येशू ख्रिस्त कराराचा मध्यस्थ

ख्रिस्ती लोक अनेकदा महत्वाच्या शिकवणींबद्दल ठोस अस्तित्व नसलेल्या काल्पनिक गोष्टींसारखे बोलतात. ह्या शिकवणीत आणि येशू ख्रिस्ताचे व्यक्तीत्व आणि कार्य ह्यांच्यात कोणताही संबंध न लावता लोक निवड, पूर्वनिश्चितता, प्रायश्चिताची व्याप्ती इत्यादींबद्दल अंदाज लावतात. पण पवित्र शास्त्र आपल्याला असे करण्याची परवानगी देत नाही. आपण जर पवित्र शास्त्रातील उदाहरणे आणि भाषा समजून घेतली तर त्याच वेळी आपण येशू ख्रिस्त ज्याला पित्याने स्वतः जगाचा उद्धारकर्ता होण्यासाठी निवडले होते त्याच्या व्यक्तीत्वामध्ये जगाच्या स्थापनेपूर्वीपासून निवडलेले आहोत, हे नमूद केल्याशिवाय निवडीच्या विषयाचा उल्लेख देखील करू शकत नाही (योहान १७:१). स्त्रीचे बीज (उत्पत्ति ३:१५) नासरेथकर येशू आहे, ज्याने त्याच्या तारणाच्या कार्याद्वारे आपली सुटका केली आहे. म्हणूनच देवाचा सार्वकालिक पुत्र देहधरी झाला – त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवण्यासाठी. आणि हे आपल्याला कृपेच्या कराराकडे आणि त्याचा मध्यस्थ येशू ख्रिस्त ह्याच्याकडे परत आणते.
कृपेच्या कराराचा एक वैयक्तिक मध्यस्थ आहे ह्या वस्तुस्थितीचा काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे – येशू ख्रिस्त – जो देवाने इस्राएलशी सीनाय पर्वतावर केलेल्या कराराचा मध्यस्थ म्हणून मोशेच्या सेवेद्वारे, तसेच दावीदाच्या राजवटीद्वारे आणि इस्राएलवरील त्याच्या शासनाद्वारे आणि इस्राएलच्या याजकांनी देवाला अर्पण केलेल्या पापार्पणाद्वारे देखील जुन्या करारात चिन्हे आणि छायांद्वारे प्रकट झाला आहे. जुन्या करारातील ह्या सर्व घटना देवाचे मानवी देहात येणे अगोदरच प्रकट करतात. म्हणूनच जेव्हा आपण निवड आणि कराराबद्दल बोलतो तेव्हा आपण देहधरी झालेल्या शब्दावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. निवड, करार आणि देहधारी होणे हे अविभाज्य आहेत आणि केवळ येशू ख्रिस्त जो “आमच्याबरोबर देव” आहे त्याचे येणे लक्षात घेऊनच त्यांचे स्पष्टीकरण केले जाऊ शकते व त्या गोष्टी समजल्या जाऊ शकतात. हाच येशू कृपेच्या कराराचा मध्यस्थ देखील आहे जो जुन्या कराराच्या पृष्ठामधून हळूहळू प्रकट होतो आणि नव्या करारात त्याची पूर्णता होते.
तारण देण्याचे वचन जसजसे उघड होऊ लागते, तसतसे हे स्पष्ट होते की देवाची अभिवचने एकाच व्यक्तीमध्ये पूर्ण होतील, ती स्त्रीची संतती, जो इस्राएलचा अंतिम संदेष्टा, याजक आणि राजा असेल आणि जो देव आणि मनुष्य यांच्यातील एक मध्यस्थ असेल (हा संदर्भ पाहा: १ तीमथ्य. २:५). ही एक व्यक्ती आणि कराराचा मध्यस्थ खराखुरा मनुष्य असेल आणि तरीही खरोखरचा देवही असेल. त्याचे दोन वेगळे स्वभाव असतील, तरीही तो एकच व्यक्ती असेल.
येशू ख्रिस्ताचे दोन स्वभाव आपल्या पापांपासून आपला बचाव करण्यासाठी कृपाळू देव कोणत्या टोकाला जाऊ शकतो ह्याकडे निर्देश करतात. मानवी पापाची वस्तुस्थिती लक्षात घेता, आपल्या प्रभुच्या देहधरी होण्याशिवाय स्त्री-पुरुषांना त्यांच्या पापातून मुक्त होण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. हा देवाचा सार्वकालिक पुत्र, शब्द आहे, जो देहधारी झाला आहे, म्हणून ख्रिस्ताच्या दोन स्वभावांशी आणि ते ज्या प्रकारे एका व्यक्तीमध्ये – येशूमध्ये आहेत त्यांच्याशी आपला संबंध असला पाहिजे. मानवी स्वभावाने पाप केले असल्याने, देवाने येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीत्वामध्ये पृथ्वीवर येणे अतिशय आवश्यक होते जेणेकरून एक असा जो खरोखर मनुष्य आहे त्याने आपल्याला वाचवण्यासाठी आवश्यक ते करावे. आपण देवाचे ऋणी आहोत आणि हे ऋण आदामाच्या वंशातील कोणीतरी फेडले पाहिजे, तसेच शापामध्ये आवश्यक असलेल्या (मृत्यूच्या) शिक्षेसाठी शरीर आणि आत्मा दोन्हीमध्ये दुःख सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आवश्यक आहे. असा दंड भरण्यासाठी, देवाचा सार्वकालिक पुत्र देहधारी झाला पाहिजे.
आणि तरीही, त्याच वेळी, जर आपण आपल्या पापातून मुक्त होऊ इच्छित असाल तर, मुक्ती देणारा स्वतःच पापाचा दोष नसलेला असला पाहिजे जेणेकरून तो ज्यांना वाचवण्यासाठी आला होता त्यांच्यासाठी तो खरोखरच पापांसाठी बलिदान देऊ शकेल, असे बलिदान जे देवाचा पवित्र न्याय संतुष्ट करू शकेल. पापी स्वभावाचा, पापी मनुष्य इतर पाप्यांना वाचविण्यास योग्य नाही. म्हणूनच कुमारिकेच्या गर्भात येशूची गर्भधारणा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चमत्कारिकरित्या झाली, जेणेकरून तो आदामाच्या पापाच्या अपराधापासून मुक्त झाला. म्हणूनच येशूने त्याच्या स्वतःच्या परिपूर्ण आज्ञाधारकतेद्वारे त्याच्या लोकांसाठी न्याय्य नीतिमत्ता मिळवण्यासाठी स्वतःला देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन केले (गलती. ४:४-६). म्हणूनच पौल येशूला दुसरा आदाम म्हणतो (हा संदर्भ पाहा: रोम. ५:१२-१९). येशू आदामाप्रमाणे मोहात पडत नाही. आदामाप्रमाणे अवज्ञा न करतो तो देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करतो. येशूने जीवनाचा मुकुट मिळवला जो आदाम मिळवू शकला नाही. येशूने ह्या सर्व गोष्टी अगदी अचूकपणे केल्या, तसेच त्याने त्या खऱ्या मानवी देहात असताना केल्या. ह्या कारणास्तव, येशू, सीनाय पर्वतावर देवाने इस्राएलशी केलेल्या कराराचा मोशेपेक्षा चांगला मध्यस्थ आहे.
तरीही पवित्र देवाचे आपण जे अनंत ऋणी आहोत ते ऋण कोणतेही मानवी यज्ञ फेडू शकत नाहीत. आपल्या पापांसाठी बलिदान अशा व्यक्तीने दिले पाहिजे ज्याचा मृत्यू खरोखर ते ऋण फेडू शकेल. तसेच, ही वस्तुस्थिती आहे की एखाद्या मनुष्याच्या पापांची क्षमा होण्यासाठी दुसऱ्या कोणाही मनुष्याचा त्याग किंवा आज्ञाधारकपणा उपयोगी पडत नाही. केवळ देवच कृपेच्या कराराच्या अटींनुसार येशूच्या तारणाच्या कार्याचे फळ इतरांना लागू करू शकतो आणि केवळ तोच हा कृपेचा करार त्याच्या शपथेवर स्थापित करू शकतो. म्हणूनच येशू देखील पूर्णपणे देव असला पाहिजे.
येशू खरोखर मानव असल्यामुळे, तो खरोखरच खंडणी भरून मानवी स्वभावाची सुटका करू शकतो – पुनरुत्थानानंतर स्वर्गात जात असताना तो हा मानवी स्वभाव त्याच्याबरोबर घेऊन गेला. देवाचा पुत्र आपल्या आत्म्याचा उद्धार करील ही आशा तर आपल्याला आहेच, शिवाय एकाच व्यक्तीमध्ये दोन स्वभाव एकत्र असण्याचा अर्थ असा आहे की देव आपल्या शरीराचाही उद्धार करेल. येशूने आपल्या पापांसाठी खंडणी भरून आपल्याला एक परिपूर्ण नीतिमत्व तर मिळवून दिलेच, शिवाय सध्या तो स्वर्गात गौरवशाली शरीरात आहे – एक असे शरीर ज्या शरीरात तो मृतांना उठवण्यासाठी, जगाचा न्याय करण्यासाठी आणि सर्व गोष्टी नव्या करण्यासाठी परत येईल. आपल्या प्रभूने मानवी देहाचा उद्धार केला असल्यामुळे, आपल्याला खात्री आहे की आपल्या देहातही असे परिवर्तन होईल जेणेकरून आपण त्याच्याबरोबर अनंतकाळ जगू शकू.
म्हणूनच येशू ख्रिस्त हा खरा देव आणि खरा मनुष्य असला पाहिजे, तसेच तो एका व्यक्तीमध्ये कृपेच्या कराराचा मध्यस्थ असला पाहिजे. येशू आम्हाला आमच्या पापांपासून तारण्यासाठी आणि देवाच्या नियमशास्त्राचे पूर्ण पालन करून परिपूर्ण नीतिमत्व मिळवण्यासाठी आला. परंतु पतन पावलेल्या मानवी स्वभावाची पूर्तता करण्यासाठी शब्द देखील देह झाला – आणि त्यासाठी त्याला पाप न करता प्रत्येक प्रकारे आपल्यासारखे बनणे आवश्यक होते. जेव्हा आपण तारण होण्याविषयी बोलतो – तेव्हा आपण केवळ आपल्या आत्म्याच्या तारणाविषयी बोलत नसतो तर त्याहूनही अधिक म्हणजे आत्मा आणि शरीर अशा आपल्या संपूर्ण व्यक्तीमत्वाबद्दल बोलत असतो. म्हणूनच तो खरा देव आणि खरा मनुष्य आणि एका अधिक चांगल्या कराराचा मध्यस्थ आहे.

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.