेत हे ख्रिस्ती लोकांनी समजून घ्यावे ह्या मुद्यावर लक्ष केंद्रित केल्यानंतर (प्रश्नोत्तर ९२-११४), आपण ख्रिस्ती असतानाही देवाच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन करू शकत नसलो तरी, आपण चांगली कामे का करावीत हा प्रश्न कॅटेकिझम हाताळते. हेडलबर्ग कॅटेकिझमच्या प्रश्न ११४ मध्ये, असे विचारण्यात आले आहे, “जे देवाकडे वळले आहेत ते ह्या आज्ञा तंतोतंत पाळू शकतात का?”
कॅटेकिझममधील प्रश्न ११४ ला दिलेले उत्तर, केवळ विश्वासाने नीतिमान ठरवले जाणे आणि चांगली कामे ह्यांच्यातील संबंधाच्या अगदी गाभ्यापर्यंत पोहोचते. “जे देवाकडे वळले आहेत ते ह्या आज्ञा तंतोतंत पाळू शकत नाहीत, परंतु अगदी खूप पवित्र लोक देखील, ह्या जीवनात असताना, अशा आज्ञापालनाची फक्त एक छोटीशी सुरुवात करू शकतात, तरीही ते प्रामाणिक हेतूने केवळ काही आज्ञांनुसार नव्हे, तर देवाच्या सर्व आज्ञांनुसार जीवन जगू लागतात.”
आपण डोक्यापासून पायापर्यंत पापी असल्यामुळे, आणि पाप आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूवर प्रभाव पाडत असल्यामुळे (हे संदर्भ पाहा: इफिस. ४:१७-२४; रोम. ३:९-२०; स्तोत्र. ५१:१-५), जरी आपण नीतिमान आहोत तरी पापी आहोत (गलती. ५:१७; रोम. ७:२१-२४). आपल्यापैकी ज्यांना अधिक विश्वास देण्यात आला आहे आणि ज्यांना देवाला आनंद देणारे जीवन जगण्याची मनापासून इच्छा असते, ते देखील अजूनही पापीच राहतात. आमची कामे आमच्या पापांमुळे डागलेली राहतात, जेणेकरून ख्रिस्ताशिवाय अशी कामे पापाने भ्रष्ट झालेली असून खरोखर चांगली नसल्यामुळे ती कामे केवळ आम्हाला दोषीच ठरतील.
“आपण देवाने पूर्वी योजून ठेवलेली सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले आहोत ह्यासाठी की आम्ही त्यांच्यामध्ये चालावे” (इफिस. २:१०), प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य (जो केवळ विश्वासाने नीतिमान ठरला आहे) देवाच्या आज्ञांचे पालन करण्यास सुरवात करतो, मग तो आज्ञाधारकपणा कितीही संकुचित वृत्तीने केलेला आणि दोषी का असेना. आपल्यामध्ये एक दैवी ठिणगी आहे जी देवाच्या कृपेला प्रतिसाद देते म्हणून हे खरे आहे असे नाही, तर “इच्छा करणे व कृती करणे हे देव तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देतो” म्हणून ते खरे आहे. (फिलिप्पै. २:१३).
आमचे नीतिमान ठरवले जाणे जितके देवाच्या कृपेचे कार्य आहे तितकेच आमचे पवित्रीकरण देखील असल्यामुळे, जे सर्वजण केवळ कृपेने, केवळ विश्वासाने, केवळ ख्रिस्तामुळे नीतिमान ठरवण्यात आले आहेत, ते सर्व (कॅटेकिझम मध्ये म्हटल्याप्रमाणे) देवाच्या सर्व आज्ञांनुसार जीवन जगतील. आपला आज्ञाधारकपणा (आपल्या पापाप्रमाणेच) ख्रिस्ताच्या रक्ताने आणि नीतिमत्वाने झाकलेला असल्याने (आपल्या सर्वात वाईट कामांनाही खरोखर चांगले बनवल्याने), आपण चांगली कामे करण्याच्या केलेल्या कमकुवत प्रयत्नांमुळे आपला स्वर्गीय पिता आनंदित होतो आणि ही गोष्ट आपल्याला समजल्यामुळे आपल्यामध्ये अधिकाधिक आज्ञा पाळण्याची इच्छा निर्माण होते.