नियमशास्त्र-शुभवर्तमान ह्यातील फरक हा अनेकदा जरी लुथरन ईश्वरविज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणून ओळखला जात असला तरी, त्याला सुधारित परंपरेने देखील मान्यता दिली आहे. लुईस बर्खॉफ सारख्या सुधारित ईश्वरविज्ञानशास्त्रज्ञाने पवित्र शास्त्राचे दोन भाग असल्याचे म्हटले आहे – नियमशास्त्र आणि शुभवर्तमान. लोक जरी सहसा असे गृहीत धरत असले की ह्याचा अर्थ पवित्र शास्त्रात दोन करार आहेत (जुना करार “नियमशास्त्रा”सह ओळखला जातो तर नवा करार “शुभवर्तमाना”ने ओळखला जातो), हे चुकीचे आहे. असा फरक करत असताना, सुधारित लोकांना असे म्हणायचे आहे आहे की नियमशास्त्र आणि शुभवर्तमान ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत ज्या दोन्ही करारांमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत आढळून येतात.
ह्या टप्प्यावर एक-दोन व्याख्या पाहणे उपयुक्त ठरेल. देव आपल्याकडून जी अपेक्षा करतो ते नियमशास्त्र आहे ( उत्पत्ति २:१७; निर्गम २०:१-१८), तर शुभवर्तमान ही एक चांगली बातमी आहे की देव नियमशास्त्रानुसार आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो त्या सर्व ख्रिस्तामध्ये मुक्तहस्ते आणि कृपापूर्वक आपल्याला देतो. (उदा. हे संदर्भ पाहा: रोम. ५:९; २ करिंथ. ५:१७-२१). नियमशास्त्रांत जे लिहिले आहे ते देवाने प्रथम एदेन बागेत आदामाला प्रकट केले आणि नंतर सीनाय पर्वतावर जेव्हा दहा आज्ञा दगडाच्या दोन पाट्यांवर लिहून देवाच्या लोकांना देण्यात आल्या तेव्हा देवाने इस्राएलशी केलेल्या करारात प्रसिद्ध ते केले (निर्गम २४ पाहा). दुसरीकडे, शुभवर्तमानामध्ये, देवाने येशू ख्रिस्तामध्ये आपल्या पापांपासून आपल्याला वाचवण्यासाठी जे काही केले आहे ते लिहिले आहे. या शुभवर्तमानाचे प्रकटीकरण उत्पत्ति ३:१५ मध्ये सुरू होते जेव्हा देव आदामाला शापापासून वाचवण्याचे आणि मुक्ती देणाऱ्याच्या टाचेखाली सैतानाला चिरडण्याचे अभिवचन देतो आणि ह्यापुढे कोणताही शाप राहणार नाही ह्या देवाच्या अभिवचनाने त्याचा शेवट होतो (प्रकटी. २२:३). नियमशास्त्र म्हणजे देव आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो ते. शुभवर्तमान म्हणजे ख्रिस्तामध्ये देवाने आपल्यासाठी जे केले आहे ते. नियमशास्त्र म्हणते “असे कर.” शुभवर्तमान आपल्याला सांगते की ते “पूर्ण” झाले आहे.
देवाने जेव्हा आदामाची निर्मिती केली आणि त्याला एदेन बागेत ठेवले, तेव्हा आदामाला देवासोबतच्या कराराच्या नातेसंबंधात (कार्यांचा तथाकथित करार) निर्माण करण्यात आले. आदामाकडे देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करण्याची नैसर्गिक क्षमता होती, त्या सर्व आपल्याला ज्ञात नाहीत (जरी आपण त्याबद्दल बरेच अनुमान लावू शकतो). आपण देवचे प्रतिमा वाहक असल्यामुळे ह्या आज्ञा जरी आदामाच्या सर्व वंशजांच्या अंतःकरणावर लिहिल्या गेल्या आहेत (रोम. २:१२-१६), तरी देवाने सीनाय पर्वतावर इस्राएलला ह्या आज्ञा दिल्याशिवाय आमच्यासाठी त्या प्रसिद्ध होत नाहीत. ह्या विशिष्ट करारामध्ये (सीनाय पर्वतावरील करार), जुन्या करारात नियमशास्त्र आणि शुभवर्तमान हे दोन्ही एकत्र कसे आढळतात ते आपण पाहू शकतो.
देवाने सीनाय पर्वतावर इस्राएलशी जेव्हा करार केला, तेव्हा जे अंतर्मनात (मानवी हृदयावर लिहिलेले) होते ते आता सर्वांना पाहण्यासाठी आणि पाळण्यासाठी सार्वजनिक केले गेले. दहा आज्ञांना “नैतिक नियम” म्हटले जाते कारण त्या देवाच्या इच्छेचे सार्वभौमिक ज्ञान प्रतिबिंबित करतात जे त्याने प्रत्येक मानवी अंतःकरणावर बिंबवले आहे. ह्या आज्ञांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास त्यांची अवज्ञा करणाऱ्या सर्वांवर कराराचा शाप येतो. एका आज्ञेचे पालन करण्यात आपण अयशस्वी झालो तरी ह्या सर्व आज्ञांचे उल्लंघन केल्याबद्दल आपण दोषी ठरतो (याकोब २:१०). त्याच वेळी, देवाने निवासमंडपाची योजना प्रकट केली (ज्यामध्ये देव त्याच्या लोकांमध्ये उपस्थित असेल – निर्गम २५:९), कराराचा मध्यस्थ म्हणून मोशेची नियुक्ती केली (निर्गम ३:१५), आणि राष्ट्राला पूर्ण याजकत्व दिले, अगदी प्राण्यांच्या बलिदानांसह, जे सर्व कृपेच्या कराराचे घटक आहेत आणि ज्यांनी देवाच्या लोकांना येशू ख्रिस्ताच्या येण्याकडे निर्देशित केले आहे, ज्याच्या वधस्तंभावरील मृत्यूचे हे घटक आदिरूप आहेत (इब्री. ८:१-१३).
दहा आज्ञा जरी आज्ञापालनाच्या अभिवचनाच्या आशीर्वादांसह आणि अवज्ञेच्या शापाच्या धोक्यासह देवाची इच्छा प्रतिबिंबित करत असल्या, तरी इस्राएलला नियमशास्त्र कराराच्या संदर्भात देण्यात आले ज्यामध्ये देव लोकांच्या पापांची क्षमा करण्यासाठी असे एक माध्यम प्रदान करतो, जे प्रत्येक वेळी त्यांना येशू ख्रिस्ताच्या येण्याकडे निर्देशित करते. नियमशास्त्र आणि शुभवर्तमान, ह्यांच्यातील फरक काळजीपूर्वक रितीने लक्षात घेणे जरी आवश्यक असले, तरी ते सहसा एकत्रच प्रकट केले गेले आहेत. आज्ञा देवाच्या लोकांना त्यांचे पाप दाखवून देतात (गलती. ३:१०-१४), त्याच वेळी त्या त्यांना येशू ख्रिस्त, त्यांचा मशीहा आणि उद्धारकर्ता ह्याच्या आगमनासाठी तयार देखील करतात.
पौलाने म्हटल्याप्रमाणे, “म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही; कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते” (रोम. ३:२०), तर शुभवर्तमान हे येशू ख्रिस्ताने आपल्याला पापापासून तारण्यासाठी जे केले आहे त्याचा संदेश आहे. (हा संदर्भ पाहा: १ करिंथ. १५:१-८). नियमशास्त्र पालन करण्यासाठी आहे, तर शुभवर्तमान “सुवार्ता” म्हणून घोषित करण्यासाठी आहे – म्हणजे, शुभवर्तमान हे पाप्यांना त्यांच्या पापांच्या दोषापासून आणि परिणामांपासून वाचवण्यासाठी देवाने जे काही केले आहे त्या सर्व गोष्टींची घोषणा आहे (रोम. १०:१४-१७). नियमशास्त्र दोषी ठरवते आणि त्याच्या अटींचे पालन करण्यासाठी कोणतीही शक्ती पुरवत नाही. शुभवर्तमान असे घोषित करते की नियमशास्त्र ह्यापुढे दोषी ठरवू शकणार नाही आणि त्याच वेळी ते अंतःकरणात विश्वास निर्माण करते. आम्ही शुभवर्तमान “पाळत” नाही. आम्ही शुभवर्तमानावर “विश्वास ठेवतो”.
येथे विडंबन हे आहे की शुभवर्तमानामुळे विश्वास निर्माण होतो, आणि शुभवर्तमानाचा प्रचार केल्याने देवाचे लोक पवित्र जीवन जगण्यास सक्षम होतात (इफिस. २:१-१०; फिलिप्पै. ३:२-१४). नियमशास्त्र खरोखर पवित्र, नीतिमान आणि चांगले आहे (रोम. ७:१२), परंतु आपण पापी असल्यामुळे, जेव्हा आपल्याला नियमशास्त्र शिकवले जाते, तेव्हा आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणावर पाप करण्यास प्रवृत्त केले जाते (रोम. ७:५-१२). परंतु एकदा का आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, आणि विश्वासाद्वारे त्याच्याशी एकरूप झालो म्हणजे, आपला आपल्या पापांशी संघर्ष सुरु होतो, आपल्याला समजेते की आपण देवाच्या आज्ञा पाळण्यात अयशस्वी ठरलो आहोत, आणि अचानक आपल्या मनात नियमशास्त्राचे पालन करण्याची इच्छा निर्माण होते (हा संदर्भ पाहा: रोम. ७:२२-२३). आपण नीतिमान ठरवले गेल्यानंतर नियमशास्त्र बदलत नाही. त्या उलट, नियमशास्त्राशी आपले नाते बदलते. आपण ख्रिस्ताचे होण्याअगोदर, नियमशास्त्र आपल्याला दोषी ठरवते कारण आपण ते पाळू शकत नाही. नियमशास्त्र आपल्यावर शाप लावते. पण आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर आणि नियमशास्त्र आणि त्याच्या शापाला मेल्यानंतर, आपण अचानकपणे देवाच्या आज्ञांनुसार जिवंत होतो, ज्या आता आपल्याला देवाची इच्छा आणि त्याला संतुष्ट करण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे प्रकट करतात (स्तोत्र. १:१-२).
म्हणूनच जुन्या ईश्वरविज्ञानशास्त्रज्ञांचे म्हणणे बरोबर होते जेव्हा त्यांनी ह्या गोष्टीची पुष्टी केली की नियमशास्त्र हे पापाचा शिक्षक आहे आणि आभारी असण्याचे सूत्र आहे. जर आपल्याला नियमशास्त्र-शुभवर्तमान हा भेद स्पष्ट नसेल, तर आपण शुभवर्तमानाबद्दल स्पष्ट असणार नाही आणि आपल्या पापांपासून आपल्याला तारण्यासाठी देवाने येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही केले आहे ह्याविषयी देखील आपण स्पष्ट असणार नाही.