पवित्रशास्त्र वाचन

परिणामकारक बायबल अध्ययन हे मुख्यतः कामसूपणाच्या चांगल्या सवयींवर अवलंबून असते. पक्का निर्धार करून वाचन सुरु करा; ताबडतोब आत्ताच सुरु करा. तुम्हाला तो मूड येईपर्यंत कधीही थांबून राहू नका, नाहीतर तुम्हाला अनेक आठवडे थांबावे लागेल. चक्क सुरुवात करून त्या मूडमध्ये जा; बायबल आपला एक स्वतंत्र असा मूड तयार करते. जे. सी. रेल म्हणतात की, “एखादी गोष्ट करायचा खरा मार्ग म्हणजे ती गोष्ट करणे हा आहे.” बायबल वाचायचा खरा मार्ग म्हणजे ते प्रत्यक्षपणे वाचणे हा आहे — बायबल वाचण्याची इच्छा धरणे आणि वाचायचा उद्देश मनात ठेवणे आणि निश्चय करणे आणि बेत करणे आणि तसा विचार करणे हा तो मार्ग नाही तर प्रत्यक्षपणे बायबल वाचणे हाच आहे. तसे तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही एकही पाऊल पुढे जाऊ शकणार नाही.तुम्हाकडे वाचनाच्या मार्गदर्शनासाठी एखादा आराखडा असेल तर मग तुमची सुरुवात झालीच असे समजा. खरेच, जर तुम्हाकडे एखादा आराखडा नसेल तर तुम्ही बायबल कधीही वाचणार नाही. तुम्ही कदाचित बायबलचे काही भाग वाचू शकाल, पण संपूर्ण पुस्तक कधीही वाचणार नाही, आणि तुमचा लाभ होण्यासाठी खूप आवश्यक असलेल्या बायबलच्या संदेशांचा तो गाढ परिचय तुम्हाला कधीही मिळणार नाही.

ज्यानुसार तुम्ही संपूर्ण बायबल वाचन एका वर्षात पूर्ण कराल किंवा एका वर्षात जुना करार, आणि दोनदां नवा करार आणि सोबत स्तोत्रसंहिता पूर्ण वाचाल अशा निरनिराळ्या योजना आहेत. त्या पूर्ण करायला दररोज तीन किंवा चार अध्याय वाचन करावे लागेल असे हे महत्वाकांक्षी कार्यक्रम आहेत.

अशा योजना अनुसरणे हा एखाद्या विश्वासणाऱ्यांचे एक ध्येय असते. हे खरे आहे की यांहून अधिक महत्वाकांक्षी ध्येयें गाठण्याचे प्रयत्न केले गेले आहेत आणि ती साध्य देखील झाली आहेत. सॅम्युएल ऍन्नेसली, जॉन वेस्लीचे आजोबा यांनी, पांच किंवा सहा वर्षांचे असतांना प्रत्येक दिवशी वीस अध्याय वाचणे सुरु केले आणि त्यांच्या हयातभर ते चालू ठेवले. आर्थर पिंक यांनी आपल्या एका मित्राला लिहिले, माझ्या सुरुवातीच्या काही वर्षांत ….मी संपूर्ण बायबल एका वर्षात तीन वेळां वाचून काढत असे. (दररोज, जुना करारातील आठ अध्याय आणि नवा करारातील दोन अध्याय) बायबलमधील मजकूर परिचित व्हावा ह्यासाठी, आणि हे केवळ सलगपणे वाचन केल्यानेच शक्य होते, मी हे वाचन सातत्याने दहा वर्षें चालू ठेवले. आजच्या ख्रिस्ती लोकांना तेवढा दम धरवत नाही.

भोजनाच्या टेबलवर असतांना बायबल वाचणे ही एक अद्भुत सवय आहे; प्रत्येक कुटुंबाचे हे ध्येय असले पाहिजे. ह्यातून जास्तीत जास्त लाभ मिळवायचा असेल तर, प्रत्येक व्यक्तीने आपल्या पुढ्यात एक बायबल ठेवले पाहिजे. असे केल्याने, प्रत्येकाचे विचार भलतीकडे भरकटण्यापासून रोखले जातात आणि शास्त्रभाग वाचल्यानंतर प्रत्येकजण त्यावरील चर्चेत भाग घेऊ शकतो. उपस्थित असलेल्या सर्वांना त्या उताऱ्याचा प्रमुख रोख कोणीकडे आहे हे समजण्यासाठी अशा टीकाटिप्पणी आवश्यक आहेत.

सी. एच. स्पर्जन सुचवतात, “प्रत्येक सेवकाने वर्षातून कमीतकमी एकदा म्यॅथ्यु हेन्री संपूर्णपणे आणि काळजीपूर्वक वाचलाच पाहिजे. तुम्ही कॉलेज सोडल्यानंतरच्या बारा महिन्यात तुम्ही त्याला वाचून काढले पाहिजे अशी शिफारस मी करतो. अगदी सुरुवातीपासून वाचणे चालू करा आणि तुम्ही दान ते बैर शेबाचा प्रशस्त प्रदेश पार करून जाईपर्यंत वाचन कराल असा निर्धार करा.”

पवित्र शास्त्र वाचण्यातील प्रमुख उद्दिष्ट आपण किती भाग वाचला किंवा मुळात वाचनच केले हे नाही. देवाची ओळख करून घेणे हे उद्दिष्ट आहे. आपल्या पाळकाच्या विनवण्या मानून आपण पवित्र शास्त्र वाचन करतो ह्यातून आपली सद्सद्विवेकबुद्धी शमवणे हा देखील हेतू नाही. तरी देखील, विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यांत, चिकाटीने वाचन करण्यासाठी दिलेल्या उत्तेजनाने फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ, ख्रिस्ती भक्तगण एखादी योजना स्वीकारू शकतात आणि त्यांच्या सर्व सभासदांमध्ये त्या योजनेची रूपरेषा वाटून देऊ शकतात. कमीत कमी पहिल्या काही महिन्यांत, रविवारच्या भक्तीसभेतील एक शास्त्रभाग वाचन हा त्या दिवसाकरिता ठरलेला एक अध्याय बनू शकतो.

आपल्या विशिष्ट गरजांना साजेल अशा कोणत्याही रीतींनी ती सुचवलेली योजना जुळवून घेतली तरी, एका बैठकीत दोन किंवा तीन अध्याय, किंवा एक संपूर्ण पुस्तक किंवा प्रेषितांचे एक पत्र वाचावे हे आपले ध्येय असलेच पाहिजे. जोपर्यंत आपण देवाच्या वचनाचे मोठे खंड वाचत नाही तोपर्यंत त्यातील पुष्कळ बहुमोल गोष्टीं आपल्याला कधीही कळून येणार नाहीत. इतर कोणत्याही वाङ्मयाच्या (साहित्याच्या) पंधरा ओळी वाचून ते बाजूला ठेवून लेखकाच्या मूळ अपेक्षा पूर्ण केल्या आहेत अशा भ्रमात आपण कधीही राहणार नाही. बायबलची संपूर्ण, भरभक्कम विचार प्रक्रिया दिसून येण्यासाठी, पवित्र शास्त्र वारंवार आणि उत्पत्ती पासून प्रकटीकरणापर्यंत वाचणे गरजेचे आहे. त्याहून काहीही कमी असले तर त्यात ख्रिस्ती व्यक्तीने समाधान मानूच नये. पवित्र शास्त्राच्या अधिक विस्तृत परिचयातून ज्ञानाचा जो आकृतिबंध तयार होतो त्याशिवाय ख्रिस्ती व्यक्तीला वेगवेगळी, सुटी वचने समजणार नाहीत. तो जसजसा अधिक वाचन करत जातो, तस तसे बायबल अधिक आकलनीय होत जाते.

Used with permission from Reformation Heritage Study Bible

                       
 
           
डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.