“माझ्या ओळखीची सर्वात नम्र व्यक्ती मी आहे” असे माझा एक कॉलेज मित्र बळे बळे कधी कधी म्हणायचा. जरी आम्हाला माहित होते की तो हे मनापासून बोलत नव्हता, तरी खरी नम्रता किती दुर्मिळ असते हे त्यातून दिसते, कारण आपण इतके सहजासहजी आपल्या नम्रता नम्रतेबाबत अभिमानी बनू शकतो. तरी देखील, ख्रिस्ती व्यक्तींकरिता नम्रता ही एखादी ऐच्छिक गोष्ट नाही. प्रभू येशूने म्हटले, “जे आत्म्याने दिन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्तय ५:३). “पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही” असे त्याने बजावले. (मत्तय १८:३). प्युरिटन रिचर्ड बॅक्सटरने लिहिले की, ” नम्रता हा ख्रिस्ती व्यक्तीचा केवळ एक अलंकार नाही, तर त्या नव्या जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. एक ख्रिस्ती व्यक्ती असणे आणि नम्र नसणे विसंगत वक्तव्य आहे.”
नम्रता म्हणजे काय? नम्र व्यक्ती देवापुढे त्याचे स्थान काय आहे हे जाणते, इतरांप्रत त्याची जबाबदारी राजीखुषीने पार पाडते, आणि आपणा स्वतःचे अचूक मूल्यमापन करते.
नम्रता म्हणजे देवासमोर आपली योग्य जागा स्वीकारणे. १ पेत्र ५:६ मध्ये,आपण पाहतो की देवाच्या पराक्रमी हाताखाली आपण स्वतःला लीन केलेच पाहिजे. मार्क १०:३५-४५मध्ये हेच सत्य कळवण्यात आले आहे, जेथे शिष्य देवासमोर मोठेपणाकरिता झगडत होते आणि ख्रिस्त त्यांना निकडीची गरज असलेल्या नम्रते बाबत शिकवत होता. जॉन कॅल्व्हिनने त्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ द ख्रिश्चन रिलिजन च्या सुरुवातीला हे लिहिले की, “खरोखर, आपले दारिद्रयच देवांमध्ये विसावलेल्या लाभांचा अमर्यादितपणा अधिक चांगल्या रीतीने उलगडून दाखवते. सर्वप्रथम मानवाच्या बंडखोरीने आपल्याला ज्या दुर्दशेत आणून सोडले, ती आपण वर देवाकडे दृष्टी लावण्याची विशेष रीतीने सक्ती करते. अशा रीतीने, आपल्याकडे जे नाही ते उपास आणि भूक सहन
करून त्यापासून आपण मिळवायचा प्रयत्न करु एवढेच नव्हे तर, भयाने कार्यप्रवृत्त होऊन, आपण नम्रता शिकू. नंतर, कॅल्व्हिन ठामपणे ऑगस्टीनचे हे शब्द बोलतो: ” तुम्ही मला जर ख्रिस्ती धर्माच्या नीतिनियमांविषयी विचारले, तर मी सर्वप्रथम, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, आणि नेहमीच उत्तर देईन, नम्रता
हा एकमेव नियम सांगेल .”
इतरांशी विश्वासूपणे वागणे आणि त्याच्याशी आपला व्यवहार चांगल्या रीतीने चालवणे ह्यात देखील नम्रता आहे. मत्तय २२:३९मध्ये ख्रिस्त दुसरी महान आज्ञा जाहीरपणे सांगून हा पाया घालतो: “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वत:सारखी प्रीती कर”. लीन व्यक्ती इतरांच्या अधिक भल्यासाठी त्याला शक्य ते करील; त्याच्या भोवती असणाऱ्यांच्या हिताकरिता प्रयत्नांची पराकाष्टा करील. योहान १३मध्ये आपल्या शिष्यांचे पाय धुण्याच्या कृतितून येशू नम्रतेचे परिपूर्ण उदाहरण दाखवतो. स्वतःला लीन करून इतरांना तारण्यासाठी त्याने मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. (फिल २:७-८) जेव्हा आपण आज्ञाधारकपणे आपल्याला जे करायला सांगितले आहे ते समाधानीपणाने, आनंदाने आणि हेतुपूर्वक करतो तेव्हा आपण ख्रिस्त- सदृश्य नम्रता दाखवतो.ए. डब्ल्यू. टोझर म्हणाला, “देव एखाद्या मनुष्याला खोलवर दुखापत करत नाही तोपर्यंत तो त्याला भरपूर आशीर्वाद देऊ शकतो की कसे ते अनिश्चित असते — आणि आपण “दुखापत” ह्या शब्दाऐवजी “लीन बनवले” हे शब्द वापरून बदल करू शकतो. सी.एच.स्पर्जनने जेव्हा हे लिहिले, “नम्रता सर्व कृपेच्या देवाकडून आशीर्वादित होण्यासाठी आपल्याला तयार करते, आणि आपल्या सोबत्यांशी कार्यक्षमतापूर्वक व्यवहार करण्यासाठी सुसज्ज करते” तेव्हा स्पर्जण नम्रतेचे पहिले दोन पैलू सारांशरूपाने सांगत होते.
शेवटी, नम्रता आपणा स्वतःला अचूकपणे जाणण्यात आहे. रोम १२:३ मध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे, “कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.” कॅल्व्हिनने वारंवार नम्रता आणि स्वत:चे ज्ञान ह्यांना जोडणाऱ्या कडीवर जोर दिला. नम्रता नसेल तर, आत्मज्ञान घमेंड वाढवते पण नम्रता असेल तर आत्मज्ञान आशीर्वादाने सम्रुद्ध बनते. आपली दुर्दशा आणि उणिवांच्या जाणिवेने नम्रता आपले हृदय भग्न करते. नम्रता, देवाचे कृपामय वचन आणि त्याच्या पुत्रामधील तारणासमोर शरणागती देखील पत्करते. (यशया ६६:२). शेवटी, ज्यांना आत्म्याने शिस्त लावली त्यांना स्वर्गीय गौरवाच्या अपेक्षेने दुःखसहन आणि अश्रूंच्या दरीसारख्या ह्या जीवनात जायला निघण्यासाठी नम्रता सदैव तयार असते.
नम्रतेसाठी काही उपयुक्त गोष्टी येथे दिल्या आहेत:
१. श्रवण करा — देवाच्या वचनावरील धर्मोपदेश किंवा त्याचे वाचन ऐकण्यातील गौरव आणि वैभवाबाबतची संवेदनशीलता पुन्हा परत मिळवा. देवाचे वचन ऐकणे आणि वाचणे ह्या मुख्य मार्गाने देव आपल्यामध्ये नम्रता बनवतो आणि आपण ती व्यक्त करतो.
२. सोबत करा / एकत्र जमा — नम्रतेने सहभागिता समृद्ध बनते आणि सहभागिता नम्रता विकसित करते. खूप वेळां आपण ज्याच्याशी सोबत करतो ती व्यक्ती आपला अभिमान वाढवते; जे लोक एकाकी आहेत किंवा संकटात आहेत त्यांच्यासोबत राहणे आपल्याला नम्रता शिकवू शकते.
३. दुःख सहन करा — आजार, पीडा, कसोट्या, आणि छळ ह्यामधील देवाच्या हाताच्या अधीन व्हा. तुम्ही तुमची दुर्बलता पूर्णपणे समजून देवाच्या सामर्थ्यावर पूर्णपणे विसंबून राहत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी घालवण्यासाठी धडपड करू नका.